पुण्यात कोथरूड पोलिसांनी तीन तरुणींवर केलेल्या बेकायदेशीर कारवाईमुळे राज्यात संतापाची लाट उसळली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या पोलिसांवर तत्काळ ऍट्रॉसिटीखाली गुन्हे दाखल करण्याची जोरदार मागणी केली आहे.
जेव्हा पोलिसांची वर्दी ही जनतेच्या सुरक्षेसाठी नसून दडपशाहीचं साधन ठरते, तेव्हा लोकशाहीचा जीव गुदमरतो. पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन तरुणींवर पोलिसांनी जे क्रौर्य दाखवलं, त्यावरून संपूर्ण राज्यात संताप उसळला आहे. एका महिलेला मदत केल्याच्या कारणावरून कोथरूड पोलिसांनी तीन सामाजिक कार्यकर्त्या तरुणींच्या घरात घुसून त्यांना बेकायदेशीरपणे ताब्यात घेतले, जातिवाचक शिवीगाळ करत मारहाण केली. या प्रकरणावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी कडक शब्दांत संताप व्यक्त केला आहे.
सपकाळ यांनी स्पष्ट सांगितले की, संबंधित पोलिसांनी केलेली ही कारवाई म्हणजे कायद्याचा आणि वर्दीचा सरळ गैरवापर आहे. त्यांनी विचारले की, पोलिसांवर गुन्हे दाखल करण्यात टाळाटाळ का केली जात आहे? इतका गंभीर प्रकार घडूनसुद्धा संबंधित अधिकाऱ्यांवर एफआयआर दाखल केला जात नाही, ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. त्यांनी जोरदार मागणी केली की, या मुजोर पोलिसांवर तात्काळ SC/ST Atrocity ॲट्रोसिटी कायदा अंतर्गत गुन्हे दाखल करून अटक करावी.
पोलिसांनी अन्याय केला
काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी हेही स्पष्ट केलं की, ही तिन्ही तरुणी कोणताही गुन्हा न करता एका महिलेला मदत करत होत्या. त्यांचा एकमेव ‘गुन्हा’ एवढाच की, त्यांनी अन्यायाविरोधात उभं राहण्याचं धाडस केलं. पण त्याच धाडसामुळे त्यांच्यावर पोलिसांनी अन्याय केला, हे समजण्यासारखं आहे की, पोलिसांच्या पाठीमागे कुणीतरी मोठं राजकीय बळ उभं आहे.
सपकाळ यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त, पालकमंत्री आणि खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही प्रश्नांची सरबत्ती केली. त्यांनी विचारले की, या पोलिसांना कोण पाठिशी घालतंय? पोलीस आयुक्त खुर्चीवर बसून फक्त फाईल बघतात का? मुख्यमंत्री स्वतःच म्हणतात की पुण्यात दादागिरी वाढली आहे, पण गुन्हेगारांवर कारवाई करण्याऐवजी हेच पोलीस सामान्य जनतेवर बडगा का चालवतात?
कारवाई होत नाही
पुण्यात ड्रग्ज, कोयता गँग, मोकाट गुन्हेगार, खुलेआम सुरू असलेले अवैध धंदे यावर कुठेही कठोर कारवाई होत नाही, ही गोष्ट जनता अनुभवते आहे. पण सामाजिक कार्य करणाऱ्या तीन निष्पाप मुलींवर अमानुष अत्याचार करणं, यावरून पोलीस विभागाच्या नैतिकतेचं दिवाळं निघालं आहे, असंही त्यांनी सुनावलं.
सपकाळ यांनी हा मुद्दा केवळ कायदेशीर कारवाईपुरता मर्यादित ठेवला नाही, तर हा प्रश्न सामाजिक न्यायाचा आहे असं स्पष्ट केलं. त्यांच्या मते, जर या पोलिसांवर तात्काळ कठोर कारवाई झाली नाही, तर काँग्रेस रस्त्यावर उतरून आंदोलन करेल. ही लढाई केवळ त्या तिन्ही मुलींच्या न्यायासाठी नाही, तर प्रत्येक सामान्य नागरिकाच्या सुरक्षेसाठी आहे.
ताकदीने गुन्हेगारी थांबवावी
कायद्याचा बडगा आता गुन्हेगारांवर नव्हे, तर आवाज उठवणाऱ्यांवरच चालतोय काय? असा सवाल उपस्थित करत सपकाळ यांनी सरकारला जाहीर इशारा दिला. त्यांच्या म्हणण्यानुसार, पोलीस दलाने आपली ताकद गुन्हेगारी रोखण्यासाठी वापरावी, जनतेवर अन्याय करण्यासाठी नव्हे.
या प्रकाराची चौकशी करून संबंधित पोलिसांना निलंबित करण्याची, तसेच Atrocity Act अंतर्गत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरत आहे. ही घटना केवळ एका शहरापुरती मर्यादित नाही, तर संपूर्ण राज्यात पोलीस यंत्रणेच्या जबाबदारीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.