महाराष्ट्र

Harshwardhan Sapkal : पत्त्यांचा क्लब अन् WWF आखाडा सरकार

Congress : गृहराज्यमंत्रींच्या आईच्या नावाने सुरु डान्सबार?

Author

महाराष्ट्राचं राज्यकारण तमाशा बनलंय, असा घणाघात हर्षवर्धन सपकाळांनी फडणवीस सरकारवर केला. कायदा-सुव्यवस्था ढासळल्याचा आरोप करत त्यांनी सरकारला थेट जबाबदार धरलं.

एकेकाळी विकास, मूल्य आणि सुशासनासाठी ओळखला जाणारा महाराष्ट्र आज कलंकित झाल्याचं चित्र आहे. विधानसभेत मंत्री रमी खेळतात, सभागृहाच्या बाहेर मंत्री WWE स्टाईलमध्ये एकमेकांवर तुटून पडतात, तर सामान्य जनतेचं दुःख पाहणं दूर, आता गृहराज्यमंत्रींच्या आईच्या नावाने खुलेआम डान्सबार चालू आहेत. अशा शब्दांत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजप प्रणित महायुती सरकारवर जोरदार हल्ला चढवला.

सपकाळ यांनी स्पष्ट शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या सगळ्याचा मुख्य सूत्रधार ठरवत म्हटलं की, या सरकारनं मागील दहा वर्षांत महाराष्ट्राचं नावच मातीमोल केलं आहे. सरकारमध्ये मंत्री गंभीरतेने काम करत नाहीत. हे सरकार लोकशाही मानत नाही, ही ‘हम करे सो कायदा’ संस्कृती आहे.

मंत्रिमंडळातच खोट

हर्षवर्धन सपकाळ यांनी पुढे सांगितलं की, सध्याच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांचे वर्तन अत्यंत लज्जास्पद आहे. एका मंत्र्याच्या घरी पैशाने भरलेली बॅग सापडते. दुसरा मंत्री विधानसभेत पत्याचा खेळ खेळतो आणि आता तर कहर म्हणजे गृहराज्यमंत्रींच्या आईच्या नावाने सुरु असलेला डान्सबार, हे सगळं महाराष्ट्राच्या शिरपेचात काळं ठिपकं आहे, असा रोखठोक आरोप त्यांनी केला.

सपकाळांनी हा सवालही उपस्थित केला की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या मंत्र्यांना बडतर्फ का करत नाहीत? लाचारपणाने, भीतीने किंवा सत्तेच्या राजकारणात अडकून राहिल्यामुळे का? राज्यात आज कायदा-सुव्यवस्थेची स्थिती इतकी ढासळली आहे की, कोणालाही पोलिसांचा दरारा उरलेला नाही, असं त्यांनी नमूद केलं.

गुंडगिरीचा कहर

महिला अत्याचार, ड्रग्जची वाढती तस्करी, आणि कोयता गँगच्या धुमाकुळावर देखील सपकाळांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटलं, गुजरातमधून महाराष्ट्रात ड्रग्ज येत आहेत. तरुण पिढीला नशेच्या गर्तेत ढकललं जातंय. गुंडगिरी, अवैध धंदे, खुलेआम मवाली संस्कृती, हे या सरकारच्या काळात फोफावलंय. हे सर्व रोखण्याऐवजी सरकार गप्प आहे. त्यांनी पुढे स्पष्ट केलं की, हे सगळं काही फक्त अपयश नव्हे, तर पद्धतशीर पाप आहे. या राज्याच्या स्वाभिमानाचा चक्काचूर झाला आहे आणि फडणवीस सरकारनेच तो केलाय.

वाढदिवसाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना दिलेल्या शुभेच्छांवर विचारलेल्या प्रश्नावर सपकाळांनी उत्तर दिलं की, “ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आहे. येथे विरोधक शत्रू मानले जात नाहीत. शुभेच्छा म्हणजे राजकीय समीकरण नव्हे, आणि मतभेद असले तरी मनभेद नाहीत.” त्यांनी स्पष्ट केलं की, यामागे कोणताही गुप्त हेतू नाही आणि विरोधकांनी आपले विचारजन्य लढे कायम ठेवले आहेत.शेवटी सपकाळ म्हणाले की, हे सरकार म्हणजे एका भेसूर तमाशाचं नेतृत्व करतंय. सभागृहातली जबाबदारी, रस्त्यावरचं नियंत्रण, जनतेचा आत्मविश्वास सगळंच हरवलंय. या ढिसाळ, असंवेदनशील आणि बेशिस्त सरकारचं विसर्जन लवकरच जनतेच्या मतांनी होईल. महाराष्ट्र पुन्हा उभा राहील, यावेळी सजग आणि शुद्ध विचारांच्या नेतृत्वाखाली.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!