महायुतीत दोन मंत्र्यांमध्ये बैठकीच्या अधिकारावरून सुरू झालेल्या वादावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे. अडचण असेल तर थेट माझ्याशी बोला, असा स्पष्ट संदेश देत त्यांनी समन्वय आणि संवादाचा मार्ग सुचवला आहे.
सत्ताधारी पक्षात अंतर्गत विसंवादाचे सूर पुन्हा एकदा बाहेर पडले आहेत. राजकारण सध्या महायुतीतील दोन नेत्यांमधील मतभेदांमुळे गडबडलेले दिसत आहे. राज्यमंत्री माधुरी मिसाळ आणि मंत्री संजय शिरसाट यांच्यात बैठकांवरील अधिकार आणि प्रशासनातील हस्तक्षेप यासंदर्भात सुरू झालेला शाब्दिक पत्रव्यवहार सध्या चांगलाच चर्चेचा विषय ठरतोय.
शिवसेना शिंदे गटाचे शिरसाट यांनी अलीकडेच एका अधिकृत पत्रातून आपली नाराजी व्यक्त केली होती. ज्या माध्यमातून त्यांनी राज्यमंत्रीकडे असलेल्या अधिकारांच्या सीमारेषा ओलांडल्या जात आहेत असे अप्रत्यक्षपणे दाखवून दिले. त्यावर प्रत्युत्तर देताना मिसाळ यांनी स्पष्ट केलं की, त्या फक्त जनतेच्या प्रश्नांवर अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत आहेत आणि त्या त्यांच्या अधिकारक्षेत्रात येत असल्याने कोणीही प्रश्न उपस्थित करू नये.
Sudhir Mungantiwar : अतिक्रमणातून अधिकाराकडे, उभारली हक्कांची दीपमाळ
तोडगा काढू
या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेत मतभेद मिटवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी थेट संदेश दिला आहे की, मंत्र्यांनी आपापसात वाद निर्माण न करता एकमेकांशी संवाद साधावा. जर काही अडचण असेल तर थेट माझ्याशी येऊन बोला, मी निश्चितच त्यावर तोडगा काढू शकेन.
फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले की, राज्यमंत्रीदेखील शासनाचा एक महत्त्वाचा भाग आहेत. निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत त्यांचं स्थान आहे. त्यांनीही बैठका घेण्याचा अधिकार आह. मात्र जिथे धोरणात्मक निर्णय घेतले जातात तिथे वरिष्ठ मंत्र्यांची संमती आवश्यक आहे. त्यामुळे वाद नको, समन्वय हवा, असं सूचक भाष्य मुख्यमंत्र्यांनी केलं.
समन्वयातून सत्ता
शिरसाट – मिसाळ यांचा वाद सत्ताधारी पक्षासाठी धोक्याची घंटा मानला जात आहे. सत्ताधारी पक्षातील मतभेद जर रस्त्यावर दिसू लागले, तर जनतेत संभ्रम निर्माण होतो आणि त्याचा फटका कामकाजावर होतो. त्यामुळे सत्तेचा गाभा म्हणजे संवाद आणि सहकार्य हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य सत्तेतून आलेला शहाणा सल्ला ठरतोय.
संजय शिरसाट आणि माधुरी मिसाळ यांच्यातील मतभेद हे केवळ सत्तेतील अंतर्गत वाद नसून, ते प्रशासन आणि जनतेच्या हिताच्या दृष्टीने गंभीर बाब आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला ‘थेट माझ्याशी बोला’ हा संदेश केवळ दोन्ही नेत्यांसाठीच नाही, तर संपूर्ण मंत्रिमंडळासाठी एक राजकीय मर्यादेचा धडा आहे. कारण, सत्तेचे वाद जर ‘लोकांच्या कामांवर’ परिणाम करत असतील, तर तो वाद वैयक्तिक न राहता, तो सार्वजनिक अपयशात परिवर्तित होतो. आणि म्हणूनच फडणवीसांचा ‘संवादाचा मंत्र’ हा आता मंत्रिमंडळात रुजवण्याची खरी गरज आहे.
Devendra Fadnavis : महाराष्ट्राच्या मनात जे आहे, तेच पुन्हा उमटेल
शुभेच्छा देण्यात राजकारण नाही
उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जाऊन शुभेच्छा दिल्याची राजकीय चर्चा रंगली असताना फडणवीसांनी ती थेट फेटाळली. यात राजकारण पाहू नका. आम्हीही उद्धवजींना शुभेच्छा दिल्या आहेत. शुभेच्छा देणे म्हणजे राजकीय संकेत नव्हे, असे त्यांनी स्पष्ट केले.
पुण्यातील ड्रग्ज पार्टी प्रकरणावरही फडणवीसांनी मौन न बाळगता प्रतिक्रियेत स्पष्ट केलं की, “ही माहिती माध्यमांमधून मिळाली असून, पोलिसांकडून सविस्तर माहिती घेतल्यावर अधिक बोलता येईल.” राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे एकनाथ खडसे यांचे जावई या प्रकरणात अडकले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
महायुतीत सध्या दोन वेगवेगळ्या प्रवाहात वावरणारे मंत्री आणि राज्यमंत्री यांच्यात निर्माण होणारा संघर्ष, महायुतीसाठी आव्हानात्मक ठरू शकतो. फडणवीसांनी दाखवलेली परिपक्वता आणि शांत संयमी भूमिका हे याचे उत्तर असू शकते. मात्र, आता यावर कृती दिसायला हवी, केवळ संवादाचा आग्रह पुरेसा ठरणार नाही.