
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्याने शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या असून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शेतकरीविरोधी मानसिकतेचा आरोप करत काँग्रेसने त्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली आहे.
राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा अवमान करत अजब प्रश्न विचारून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलं आहे. कोकाटेंनी विचारले, कर्जमाफी झाल्यावर शेतकरी काय करतात? ते लग्न करतात का, साखरपुडा करतात का, की शेतीत गुंतवणूक करतात? असे प्रश्न कोकाटेंनी उपस्थित केले. याआधीही त्यांनी शेतकऱ्यांना “भिकारी” म्हणत अपमानित केलं होतं. यावरून आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. शेतकरी म्हणजे अन्नदाता, त्यांच्या श्रमांमुळेच देशाचं पोट भरतं, पण सत्तेच्या मदात बेहोश झालेली भाजप महायुती सरकार त्यांचं अवमान करण्यात एकही संधी सोडत नाही, असे सपकाळ म्हणाले.
हर्षवर्धन सपकाळ यांनी जोरदार प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, शेतकऱ्यांचा अवमान करणाऱ्या कोकाटेंना मंत्रिमंडळातून त्वरित हटवावं. त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली आणि स्पष्टपणे सांगितलं की, शेतकऱ्यांना दिली जाणारी मदत ही उपकार नसून त्यांचा अधिकार आहे. सपकाळ पुढे म्हणाले की, भाजप महायुती सरकारने सत्तेवर येताना शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे वचन दिलं होतं, पण अजूनही ते पूर्ण झालेलं नाही. आता सरकारकडे पैसा नाही असं कारण सांगितलं जातं. मात्र जेव्हा 16 लाख कोटींची कर्जमाफी उद्योगपतींना देण्यात आली, तेव्हा एकही मंत्री किंवा कोकाटे बोलले नाहीत. मग आता शेतकऱ्यांनी विचारलंच तर एवढा त्रास का होतो?

सरकारचे दुर्लक्ष
सपकाळ पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांवर कोणताही उपकार होत नाही. कारण सरकारने त्यांना मदत केली तरी ती लोकांच्या पैशातूनच होते, कोकाटेंच्या खिशातून नाही. शेतकरी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे संकटात सापडले आहेत. उत्पादनांना भाव नाही, हमीभावापेक्षाही कमी दर मिळतो, आणि दररोज शेतकरी आत्महत्या करत आहेत. पण कृषीमंत्री आणि सरकार याकडे दुर्लक्ष करत आहेत. उलट ते शेतकऱ्यांनाच दोष देतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांना विनम्रतेने बोलण्याचा सल्ला दिला होता. पण कोकाटे सारखे मंत्री त्यांचा सुद्धा आदर करत नाहीत. उलट त्यांच्या बोलण्यावर ओरडतात. हेच भाजप सरकारचं खऱ्या अर्थाने असंवेदनशील रूप आहे, अशी टीका सपकाळ यांनी केली.
शेतकऱ्यांचा सातत्याने अवमान करणाऱ्या कोकाटेंना या भूमिकेबद्दल खेद व्यक्त करत राजीनामा द्यावा, अशी काँग्रेसची ठाम मागणी आहे. सपकाळ यांनी स्पष्ट केलं की, ही सत्ता हडपलेली आहे, जनतेच्या विरोधात आहे, आणि विशेषतः शेतकऱ्यांना खाली खेचणारी आहे. या सत्ताधाऱ्यांच्या वागणुकीवरून हे स्पष्ट होतं की, भाजप आणि महायुती सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने नाही, उलट त्यांना कमी लेखण्याचं काम करत आहे. आता शेतकऱ्यांनीच या अपमानाचा योग्य उत्तर मतपेटीतून द्यावं, असं आवाहनही सपकाळ यांनी केलं.