
साताऱ्यात हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेसच्या योगदानाचा गौरव केला. यशवंतराव चव्हाणांना आदरांजली अर्पण करत काँग्रेसच्या विचारांचे महत्त्व सांगितले.
काँग्रेस पक्षाचा व भारत देशाचा डीएनए एकसंध आहे. काँग्रेसचा विचार, धोरणे आणि मूल्ये ही भारताच्या संस्कृतीत, परंपरांमध्ये आणि लोकजीवनात खोलवर रुजलेली आहेत. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यापासून लोकशाही रुजवण्यापर्यंत आणि राष्ट्राला वैभव प्राप्त करून देणाऱ्या प्रत्येक टप्प्यावर काँग्रेस पक्षाची आघाडी होती. त्यामुळे असा पक्ष संपवता येणं शक्यच नाही, असे मत महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी साताऱ्यात व्यक्त केले.

साताऱ्यातील दौऱ्यादरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना सपकाळ यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. देशाच्या इतिहासाची जाणीव नसलेल्या लोकांकडून काँग्रेस संपुष्टात येईल अशी विधाने होत असल्याचे सांगत त्यांनी अशा वक्तव्यांची तीव्र नोंद घेतली. काँग्रेसने स्वातंत्र्य मिळवून देताना अनेकांनी बलिदान दिले. महात्मा गांधी यांच्यासारख्या महापुरुषाचा हत्यारा कोण होता, हे विसरणे राष्ट्रनिष्ठांच्या विचाराच्या विरोधात असल्याचे त्यांनी नमूद केले.
सभ्यतेचा संदेश
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी जाऊन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली. चव्हाण साहेबांचे कार्य स्मरणात ठेवून देशावर संकटांची छाया असताना त्यांच्या धैर्यशील नेतृत्वाची आठवण येते, असे त्यांनी स्पष्ट केले.
1962 मधील युद्धजन्य परिस्थितीत महाराष्ट्र दिल्लीचे तख्त राखतो महाराष्ट्र माझा, अशा बाण्याने देशासाठी उभं राहिलं होतं. त्या ऐतिहासिक कालखंडाची आठवण करून देताना सपकाळ यांनी यंदाही सह्याद्रीने हिमालयाच्या मदतीला धावून जाण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. भारतीय लष्कराच्या पाठीशी देश उभा आहे. संकटकाळी एकवटलेल्या राष्ट्राचा आत्मविश्वास आजही तितकाच अढळ आहे, असे ते म्हणाले.
महाराष्ट्र धर्माचे प्रतीक
हर्षवर्धन सपकाळ यांनी सार्वजनिक जीवनातील नीती, मर्यादा आणि आचारधर्म यावरही भाष्य करत काँग्रेसचा आदर्श ठामपणे मांडला. यशवंतराव चव्हाणांनी आपल्या वागणुकीतून आणि राजकीय भाषणातून सभ्यतेचा मार्ग दाखवला. त्याच धर्तीवर काँग्रेस आजही महाराष्ट्र धर्माचे सुसंस्कृत, सजग आणि संयमी नेतृत्व पुढे नेत आहे.
प्रांताध्यक्ष म्हणून काँग्रेस पक्षाला पुढे नेत असताना, मराठी माणसाच्या मनातील सच्चेपणा आणि राष्ट्रनिष्ठा जपत आपण भूमिका पार पाडत आहोत, असेही सपकाळ यांनी स्पष्ट केले. काँग्रेस केवळ पक्ष नाही तर देशाच्या आत्म्याचा आवाज आहे, हे पुन्हा एकदा त्यांच्या या भाषणातून दिसले आहे.
देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या विचारांचे आजच्या तरुणांनी स्मरण ठेवावे, हेच काँग्रेसचे खरे कार्य आहे. स्वातंत्र्यवीरांचे त्याग आणि बलिदान विसरून कोणीही राजकारण करू नये. काँग्रेसने देशाच्या प्रत्येक संकटात कणखरपणे उभं राहत इतिहास घडवला आहे. हा इतिहास विसरणे म्हणजे देशाच्या आत्म्याशी बेईमानी ठरणार आहे, असा भावही सपकाळ यांच्या भाषणातून व्यक्त झाला.