महाराष्ट्र

Chandrapur : कोळसा नगरी ते इंडस्ट्रियल पावरहाऊस 

Industrial Development : चंद्रपूर जिल्ह्याच्या औद्योगिक वाटचालीला नवे बळ

Author

चंद्रपूर जिल्हा औद्योगिक क्रांतीच्या उंबरठ्यावर उभा आहे. एका दिवसात 12 कंपन्यांनी भरीव गुंतवणुकीसह रोजगारनिर्मितीची ग्वाही दिली. राज्यातील सर्वाधिक 17 हजार 431 कोटींच्या गुंतवणुकीसह चंद्रपूर आता महाराष्ट्राचा नवीन उद्योग हब ठरणार आहे.

महाराष्ट्र राज्य शासनाच्या “औद्योगिक गुंतवणुकीसाठी अनुकूल वातावरण निर्मिती” या 100 दिवसीय विशेष कार्यक्रमांतर्गत चंद्रपूर जिल्ह्यात अभूतपूर्व औद्योगिक क्रांती घडणार आहे. एकाच दिवसात 12 नामवंत कंपन्यांसोबत 17 हजार 431 कोटी रुपयांचे सामंजस्य करार (MoU) करण्यात आले आहे. या गुंतवणुकीमुळे थेट 14 हजार 100 नव्या नोकऱ्यांचा मार्ग मोकळा होणार आहे.

कार्यक्रमांतर्गत 12 कंपन्यांनी चंद्रपूर जिल्ह्यात विविध औद्योगिक क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. दीनानाथ अलॉय स्टील प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने पाचशे कोटींची गुंतवणूक करत 700 रोजगार निर्मितीचा संकल्प केला आहे. डब्ल्यूसीएल भटाडी 729 कोटींची गुंतवणूक करून 425 रोजगार देणार आहे. जी. आर. कृष्णा फेरो अलॉय प्रा. लि. 750 कोटी गुंतवून एक हजार लोकांना रोजगार उपलब्ध करून देणार आहे. भाग्यलक्ष्मी स्पिनिंग्स प्रा. लि. ने एक हजार 53 कोटींच्या गुंतवणुकीसह 750 रोजगार देण्याची तयारी दर्शवली आहे. त्याचप्रमाणे, चमन मेटालिक लिमिटेड 450 कोटी गुंतवून 650, तर गोवा स्पंज अँड पावर लिमिटेड दोन हजार कोटी गुंतवून तब्बल एक हजार 500 रोजगार निर्माण करणार आहे.

कोट्यवधींचा करार

कार्निवल इंडस्ट्रीज प्रा. लि. 320 कोटींची गुंतवणूक करत 550 नोकऱ्या निर्माण करणार आहे. पाटील रेल इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. 100 कोटींसह 250 रोजगार देणार आहे. या यादीत सर्वात मोठी गुंतवणूक करणारी कंपनी म्हणजे ग्रेटा एनर्जी लिमिटेड, जी एकटीच 10 हजार 319 कोटींचा गुंतवणूक प्रस्ताव घेऊन आली असून ती सात हजार थेट रोजगार निर्माण करणार आहे. डीएनडी एंटरप्रायझेस प्रा. लि. शंभर कोटी गुंतवून 250 रोजगार, तर कालिका स्टील अँड पॉवर प्रा. लि. एक हजार 100 कोटी गुंतवून एक हजार रोजगार देणार आहे. जेपी असोसिएट्स लॅबोरेटरीज ही कंपनी दहा कोटींची गुंतवणूक करून 25 रोजगार निर्माण करणार आहे. या सर्व करारांमुळे चंद्रपूर जिल्हा औद्योगिक दृष्टिकोनातून राज्यातील आघाडीच्या जिल्ह्यांपैकी एक ठरणार आहे.

Vijay Wadettiwar : शिक्षणातही खोटेपणाचा अंधार, संतप्त झाले वडेट्टीवार 

विविध क्षेत्रांमध्ये ठसा

चंद्रपुरातील या करारांमधून स्पष्ट होते की, चंद्रपूर जिल्हा केवळ कोळसा वा ऊर्जेपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो नव्या औद्योगिक पर्वाची सुरुवात करत आहे. सर्वाधिक सात कंपन्या इस्पात क्षेत्राशी संबंधित आहेत. तर इतर गुंतवणूकदारांनी खनिज प्रक्रिया, जैवइंधन, रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर, संरक्षण उत्पादन व रासायनिक प्रयोगशाळा या विविध क्षेत्रांमध्ये आपला ठसा उमटवण्याची तयारी दर्शवली आहे. विशेष बाब म्हणजे, राज्य शासनाने नागपूर विभागासाठी ठरवलेला 14 हजार कोटींचा गुंतवणूक लक्ष्य केवळ चंद्रपूर जिल्ह्यानेच 17 हजार 431 कोटींच्या करारांद्वारे पार केला आहे. हे राज्यात कोणत्याही एकाच जिल्ह्याने आतापर्यंत मिळवलेले सर्वाधिक गुंतवणुकीचे यश आहे.

नव्या शहराचे स्वप्न

जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्यासह जिल्हा उद्योग केंद्र व उद्योग विभागाच्या टीमने नवीन उद्योगांना आकर्षित करण्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून नियोजनबद्ध मेहनत घेतली. ‘मैत्री’ संस्थेच्या माध्यमातून विविध उद्योग समूहांशी संपर्क साधण्यात आला व त्यांच्या गरजेनुसार चंद्रपूरमध्ये जागा, सुविधा व सवलती प्रदान करण्याचे आश्वासन देण्यात आले. कार्यक्रमामुळे चंद्रपूर जिल्हा केवळ कोळसा जिल्हा नव्हे, तर एक बहुविध औद्योगिक केंद्र म्हणून नावारूपास येणार आहे. लाखो तरुणांच्या रोजगाराच्या अपेक्षा या गुंतवणुकीमुळे पूर्णत्वास जाणार आहेत. भविष्यातील चंद्रपूर हे “इंडस्ट्रियल स्मार्ट डिस्ट्रीक्ट” म्हणून उदयास येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येतो.

ऐतिहासिक उपक्रमाचा भाग म्हणून 11 एप्रिल रोजी “जिल्हा गुंतवणूक शिखर परिषद – 2025” चे आयोजन चंद्रपुरातील नेहरू योजना भवन येथे करण्यात आले. या परिषदेला भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्यासह अनेक मुख्य अधिकारी उपस्थित होते.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!