ऑगस्ट क्रांती दिनाच्या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन सपकाळांनी नव्या क्रांतीची हाक देत लोकशाही गिळंकृत करणाऱ्या प्रवृत्तींवर प्रहार केला. ‘चले जाव’च्या घोषणांनी मुंबईतून निघालेल्या पदयात्रेत सरकारवर तीव्र घणाघात झाला.
महात्मा गांधींनी 1942 मध्ये दिलेला ‘करो या मरो’चा मंत्र केवळ इतिहास नाही, तर आजची हाक आहे, असे सांगत महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त मुंबईत ठाम आवाजात ही घोषणा केली. देशात आज इंग्रज राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती निर्माण झाली असून लोकशाही व संविधान गिळंकृत करणाऱ्या प्रवृत्ती फोफावत आहेत. आता या प्रवृत्तींना ‘चले जाव’चा इशारा देण्याची वेळ आली आहे, असे त्यांनी जोरदार शब्दात सांगितले.
प्रसारमाध्यमांशी बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, आज महात्मा गांधींचा संदेश आणि स्वातंत्र्यलढ्याची किंमत लोकांनी पुन्हा स्मरावी. हा देश स्वातंत्र्यासाठी रक्त सांडवून, संघर्षाने उभा राहिला आहे. पण आज परिस्थिती पाहता असे वाटते की पुन्हा एकदा नव्या क्रांतीची गरज आहे. नागपूरची ‘चिप’ थैमान घालत आहे, ती संपूर्ण व्यवस्था करप्ट करत आहे आणि लोकांच्या डोक्यात जबरदस्तीने घुसवण्याचा प्रयत्न चालू आहे. हा लोकशाहीचा घात आहे.
Vijay Wadettiwar : ज्याची संख्या भारी, त्याची तितकी हिस्सेदारी
स्वातंत्र्य टिकविण्याची लढाई
प्रदेशाध्यक्षांनी पुढे आवाहन केले, महात्मा गांधींचा खून करणारी प्रवृत्ती, स्त्री-पुरुष समानता नाकारणारी मानसिकता आणि स्पृश-अस्पृशता मानणारी भेदभावी वृत्ती, या सर्व प्रवृत्तींना गाडले पाहिजे. आज जर आपण हा आवाज बुलंद केला नाही, तर पुढची पिढी आपल्याला कधीही माफ करणार नाही. ही लढाई फक्त पक्षाची नाही, तर संविधान व स्वातंत्र्य टिकवण्याची आहे. सपकाळ यांनी पदयात्रेत सहभागी जनतेकडे पाहत ठाम शब्दात ‘चले जाव’चा नारा दिला आणि उपस्थित जनसमूहाने घोषणांनी आसमंत दणाणून टाकला.
या भाषणातून हर्षवर्धन सपकाळ यांनी केवळ ऐतिहासिक दिवसाची आठवण करून दिली नाही, तर थेट सत्ताधाऱ्यांच्या गळ्याशी सवाल ठेवला, असे यामधून दिसून आले. त्यांच्या शब्दात संताप, आव्हान आणि निर्धाराचा संगम होता. जनतेच्या हक्कांवर डाका टाकणाऱ्या आणि संविधानाची पायाभरणी हादरवणाऱ्या प्रवृत्ती कोणत्याही रंगाच्या असोत. त्यांना आता इतिहासाच्या पानावरून मिटवलेच पाहिजे, असे ठणकावत त्यांनी सध्याच्या सरकारच्या कारभारावर तीव्र प्रहार केला.
Ramtek : विकासाचा दरवाजा खुला, राज्यमंत्र्यांचा गतिमान फॉर्म्युला
भारत छोडो
गिरगाव चौपाटीवरील लोकमान्य टिळक पुतळ्यापासून ऑगस्ट क्रांती मैदानापर्यंत काँग्रेसतर्फे भव्य पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेचे नेतृत्व सपकाळ यांच्यासह राष्ट्रपिता महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी केले. गवालिया टँक येथे ‘अंग्रेजो भारत छोडो’ आंदोलनातील हुतात्म्यांना पुष्पांजली वाहून आदरांजली अर्पण करण्यात आली. या वेळी मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड, उपाध्यक्ष राजन भोसले, वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे, चरणसिंग सप्रा, सरचिटणीस संदेश कोंडविलकर, श्रीरंग बर्गे, श्रीकृष्ण सांगळे, ॲड. अमित कारंडे, मधू चव्हाण, भावना जैन, मोनिका जगताप, धनंजय शिंदे यांच्यासह अनेक सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.