संघर्षांनी भरलेल्या जगात समरसतेचा प्रकाश फक्त हिंदू धर्मच देऊ शकतो, असं परखड विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं. हिंदू धर्म म्हणजे मानवतेचा धर्म आहे, आणि आज जगाला याचीच सर्वाधिक गरज आहे, असा जागतिक संदेश त्यांनी दिला.
एका संघर्षांनी भरलेल्या आणि गोंधळलेल्या जागतिक परिस्थितीत जर कोणी शांती, समरसता आणि परस्परसन्मान यांचे खरे शिक्षण देऊ शकतो. तर तो धर्म म्हणजे हिंदू धर्म, असं स्पष्ट, प्रबोधनपर आणि स्फूर्तीदायक वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केलं. आपल्या अभ्यासपूर्ण आणि विचारप्रवण भाषणात भागवत यांनी हिंदू धर्माच्या सार्वत्रिक मूल्यांची, त्याच्या स्वीकारशीलतेची आणि ऐतिहासिक त्यागाची उजळणी करत एक वेगळ्याच पातळीवरचा संदेश समाजाला दिला.
मोहन भागवत म्हणाले, आज जगभरात इतके संघर्ष आहेत कारण विविधतेत सामंजस्य कसे साधायचे हे लोकांना कळत नाही. पण हिंदू धर्म हेच शिकवतो की विविधता ही टकरावाची नव्हे, तर समृद्धीची खूण आहे. ते पुढे म्हणाले, हिंदू धर्म म्हणजे केवळ भारतापुरता मर्यादित नसलेला धर्म नाही. तो एक जागतिक जीवनपद्धती आहे, असा धर्म जो निसर्गाशी, माणुसकीशी आणि सत्याशी सुसंगत आहे.
समाजासाठी जबाबदारी
भागवत यांनी धर्माच्या सामाजिक रूपावर विशेष भर दिला. आपल्यासाठी ‘धर्म’ म्हणजे फक्त ईश्वरभक्ती नव्हे, तर सत्य. धर्म म्हणजे जीवनातील कर्तव्य, समाजासाठी योगदान आणि परस्परसंवाद. या धर्माने आपल्याला एकमेकांचा स्वीकार, संवाद आणि समजूत दिली आहे, असं ते म्हणाले. हिंदू धर्माची खरी शिकवण म्हणजे, प्रत्येक जण आपला वेगळा मार्ग निवडू शकतो, पण अंतिम सत्य एकच आहे. त्यामुळे कोणीच दुसऱ्याच्या श्रद्धेला बाधा आणू नये. कोणालाही आपला मार्ग बदलायला भाग पाडू नये, हा उदारमतवादी विचार त्यांनी उपस्थितांसमोर ठेवला.
भागवत यांच्या भाषणातील सर्वात भावनिक आणि राष्ट्राभिमान जागवणारा भाग म्हणजे हिंदू धर्मासाठी दिलेले बलिदान. त्यांनी छत्रपती संभाजीराजांवर आधारित ‘छावा’ या चित्रपटाचा संदर्भ देत म्हटलं, धर्मासाठी किती लोकांनी आपले प्राण दिले, शिरच्छेद झाले, पण कोणीही धर्म सोडला नाही. ही आपल्या परंपरेची महत्ता आहे. केवळ राजे-महाराजच नव्हे, तर सामान्य माणसांनीही धर्मासाठी बलिदान दिलं कारण त्यांचा ठाम विश्वास होता, आपला धर्म सत्यावर आधारित आहे. ते अंतिम सत्य म्हणजे, जरी आपण बाह्यतः वेगळे असलो, तरी आपल्या अस्तित्वात आपण सारे एकच आहोत, असा भावनिक आणि प्रेरणादायी संदेश त्यांनी दिला.
BJP : न्यायाधीश नियुक्तीवर वादळ, भाजपने उघडला काँग्रेसचा ‘फ्लॅशबॅक फोल्डर’
निसर्गनिष्ठ, वैश्विक आणि सर्वसमावेशक
भागवत यांनी सांगितले की, हिंदू धर्म आज ‘हिंदू’ म्हणून ओळखला जातो कारण भारतीयांनी तो सर्वप्रथम शोधला. पण त्याचं मूळ हे निसर्गात, मानवतेत आणि वैश्विक सृष्टीच्या नियमांत आहे. म्हणूनच हा धर्म कोणाच्याही अधिपत्याचा नसून सर्वांचा आहे. हा धर्म प्रत्येक हृदयाला जागृत करतो. कारण तो माणसाला फक्त देवाजवळ नव्हे, तर माणसाजवळ घेऊन जातो. यातच जगासाठीची खरी दिशा दडलेली आहे, अशा शब्दांत त्यांनी हिंदू धर्माच्या व्यापकतेचा गौरव केला.
मोहन भागवत यांचं हे संपूर्ण भाषण म्हणजे केवळ हिंदू धर्माची महती सांगणारा एक प्रासादिक संदेश नव्हता, तर तो एक सखोल विचारमंथन होता की या संघर्षमय जगात जर कोणी खऱ्या अर्थाने समरसतेची, ऐक्याची आणि मानवतेची शिकवण देत असेल, तर तो धर्म म्हणजे हिंदू धर्मच आहे. या भाषणातून त्यांनी भारतीय परंपरेचा अभिमान जागवला आणि जागतिक स्तरावर हिंदू धर्माची उपयुक्तता अधोरेखित केली. त्यांचा संदेश स्पष्ट होता की, विविधतेतून ऐक्य, सहिष्णुतेतून शांतता आणि धर्मातून मानवता!