महाराष्ट्र

Harshwardhan Sapkal : सत्ताधाऱ्यांच्या गोंगाटात पडली सायलेन्सरची शांतता

Congress : सरकारवर हर्षवर्धन सपकाळ यांचा हल्लाबोल

Author

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने नव्या जोमात कार्यकारिणी जाहीर करत सामाजिक समतेचं नवं पर्व सुरू केलं आहे. हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात नव्या नेतृत्वाला चालना मिळाली, तर सरकारवरही घणाघाती टीकेचा मारा झाला.

महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा अध्याय सुरू होताना दिसतोय. एकीकडे सत्ताधारी पक्षावर आरोपांच्या फेऱ्या सुरु असताना, दुसरीकडे काँग्रेसने नव्या चेहऱ्यांना पुढे करून कार्यकारिणीत ताजेपणा आणि सामाजिक समतेचा संतुलन साधण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने नुकतीच आपली नवी कार्यकारिणी जाहीर केली असून, ही कार्यकारिणी सध्या चर्चेचा केंद्रबिंदू बनली आहे.

या नव्या कार्यकारिणीत तब्बल 66 टक्के नव्या चेहऱ्यांना स्थान देण्यात आले आहे. केवळ 33 टक्के अनुभवी नेते या रचनेत कायम ठेवण्यात आले आहेत. यासोबतच, काँग्रेसने सामाजिक व भौगोलिक प्रतिनिधित्वालाही प्राधान्य दिले आहे. या कार्यकारिणीत 41 टक्के ओबीसी, 19 टक्के अनुसूचित जाती-जमाती आणि 33 महिला सहभागी आहेत. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितलं की, ही कार्यकारिणी म्हणजे नव्या दमाच्या नेतृत्वाचं प्रतीक असून त्यातून महाराष्ट्राच्या सर्व समाजघटकांचा आवाज बुलंद होईल.

Anil Deshmukh : सूड घेण्यासाठी आधी ईडीचा तडका, आता ‘जनसुरक्षा’चा दणका

‘डब्ल्यूडब्ल्यूई’चा खेळ

पत्रकार परिषदेत बोलताना सपकाळ यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, मंत्रिमंडळात असे मंत्री आहेत जे सभागृहात पत्ते खेळतात आणि सभागृहाबाहेर WWE करतात. गृह राज्यमंत्रींच्या कुटुंबाकडे डान्सबार चालवले जात आहेत, पण सरकार त्याकडे डोळेझाक करत आहे. या मंत्र्यांचे राजीनामे घेण्यासाठी काँग्रेसने वेळोवेळी रस्त्यावर आणि सभागृहात आंदोलन केले आहे. पण हे सरकार गेंड्याच्या कातडीपेक्षा जाड आहे. धनंजय मुंडे यांचा राजीनामाही नैतिकतेच्या आधारे नाही, तर समाजाच्या आणि विरोधकांच्या दबावामुळे घेतला गेला.

प्रणिती शिंदे यांच्या विधानावर झालेल्या वादावरही सपकाळ यांनी भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितलं की, प्रणिती शिंदे यांनी कोणत्याही प्रकारे ऑपरेशन सिंदूर वा सैनिकांचा अपमान केलेला नाही. त्यांच्या विधानाचा विपरित अर्थ लावण्यात आला. भाजपाने मोदींचे लष्करी गणवेशातील होर्डिंग्ज लावून सैनिकांच्या पराक्रमाचे श्रेय राजकारणासाठी घेतले. हेच अधोरेखित करण्यासाठी शिंदे यांनी वक्तव्य केले. उलट, भाजपाच्या एका नेत्याने एका महिला लष्करी अधिकाऱ्यांवर अत्यंत खालच्या पातळीचं वक्तव्य केलं होतं, त्यावर भाजप गप्प का होती?

Gadchiroli : मद्यसागरात बेधडक धाड, जलदक्रियेचा वज्राघात

मोदी गप्प

याच पत्रकार परिषदेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही केंद्र सरकारला लक्ष्य केलं. त्यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ संदर्भातील राहुल गांधींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची आठवण करून देत पंतप्रधान मोदींवर टीका केली. राहुल गांधींनी ऑपरेशन सिंदूरवर प्रश्न विचारला, पण पंतप्रधानांनी अद्यापही स्पष्ट उत्तर दिलेलं नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी 30 वेळा युद्धविरामाचा उल्लेख केला, तरीही मोदी गप्प आहेत. ते ट्रम्पचं विधान का खोडून काढत नाहीत? मोदी खोटं बोलत आहेत की ट्रम्प, हे स्पष्ट झालं पाहिजे.

त्यांनी याशिवाय शिमला करार रद्द झाला का, याचा खुलासाही केंद्र सरकारने करावा, अशी मागणी केली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत एक विधान केलं होतं. त्यावर मोदी सरकारने खुलासा दिलेला नाही. ही माहिती देशाच्या सुरक्षेसंदर्भात महत्त्वाची आहे, असं चव्हाण म्हणाले. अतिरेकी अजमल कसाब संदर्भात प्रसिद्ध सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केलेल्या विधानावर उत्तर देताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, कसाबला न्यायालयीन प्रक्रियेनंतर काँग्रेस सरकारच्याच काळात फाशी दिली गेली. उज्ज्वल निकम हे आता भाजपच्या तिकिटावर राज्यसभेत गेले आहेत, त्यामुळे ते राजकीय हेतूनं विधान करत आहेत.

Parinay Fuke : भंडारा जिल्ह्यामध्ये ‘एकच भाऊ’

संघर्षाची धार

या पत्रकार परिषदेला हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी खासदार कुमार केतकर, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, ज्येष्ठ नेते अनंत गाडगीळ आदींची उपस्थिती होती. या उपस्थितीने काँग्रेसने एकत्रितपणे सरकारविरोधात संघर्षाची धार वाढवण्याचा इशारा दिला आहे. संपूर्ण पत्रकार परिषद ही काँग्रेसच्या नव्या प्रवाहाचं आणि सत्ताधाऱ्यांविरोधातील लढ्याचं प्रतीक ठरली. एका बाजूला कार्यकारिणीतून सामाजिक समावेशकता आणि नेतृत्वात ताजेपणा दाखवण्यात आला, तर दुसऱ्या बाजूला सरकारच्या निष्क्रीयतेवर कठोर प्रश्न उपस्थित करण्यात आले. हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टपणे सांगितलं, ही कार्यकारिणी केवळ नेमणूक नव्हे, ही जनतेच्या नव्या विश्वासाची तयारी आहे. आता आमचा आवाज झाकता येणार नाही.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!