महायुती सरकारची लाडकी बहीण योजना काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
2024 विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या विजयामध्ये निर्णायक ठरलेली योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आता मात्र नव्या संकटाच्या सावटाखाली सापडली आहे. महिलांना आर्थिक पाठबळ देण्याच्या नावाखाली जाहीर झालेली ही योजना सध्या वादग्रस्त ठरू लागली आहे. महिन्यांपासून या योजनेवरून चर्चेला नवा विषय मिळतोय आणि प्रत्येक आठवड्याला नवी माहिती या योजनेच्या पार्श्वभूमीवर प्रकाशात येत आहेत. या योजनेने सुरुवातीला महिलांमध्ये आशा पल्लवित केली होती. शासनावरचा विश्वास दृढ झाला होता. मात्र निवडणूक पार पडताच, या योजनेच्या अंमलबजावणीसाठी लागणाऱ्या निधीच्या फेरवाटपावरून वाद निर्माण होऊ लागले.
अनेक खात्यांवर वित्तीय बोजा टाकल्याच्या आरोपांनी सरकारची गोची केली आहे. काही दिवसांपूर्वी सामाजिक न्याय विभागाचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वापरण्यात आल्याची माहिती समोर आली होती. आता या योजनेसाठी आदिवासी विकास विभागाचा तब्बल 335.7 कोटी रुपयांचा निधी वळवण्यात आल्याचं उघड झालं आहे. आर्थिक पुनर्वाटपाच्या या हालचालीमुळे सामाजिक व अल्पसंख्याक घटकांत नाराजीचं वातावरण आहे. सरकारच्या या निर्णयांवर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यवतमाळ आणि वाशिम दौऱ्यावर असतांना लाडकी बहीण योजनेवर जहाल शब्दांत निशाणा साधला.
महिला सक्षमीकरण ढोंग
पोहरादेवीच्या दर्शनानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विधानाचा हवाला देत सरकारला घेरलं. सरकारनं लाडक्या बहिणींना सरसकट लाभ देणं चूक ठरलं, अशी कबुली अजित पवार देत आहेत. म्हणजेच निवडणुकीआधी केलेली आश्वासने फसवी होती, असा आरोप त्यांनी केला. सपकाळ म्हणाले, महिला सक्षमीकरणाचा देखावा करून महायुतीनं केवळ निवडणुकीत पैसा फेक तमाशा देख असा कार्यक्रम रचला. या सरकारला महिला, शेतकरी, गरीब, आदिवासी यांच्या प्रश्नांशी काहीही घेणंदेणं नाही. ही सत्ता म्हणजे निव्वळ भ्रष्टाचारासाठीच आलेली आहे. सपकाळ यांचं टीकास्त्र इतक्यावरच थांबलं नाही. त्यांनी थेट केंद्रीय मंत्री नितेश राणेंवरही टीका केली. ज्यांच्या घराण्याने देशासाठी बलिदान दिलं, अशा राहुल गांधींबद्दल बोलण्याची नितेश राणेंची लायकीच नाही, असा घणाघात त्यांनी केला.
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांपासून ते महिलांच्या सक्षमीकरणापर्यंत कोणत्याही मुद्द्यावर राणे गप्प का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. लाडकी बहिण योजनेत 2 हजार 100 रुपयांचा हफ्ता देण्याचं आश्वासन, शेतकऱ्यांना कर्जमाफी, शेतकरी सन्मान योजना, प्रत्येक कुटुंबाला 2 मोफत सिलेंडर अशा गाजलेल्या निवडणुकीपूर्व आश्वासनांचा पत्ता आता लागत नसल्याची टीका विरोधक करत आहेत. ही सत्ता म्हणजे आश्वासनांच्या मुखवट्याआड लपलेली सत्ता आहे. जनतेचा विश्वासघात करणाऱ्या सरकारचा आम्ही तीव्र निषेध करतो, असे परखड शब्द वापरत सपकाळ यांनी हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आणला.
