
भाजप नेत्या नवनीत राणा वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत. हैदराबाद न्यायालयाने त्यांना समन्स बजावले असून, 28 फेब्रुवारी रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
अमरावतीच्या माजी खासदार आणि भाजप नेत्या नवनीत राणा यांना हैदराबाद न्यायालयाने समन्स बजावले आहे. एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी आणि त्यांच्या पक्षाविरोधात केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे त्यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नवनीत राणा यांनी 15 सेकंदांचा इशारा देत ओवैसी बंधूंना अप्रत्यक्ष धमकी दिल्याचा आरोप आहे.

नवनीत राणा यांनी 8 मे 2024 रोजी हैदराबादमध्ये भाजपच्या उमेदवार माधवी लता यांच्या प्रचारसभेत एमआयएम खासदार ओवैसी बंधूंवर निशाणा साधला होता. आम्हाला फक्त 15 सेकंद लागतील, असे वक्तव्य करत त्यांनी थेट आव्हान दिले. 2013 मध्ये अकबरुद्दीन ओवैसी यांनी 15 मिनिटांसाठी पोलिस हटवा असे वक्तव्य केले होते. त्यावर प्रत्युत्तर देत नवनीत राणा यांनी ओवैसी बंधूंना अप्रत्यक्ष इशारा दिला.
राजकीय डावपेच
नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक वादग्रस्त दाम्पत्य म्हणून ओळखले जाते. 2019 मध्ये नवनीत राणा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याने अमरावती लोकसभा मतदारसंघातून खासदार झाल्या, मात्र त्यानंतर त्यांनी भाजपचा विचारधारा स्वीकारत महाविकास आघाडीविरोधात आक्रमक भूमिका घेतली.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांनी मुंबईतील तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन हनुमान चालीसा पठणाचा मुद्दा उचलून धरला होता. त्या घटनेनंतर त्यांना अटक झाली होती, मात्र त्यानंतर भाजपने त्यांना बक्षीस म्हणून पक्षात अधिकृत प्रवेश दिला. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने त्यांना उमेदवारी दिली, पण त्यांचा पराभव झाला. त्यांचे पती रवी राणा मात्र बडनेरा मतदारसंघातून आमदार झाले.
NCP Vs NCP : साहेबांच्या नेत्यांनी घेरले दादांच्या शिलेदारांना
राणा विरुद्ध ओवैसी
नवनीत राणा यांचे वक्तव्य हिंदुत्ववादी भूमिकेचा भाग असल्याचे भाजप समर्थकांचे म्हणणे आहे. भाजप नेत्यांनी त्यांच्या समर्थनार्थ यापूर्वीही आक्रमक पवित्रा घेतला आहे. मात्र, त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे त्यांना वारंवार कायदेशीर अडचणींना सामोरे जावे लागले आहे.
नवनीत राणा या प्रकरणावर ठाम असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांनीच आपल्या विधानाचा पुनरुच्चार करत, हा हिंदुस्थान आहे, येथे पाकिस्तानच्या आवलादींनी आम्हाला धमक्या देण्याचा प्रयत्न करू नये. आम्ही त्यांना प्रत्युत्तर देऊ,”असे ठणकावून सांगितले.
MSEDCL : महावितरणच्या वीजदर वाढीचा प्रस्ताव; नागरिक अन् उद्योग जगत अस्वस्थ
महाराष्ट्र भाजपसाठी डोकेदुखी
महाराष्ट्रात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर अनेकदा राजकारण झाले आहे. मात्र नवनीत राणांचे वक्तव्य पक्षाला त्रासदायक ठरू शकते. महाराष्ट्रातील राजकीय समीकरण पाहता भाजपला याचा फायदा होईल की तोटा, हे आगामी काळात स्पष्ट होईल.