हिंजवडीतील आयटी उद्योग एकेक करत बंगळुरु-हैदराबादकडे स्थलांतर करत असताना, राज्य सरकार आणि पालकमंत्र्यांची उदासीनता समोर येत आहे. यावर संतप्त प्रतिक्रिया देत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात जोरात विस्तारलेल्या हिंजवडी आयटी पार्कमधून आता उद्योगांचे पलायन सुरू आहे आणि ते सरळ बंगळुरु, हैदराबादकडे वळले आहे. याची कबुली खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे. मग प्रश्न असा निर्माण होतो की, हे उद्योग बाहेर जात असताना राज्य सरकार आणि पुण्याचे पालकमंत्री झोपले होते का? असा थेट सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
सपकाळ म्हणाले की, पुणे हे केवळ महाराष्ट्राचंच नव्हे तर देशाचंही महत्त्वाचं औद्योगिक, सांस्कृतिक व शैक्षणिक केंद्र आहे. पण सध्या या शहराची अधोगती सुरू आहे. ट्रॅफिक जाम, एका पावसात बुडणाऱ्या रस्त्या, कोयता गँगचा हैदोस, ड्रग्जचे वाढते नेटवर्क, ही सगळी लक्षणं म्हणजे एका उद्योजकविरोधी वातावरणाची साक्ष देतात. अशा परिस्थितीत उद्योग बाहेर जात असतील तर त्याला जबाबदार कोण?
दुसऱ्या राज्यात स्थलांतर
राज्य सरकारचे धोरणशून्य निर्णय, वाढता भ्रष्टाचार, गुन्हेगारी प्रवृत्तीला मिळणारे संरक्षण आणि पायाभूत सुविधांकडे होत असलेले दुर्लक्ष यामुळे आयटी क्षेत्रासह अन्य उद्योगही दुसऱ्या राज्यात स्थलांतर करत आहेत. यावर उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः कबुली दिल्यानंतर आता त्यांच्याकडून राजीनामा अपेक्षित आहे, असं सपकाळ यांनी ठामपणे सांगितलं.
सपकाळांनी वेदांता-फॉक्सकॉनसारख्या मेगा प्रकल्पाचा मुद्दा उपस्थित करत सरकारवर जोरदार टीका केली. “१.६ लाख कोटींची गुंतवणूक आणि दोन लाख रोजगार निर्माण करणारा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला कसा गेला? याची उत्तरं अद्याप सरकारने दिलेली नाहीत. उद्योगांना आकर्षित करणं तर दूरच, पण असलेले उद्योगही गमावणाऱ्या या युती सरकारचा निष्क्रियपणा धक्कादायक आहे, असं ते म्हणाले.
सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले
पुणेच नव्हे तर नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, मुंबई अशा अनेक शहरांमध्येही औद्योगिक व रोजगार क्षेत्रात पडझड होत आहे. लाखो युवक बेरोजगार आहेत, शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि महागाईनं सर्वसामान्यांचे कंबरडे मोडलं आहे. पण सत्ताधारी पक्षाचे मंत्री मात्र हिंदू-मुस्लीम वाद निर्माण करून ‘खोके’ गोळा करण्यात मश्गूल आहेत, असा संताप त्यांनी व्यक्त केला.
ही आका आणि खोके संस्कृतीच महाराष्ट्राला गर्तेत लोटते आहे. इतकं निष्क्रिय, बेजबाबदार आणि निर्लज्ज सरकार यापूर्वी कधीच राज्यात पाहायला मिळालं नव्हतं. उद्योग बाहेर जात असताना जाहिरातींचा डंका वाजवणाऱ्या सरकारला आता याचं उत्तर द्यावं लागेल, असं सांगत सपकाळांनी भाजप युती सरकारच्या अपयशावर टोकदार बोट ठेवलं.
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, राज्य सरकार स्वतःच्या अपयशावर पडदा टाकण्यासाठी धार्मिक तेढ निर्माण करत आहे. पण जनतेच्या रोजच्या प्रश्नांवर त्यांच्याकडे उत्तर नाही. यामध्ये खासकरून युवक आणि उद्योजकांचा विश्वास सरकारवरून उडाला आहे. पुण्याचं भवितव्य हे महाराष्ट्राच्या औद्योगिक भविष्याशी निगडित आहे. पण जर त्या शहराचा विकास रोखला गेला, त्याकडे दुर्लक्ष झालं, तर त्याची जबाबदारी कोण घेणार? उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी आता राजकीय सौजन्य दाखवत राजीनामा द्यावा. अन्यथा जनता स्वतःच उत्तर देईल,” असा इशारा हर्षवर्धन सपकाळ यांनी अखेर दिला.