
काँग्रेस पक्ष संघटना बळकट करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली जिल्हानिहाय निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या महायुती सरकार मजबूत स्थितीत आहे. भाजप विकासकामांवर भर देत आहे. मात्र, विधानसभेतील मोठ्या अपयशानंतर काँग्रेसच्या मनोबलाला जबर धक्का बसला आहे. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या उत्स्फूर्त समर्थनानंतरही काँग्रेसला विधानसभेत मोठा फटका बसला. यामुळे पक्षाची स्थिती ढासळली. याच पार्श्वभूमीवर, काँग्रेसला नवसंजीवनी देण्यासाठी आणि संघटना बळकट करण्यासाठी नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली संघटनात्मक बदलांची मोठी प्रक्रिया सुरू झाली आहे.

महाराष्ट्रात काँग्रेस पक्षात नवसंजीवनी आणण्यासाठी संघटनात्मक फेरबदलांची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पक्षाची जडणघडण अधिक मजबूत करण्यासाठी जिल्हानिहाय निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या अहवालानंतर पक्षात व्यापक स्तरावर बदल अपेक्षित आहेत. पक्षाची ताकद वाढवून नव्या जोमाने पुढे जाण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे.
Maharashtra : विजय वडेट्टीवार यांच्याकडे लोकलेखा समितीची धुरा
नवीन वाटचाल
फेरबदल प्रक्रियेचा एक भाग म्हणून काँग्रेसने वरिष्ठ नेत्यांना विविध जिल्ह्यांचे निरीक्षक म्हणून जबाबदारी सोपवली आहे. ते स्थानिक काँग्रेस पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून पक्षाच्या कार्यपद्धतीबाबत सखोल अभ्यास करतील. या निरीक्षकांच्या अहवालानंतर संघटनेत महत्त्वपूर्ण बदल घडवले जाणार आहेत, ज्यामुळे पक्ष अधिक बळकट होईल.
फेरबदलांच्या या प्रक्रियेत मंडळ स्तरापासून ते प्रदेश पातळीपर्यंत काँग्रेसची पुनर्रचना केली जाणार आहे. रिक्त पदे त्वरित भरली जातील तसेच नवे सक्षम चेहरे पक्षाच्या जबाबदाऱ्या स्वीकारणार आहेत. यामुळे पक्षाच्या कार्यक्षमतेत वाढ होईल आणि नव्या नेतृत्वाला संधी मिळेल.
Parinay Fuke : राष्ट्ररक्षक योद्ध्यांचा अपमान करणाऱ्या पक्षाला उत्तर
संधी कोणाला
प्रदेश काँग्रेसच्या मुख्यालयात या संदर्भात, टिळक भवन येथे 28 मार्च रोजी काँग्रेसची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी. एम. संदीप, कुणाल चौधरी, प्रफुल्ल गुडदे पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष कुणाल पाटील, तसेच प्रदेश उपाध्यक्ष ॲड. गणेश पाटील आणि मोहन जोशी उपस्थित होते. या बैठकीत निरीक्षकांना त्यांची जबाबदारी स्पष्ट करण्यात आली.
नियुक्त निरीक्षकांना आपापल्या जिल्ह्यात जाऊन स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यास सांगण्यात आले आहे. ते आगामी 15 दिवसांत प्रदेश काँग्रेसला आपला अहवाल सादर करतील. त्यांच्या शिफारशींनुसार पक्षात नवे बदल घडवले जातील. यात अनुभवी नेतृत्वाला संधी देण्याबरोबरच युवा पिढीला पुढे आणण्यावर भर दिला जाणार आहे.
काँग्रेसमधील या बदलांमुळे पक्षाला नव्या उर्जेने उभारी मिळणार असल्याचे स्पष्ट होत आहे. आगामी राजकीय रणधुमाळीत पक्ष अधिक ताकदीने उतरण्यास सज्ज होणार आहे. आता सर्वांचे लक्ष या संघटनात्मक फेरबदलांच्या निर्णयांवर लागले आहे.