महाराष्ट्र

Buldhana : तीन दशकांनंतर शेतीचा रस्ता खुला

Vidarbha : महसूल विभागाच्या प्रयत्नाने शिवार उजळला

Author

बोडखा निरोड शिवारातील 30 वर्षांपासून बंद पाणंद रस्ता शेतकऱ्यांसाठी पुन्हा खुला झाला. महसूल विभागाच्या पुढाकाराने हे शक्य झाले आहे.

शंभर दिवसांच्या विशेष राजस्व अभियानांतर्गत एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. गेली तीन दशके बंद असलेला बोडखा निरोड शिव दांड शिवारातील पाणंद रस्ता 9 मे रोजी अधिकृतपणे शेतकऱ्यांसाठी खुला करण्यात आला. महसूल विभागाच्या सक्रिय सहभागातून आणि स्थानिक शेतकऱ्यांच्या सहकार्याने हा महत्त्वपूर्ण रस्ता पुन्हा वापरासाठी सुसज्ज करण्यात आला आहे. त्यामुळे या परिसरातील सुमारे 30 ते 35 शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

रस्त्याच्या उद्घाटनप्रसंगी तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या हस्ते नारळ फोडून व पूजाअर्चा करून विधिवत शुभारंभ करण्यात आला. महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक शेतकरी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती यावेळी दिसून आली. या रस्त्याची अवस्था अनेक वर्षांपासून अतिक्रमण, झाडाझुडपांची वाढ, तसेच प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अत्यंत दयनीय झाली होती. परिणामी, शेतकऱ्यांना शेतीशी संबंधित दैनंदिन कामांमध्ये मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.

Vijay Wadettiwar : घड्याळाचे काटे जुळले तरी काँग्रेसला फरक पडत नाही

अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद

राज्य शासनाच्या शंभर दिवसांच्या विशेष राजस्व अभियानात तालुक्यातील पारंपरिक रस्ते, पाणंद मार्ग आणि महसूल नकाशातील सार्वजनिक रस्त्यांची मोकळीक युद्धपातळीवर सुरू आहे. या उपक्रमाचा सकारात्मक प्रभाव आता दिसून येत आहे. बोडखा निरोड शिवारातील रस्त्याचे काम हे या अभियानातील एक आदर्श उदाहरण ठरले आहे. महसूल यंत्रणेच्या सूचक मार्गदर्शनाखाली रस्त्याच्या अडथळ्यांची दखल घेण्यात आली. त्यानंतर या कामाला गती मिळाली.

तहसीलदार प्रशांत पाटील यांनी स्वतः पुढाकार घेत शेतकऱ्यांशी संवाद साधत रस्त्याच्या मोकळीकचे महत्त्व पटवून दिले. त्यांच्या प्रेरणादायी नेतृत्वामुळे शेतकऱ्यांनी स्वेच्छेने आपली अडथळा निर्माण करणारी जमीन मोकळी केली. कोणताही वाद न होता शेतकऱ्यांनी हा निर्णय सहकार्याने घेतला. यामुळे प्रशासन आणि स्थानिक नागरिक यांच्यातील विश्वासाचे नाते अधिक दृढ झाले आहे.

Nagpur : रस्ता उघडायचा होता, पण न्यायालयाचा दरवाजा आधी उघडला

सकारात्मक बदल

पाणंद रस्ता खुला झाल्यामुळे आता या भागातील शेतकऱ्यांसाठी शेतीमाल वाहतूक, यंत्रसामग्रीचा वापर, तसेच आपत्कालीन सेवा अधिक सुलभ होणार आहेत. रस्त्याची मोकळीक ही केवळ एक भौगोलिक सुधारणा नसून ग्रामविकासाच्या दिशेने उचललेले ठोस पाऊल आहे. यामुळे शिवारातील जीवनमानात लक्षणीय सुधारणा होण्याची शक्यता आहे.

उपक्रमात नायब तहसीलदार विकास शिंदे, मंडळ अधिकारी राऊत, भुर्जे, तसेच तलाठी कैलास जगताप यांचे विशेष सहकार्य लाभले. महसूल विभागाचे इतर कर्मचारीही या कार्यात तनमनधनाने सहभागी झाले. या सामूहिक प्रयत्नामुळेच हा रस्ता पुन्हा जनतेच्या सेवेत आला आहे.

रस्ता खुला झाल्याने आता शेतकरी आपल्या शेतातील माल सहजतेने घरी आणू शकतात. पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या अडचणी, यंत्रसामग्रीच्या हालचालीतील अडथळे आणि दैनंदिन शेतीकामांची अडचण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. या रस्त्याच्या पुनर्संचयितीमुळे शेतीला गती मिळेल. तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यास मदत होईल.

 

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!