
हर्षवर्धन सपकाळ यांनी महायुती सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून विशेष निधी आणून महाराष्ट्राचे अर्थचक्र सुरळीत करावे, अशी टिप्पणी केली.
देशात पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांच्या हातात संपूर्ण सत्ता असावी, आणि महाराष्ट्रात ती मुख्यमंत्र्यांच्या जॅकेटच्या खिशात असावी, असा सत्ताधाऱ्यांचा हट्ट आहे. अशी घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. अकोल्यात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्ला चढवला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुक गेल्या अनेक वर्षांपासून लांबवल्या जात आहेत. 73 आणि 74 घटनादुरुस्ती करून सत्तेचे विकेंद्रीकरण करण्याचा उद्देश होता. मात्र, सत्ताधाऱ्यांची भूमिका याच्या पूर्ण विरुद्ध आहे.

भाजपला सर्व सत्ता केंद्रीत करून ठेवायची आहे. त्यामुळेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत नाहीत, असा आरोप त्यांनी केला. सपकाळ म्हणाले, जर फडणवीस, अजित पवार आणि शिंदेंची नरेंद्र मोदींकडे पत असेल, तर त्यांनी राज्यासाठी विशेष आर्थिक पॅकेज आणून महाराष्ट्राची आर्थिक चक्रे सुरळीत करावी. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफीची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मोदी सरकारवर तूर खरेदीत अपयश आणि शेतकऱ्यांच्या हालअपेष्टांचे आरोप करताना सपकाळ यांनी सांगितले की, तूर बाजारात येण्याआधीच दर कोसळवण्यात आले.
Nagpur : मोदींच्या व्हिजनला नागपूरचा प्रतिसाद, वन नेशन, वन कार्ड प्रत्यक्षात
सत्ता केवळ तिघांत
सरकारने हमीभाव दिला नाही, पण शेतकऱ्यांचे कंबरडे मात्र मोडले. अतिवृष्टी आणि गारपीट नुकसान भरपाई, एसटी कर्मचाऱ्यांचे पगार, ठेकेदारांचे बकाया असे असंख्य मुद्दे त्यांनी मांडले. भाजप नेते सतत मुस्लीम समाजाची काळजी घेत असल्याचे सांगतात. मग भाजपाचे अध्यक्ष किंवा पंतप्रधान मुस्लीम समाजातून का नाही? असा सवाल सपकाळ यांनी उपस्थित केला. तीन तलाक कायदा, वक्फ बोर्ड कायदा या गोष्टी फक्त दिखावा असून, भाजपाचा हा कळवळा निवडणुकीपुरताच असल्याची टीका त्यांनी केली. ते पुढे म्हणाले, भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची मुदत संपली आहे.
मोदी हेही आता 75 वर्षांचे होत आहेत. अशावेळी संघाने मुस्लीम किंवा दलित व्यक्तीला नेतृत्वाची संधी द्यावी. सरसंघचालक मोहन भागवत यांनीही विश्रांती घ्यावी व त्यांच्या जागी आदिवासी वा दलित व्यक्तीला संधी दिली जावी. राज्याच्या कायदा सुव्यवस्था विषयावर बोलताना सपकाळ म्हणाले, राज्यात अवैध धंद्यांनी कळस गाठला आहे. गांजा, अंमली पदार्थांची तस्करी खुलेआम सुरू आहे. गुजरातमधील कांडला बंदरातून मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज राज्यात येत आहेत, पण पोलीस दुर्लक्ष करत आहेत. राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नाही, त्यामुळे कायदा सुव्यवस्थेची दयनीय अवस्था झाली आहे. हे सर्व पाहता, सत्ताधाऱ्यांनी लुटारूंची रचना निर्माण केली आहे. ती संपूर्ण यंत्रणा आपल्या मुठीत ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहेत, असा गंभीर आरोप त्यांनी केला.