राज्याच्या राजकारणात भाजप प्रणित महायुती सरकारवर काँग्रेसने जोरदार हल्ला चढवला आहे. रमी खेळ प्रकरणातील मंत्र्याला क्रीडा मंत्रालय देणे म्हणजे बेशरमपणाचा कळस असल्याची बोचरी टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
राज्याच्या राजकारणात सध्या गाजत असलेल्या रमी प्रकरणावर काँग्रेसने थेट घणाघात करत महायुती सरकारला बेशरम, लाचार आणि नैतिकदृष्ट्या अधःपात झालेलं सरकार ठरवलं आहे. राज्याचे क्रीडा मंत्रीपद मिळवलेले मानिकराव कोकाटे हे प्रत्यक्षात रमी खेळ प्रकरणात अडकले आहेत. त्यांना डावलण्याऐवजी उलट सन्मान देण्यात आला, हे म्हणजे भ्रष्टाचार व बेशिस्त वर्तनाचं सार्वजनिक सन्मानीकरण असल्याची बोचरी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
कोकाटे यांना क्रीडा मंत्री बनवून महायुती सरकारने काय संदेश दिला? आता रमी खेळास ऑलिंपिकमध्ये सामावून घेण्याचा प्रस्ताव पाठवला जाईल, आणि कदाचित कोकाटे यांना ‘शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार’ देखील मिळेल, असा जोरदार टोला सपकाळांनी लगावला. त्यांनी महायुती सरकारवर फटकारा मारताना म्हटले की, खोटारडेपणा, दुटप्पीपणा आणि नैतिक अधःपात हे या सरकारचे मुख्य आधारस्तंभ झाले आहेत.
संतप्त प्रतिक्रिया
सपकाळांनी मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निकालावर देखील थेट केंद्र सरकारला लक्ष्य केले. “कोर्टाने ३१ जुलै रोजी निकाल दिला, पण त्याच्या एक दिवस आधीच गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत निकालाचं सार सांगून टाकलं. म्हणजेच कोर्ट कायदे पाळतं, पण निकाल आधीच सत्ताधाऱ्यांच्या हातात असतो, यावर शिक्कामोर्तब झालं आहे, अशी टीका त्यांनी केली. दहशतवादाला धर्म नसतो, रंग नसतो, पण भाजपला अजेंडा राबवायचा असल्याने ते दहशतवादालाही हिंदू किंवा मुस्लिम ठरवतात. ही अत्यंत घातक मानसिकता आहे, असा गंभीर आरोप सपकाळ यांनी लावला.
फडणवीसांवर थेट वैयक्तिक हल्ला
फडणवीस मंत्री असताना त्यांनी घेतलेली शपथ आता विसरले आहेत. एका घटनेला एक न्याय, तर दुसऱ्याला वेगळा न्याय हे नैतिकतेच्या आणि संविधानाच्या विरोधात आहे. त्यामुळे फडणवीस हे अधर्मी राजकारणाचे पुरस्कर्ते झाले आहेत, अशी थेट टीका सपकाळांनी केली. सपकाळ यांनी महायुती सरकारवर आणखी एक गंभीर आरोप केला. त्यांनी सांगितले की, सामाजिक न्याय व आदिवासी विभागाचा निधी ‘लाडकी बहिण’ योजनेसाठी वळवला जात आहे. हा निधी घटनात्मक मर्यादांनी सुरक्षित असतो. तो इतर योजनेसाठी वापरणं म्हणजे संविधानाची पायमल्लीच, असा आरोप त्यांनी केला. हे सरकार सत्तेवर चुकीच्या मार्गाने आले आहे आणि आता सत्तेचा उपयोग चुकीच्या गोष्टींसाठी करत आहे. त्यामुळे आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पक्षातील गळतीच्या मुद्द्यावर बोलताना सपकाळ यांनी अत्यंत परखडपणे उत्तर दिले. ज्यांना जायचं होतं, त्यांनी योग्य सौदा होईपर्यंत थांबले. आता सौदा जमल्यावर ते गेले. यात पक्षाचा विचार ढासळत नाही, उलट नव्या कार्यकर्त्यांना संधी मिळते. काँग्रेस ही केवळ व्यक्तींची नव्हे, विचारधारेची चळवळ आहे, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. जे गेले त्यांना शुभेच्छा, आम्ही आपल्या घरी आनंदाने राहू देतो. काँग्रेसची मुळे खोलवर रुजलेली आहेत, काही फांद्या तुटल्या तरी वटवृक्ष कोसळत नाही, अशी काव्यमय शैलीत प्रतिक्रिया त्यांनी दिली.
टिळक, अण्णा भाऊंना अभिवादन
यावेळी सपकाळांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करत, या दोन्ही विचारवंतांचे योगदान आजच्या राजकीय परिस्थितीत किती महत्त्वाचे आहे, यावरही भाष्य केले. टिळकांनी लोकजागृतीसाठी ‘स्वराज्य’ हा मंत्र दिला, तर अण्णा भाऊंनी उपेक्षित समाजासाठी आवाज दिला. आज त्यांच्या विचारांची जास्त गरज आहे, असं ते म्हणाले.
या पत्रकार परिषदेत सपकाळ यांनी केवळ भाजपच्या युती सरकारवर नाही, तर संपूर्ण व्यवस्थेवर कठोर भाष्य केलं. काँग्रेस आता अधिक आक्रमक पवित्र्यात दिसत आहे. महायुती सरकारसाठी हे वादळ किती अडचण निर्माण करेल, ते येणाऱ्या राजकीय घडामोडींमध्ये दिसेलच, पण सपकाळांनी उपस्थित केलेले प्रश्न मात्र सरकारला अस्वस्थ करणारे आहेत.