महाराष्ट्र

Amaravati : बच्चू कडूंच्या तब्येतीत गंभीर घसरण

Bachchu Kadu : कार्यकर्त्यांमध्ये वाढली अस्वस्थता

Post View : 53

Author

प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू शेतकरी, दिव्यांग आणि ग्रामीण जनतेच्या न्याय्य मागण्यासाठी अन्नत्याग आंदोलन करत आहेत. पाचव्या दिवशी त्यांची प्रकृती गंभीर झाली असून राज्यभरात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.

प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी शेतकरी, दिव्यांग आणि ग्रामीण जनतेच्या न्याय्य मागण्यांसाठी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाला आज पाचवा दिवस लागला आहे. या पाच दिवसांत बच्चू कडू यांनी अन्नाचा एक कणही घेतलेला नाही. त्यामुळे त्यांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. आज सकाळी त्यांना उलट्या झाल्या. त्यांना उठून बसणेही कठीण झाले आहे. ही माहिती समजताच संपूर्ण राज्यभरात त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

बच्चू कडू यांचे आंदोलन फक्त उपोषणापुरते मर्यादित न राहता, सामाजिक आणि राजकीय पातळीवरही मोठा आवाज निर्माण करत आहे. दररोज हजारो कार्यकर्ते आणि सामान्य जनता त्यांच्या भेटीसाठी उपोषणस्थळी येत आहे. अमरावती येथे उपोषण सुरू असून, आता या आंदोलनाच्या लाटेने राज्याच्या राजधानीकडेही लक्ष वळवले आहे.

प्रमुख मागण्यांचा केंद्रबिंदू 

बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांसाठी, दिव्यांगांसाठी आणि ग्रामीण भागातील गरजूंसाठी काही ठोस मागण्या मांडल्या आहेत. शेतमालाला किमान आधारभूत दरावर 20 टक्के अनुदान देण्यात यावे. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी स्वतंत्र मंडळ स्थापन करून 10 लाख रुपयांची आर्थिक मदत आणि संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी, अशा मागण्या त्यांनी शासनासमोर ठामपणे मांडल्या आहेत. त्याचप्रमाणे, दिव्यांग आणि विधवा महिलांना दरमहा 6 हजार रुपये मानधन देण्याचीही मागणी आंदोलनाद्वारे मांडण्यात आली आहे. ग्रामीण भागात घरकुलासाठी शहरासारखेच निकष लागू करावेत आणि किमान 5 लाख रुपयांचे अनुदान लाभार्थ्यांना मिळावे, अशीही जोरदार मागणी करण्यात आली आहे.

बच्चू कडू यांच्या आंदोलनात धनगर समाजाच्या हक्कांवरही भर देण्यात आला आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, धनगर समाजाचे आरक्षण तात्काळ लागू करावे आणि बेरोजगार तरुणांना नोकऱ्यांमध्ये 13 टक्के आरक्षण देण्यात यावे. या मागण्यांवरही सरकारकडून त्वरीत निर्णय अपेक्षित आहे. आज दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बच्चू कडू यांची ऑनलाईन बैठक निश्चित झाली आहे. यावेळी राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हेही उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत आंदोलनामागील प्रमुख मुद्द्यांवर चर्चा होणार असून, विशेषतः कर्जमाफीच्या तारखेसंदर्भात ठोस निर्णय होण्याची शक्यता आहे.

सामाजिक पाठिंबा वाढतोय

राज्यभरातून सर्वांचे लक्ष या बैठकीकडे लागले आहे. यातून आंदोलनाच्या पुढील दिशा ठरवली जाणार आहे. बच्चू कडू यांनी याआधीच स्पष्ट केले आहे की, मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाहीत. राज्यभरातून विविध पक्षांचे नेते बच्चू कडू यांना भेटण्यासाठी अमरावतीत दाखल होत आहेत. माजी मंत्री महादेव जानकर यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दर्शवला. त्याचप्रमाणे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टीही उपोषणस्थळी पोहोचले आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गंभीर चर्चा झाली. बच्चू कडू यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत असल्याने वैद्यकीय पथकही उपोषणस्थळी पोहोचले आहे. त्यांच्यावर सतत लक्ष ठेवले जात आहे. त्यांच्या वजनात चार किलोने घट झाली असून, त्यांच्या तब्येतीची स्थिती चिंतेत टाकणारी आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!