समृद्धी महामार्गाच्या लोकार्पणाच्या दिवशीच काँग्रेसने सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करत जबरदस्त हल्लाबोल केला आहे. कोटेवाडींच्या घोटाळ्याचा ठपका ठेवत ‘50 खोके एकदम ओके’चा संबंधही या प्रकल्पाशी असल्याचा आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचे लोकार्पण होताच काँग्रेसने सरकारवर भ्रष्टाचाराचा घणाघाती आरोप करत एक नवा ‘हल्लाबोल’ सुरू केला आहे. समृद्धी महामार्ग ‘विकासाचा नव्हे, तर भ्रष्टाचाराचा महामार्ग आहे’ असा गंभीर ठपका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ठेवला आहे.
सपकाळ म्हणाले, हा महामार्ग म्हणजे सुवर्णसंधीपेक्षा ‘सुवर्ण खाण’ झाली. सुरुवातीला 55 हजार कोटींच्या अंदाजातून सुरू झालेला प्रकल्प कसा काय 70 हजार कोटींवर गेला? आणि यातूनच 15 हजार कोटींचा मलिदा काही मंडळींनी खाल्ला आहे. त्यांनी पुढे थेट आरोप केला की, समृद्धी महामार्गाच्या पैशांतूनच ‘50 खोके आणि एकदम ओके’चा कार्यक्रम राबवण्यात आला आणि शिवसेनेत फूट पाडण्यात आली.
श्वेतपत्रिकेची मागणी
हर्षवर्धन सपकाळांनी पत्रकार परिषदेतून हा घणाघात केला. समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पार पडले असताना काँग्रेसने श्वेतपत्रिकेची जोरदार मागणी करून सरकारची कोंडी केली आहे. शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण करत असताना सरकारने या महामार्गातील खर्च आणि व्यवहारांची पारदर्शक माहिती श्वेतपत्रिकेद्वारे जनतेसमोर मांडावी, अशी ठाम मागणी त्यांनी यावेळी केली. सपकाळ यांनी स्पष्टपणे नमूद केलं की, भाईंदर बोगद्यातच तीन हजार कोटींचा भ्रष्टाचार सुप्रीम कोर्टात सिद्ध झाला आहे. त्यामुळे जर समृद्धी महामार्गाची श्वेतपत्रिका प्रसिद्ध झाली, तर किमान 15 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे नवे दस्तऐवज बाहेर येतील, ही आम्हाला खात्री आहे.
सपकाळंनी सरकारला उद्देशून सवालांचा भडिमार केला आणि म्हटलं की, प्रत्येक किलोमीटरसाठी नेमका किती खर्च झाला? शेतकऱ्यांना भरपाई म्हणून किती रक्कम वितरित करण्यात आली? झाडे लावण्याच्या नावाखाली किती निधी खर्च करण्यात आला? आणि आता टोलच्या नावाखाली दररोज किती रक्कम वसूल केली जात आहे? या सर्व गोष्टींचा तपशील श्वेतपत्रिकेद्वारे जनतेसमोर मांडावा, अशी ठाम मागणी सपकाळ यांनी सरकारकडे केली.
काँग्रेसचा आक्षेप ठाम
हा समृद्धीचा नव्हे, तर ‘धंद्याचा महामार्ग’ आहे, जो काही सत्ताधाऱ्यांना फायदा देतो आणि जनतेच्या पैशावर डल्ला मारतो, असा घणाघात सपकाळ यांनी केला. त्यांनी यालाच ‘कटबोळ्याचा महामार्ग’ संबोधले. त्यांच्या म्हणण्यानुसार, या सरकारमध्ये जर नैतिकता आणि पारदर्शकता शिल्लक असेल, तर त्यांनी तत्काळ या प्रकल्पाची सविस्तर श्वेतपत्रिका जाहीर करावी.
काँग्रेसने समृद्धी महामार्गावरून राजकीय रणधुमाळी निर्माण केली आहे. त्याचा थेट संबंध शिवसेनेच्या फुटीपर्यंत जोडल्यामुळे ही टीका केवळ आर्थिकच नव्हे तर राजकीयदृष्ट्याही अतीव महत्त्वाची बनली आहे. आता सरकार या आरोपांवर काय उत्तर देते आणि श्वेतपत्रिका प्रसिद्ध करते का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.