पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाने महायुती सरकारच्या गळ्यात गुन्हेगारीचा फास टाकला आहे. काँग्रेसने थेट अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यावर आरोपांचा भडिमार करत, सत्तेतील काळ्या बाजूचा पर्दाफाश करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे.
वैष्णवी हगवणेच्या धक्कादायक प्रकरणाने राज्याच्या राजकारणात खळबळ उडवली आहे. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याला अटक झाल्यानंतर, हे प्रकरण केवळ गुन्हेगारीची बाब राहिली नाही. आता ते थेट राजकीय आरोप-प्रत्यारोपाच्या भोवऱ्यात सापडले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर थेट टीका करत, राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या नैतिकतेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे.
हर्षवर्धन सपकाळ यांनी सोशल मीडियावर दोन परखड पोस्ट शेअर करत सत्ताधारी महायुतीवर जोरदार हल्ला चढवला. त्यांच्या म्हणण्यानुसार, वैष्णवी हगवणे प्रकरणात अटक झालेला राजेंद्र हगवणे, पुण्यातील ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह प्रकरणातील आरोपी, कोयता गँगच्या गुन्हेगारांचे मुळ, आणि ‘शेल्टर होम’च्या नावाखाली तरुणींवर अत्याचार करणारा शंतनू कुकडे, हे सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित आहेत. शंतनूचा सहकारी दीपक मानकर याचेही अजित पवार यांच्या गटाशी जवळचे संबंध असल्याचे त्यांनी नमूद केले.
Accident मधील जखमीला उपचार मिळाल्यानंतरच MP पडोळेंमधील डॉक्टर शांत
शिंदेंवरही हल्लाबोल
या सर्व गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेले आरोपी एकाच पक्षाशी संबंधित का असतात? हे केवळ योगायोग आहे की, अजित पवार यांचं पक्षांतर्गत गुन्हेगारीशी संबंध आहे? असा थेट सवाल सपकाळ यांनी उपस्थित केला. सपकाळ यांची टीका केवळ अजित पवारांपुरती मर्यादित राहिली नाही. त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही घणाघाती टीका केली. त्यांच्या गटातील सर्व आमदारांची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ईडी आणि आयकर विभागामार्फत करण्याची मागणी केली.
सपकाळ यांनी म्हटलं की, महायुती सरकार म्हणजे भ्रष्टाचाराचं साम्राज्य आहे. भाजप, शिंदे आणि अजित पवार गटाच्या या सरकारकडून केवळ लूट सुरु आहे. त्यांनी उदाहरण देताना सांगितलं की, धुळे दौऱ्यावर असलेल्या अंदाजपत्रकीय समितीचे प्रमुख आमदार अर्जुन खोतकर यांच्या खासगी सहाय्यकाच्या खोलीत सुमारे दोन कोटी रुपयांची रोकड सापडली आहे. या रकमेबाबत कंत्राटदारांकडून उकळल्याच्या चर्चा सुरू आहेत.
फडणवीसांनी कारवाई करावी
सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही बोट दाखवत म्हटलं की, “जर फडणवीस यांचा या लुटीच्या कारभारात सहभाग नसेल, तर त्यांनी तात्काळ खोतकर आणि त्यांच्या पीएवर गुन्हा दाखल करून अटक करावी. या मागणीमुळे फडणवीसांनाही या वादात ओढण्याचा काँग्रेसचा प्रयत्न स्पष्टपणे दिसून येतो.
या संपूर्ण प्रकारामुळे राज्यातील सत्ताधाऱ्यांची विश्वासार्हता आणि नैतिकतेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. एका मागोमाग उघड होणाऱ्या प्रकरणांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे गट अडचणीत सापडले असून, या प्रकरणांमुळे आगामी निवडणुकांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. या सर्व राजकीय घडामोडींवर अजित पवार, एकनाथ शिंदे किंवा भाजपकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र काँग्रेसच्या आक्रमक भूमिकेमुळे राज्यातील राजकारण आणखी तापणार हे निश्चित.
