नागपूर जिल्ह्यात गडकरी-फडणवीसांच्या नेतृत्वाखाली प्लास्टिक कचऱ्याच्या पुनर्वापरातून साकार झाला पर्यावरणपूरक रस्त्यांचा नवा अध्याय.राज्याच्या 100 दिवस योजनेतून साकारलेला हा प्रकल्प महाराष्ट्राच्या शाश्वत विकासाला नवसंजीवनी देणारा ठरत आहे.
नागपूर जिल्ह्यात प्लास्टिक आणि कचऱ्याचा पुर्नवापर करून पर्यावरणपूरक आणि टिकाऊ रस्ता बांधण्यात आला आहे. हा प्रयोग महाराष्ट्रातील विकासाच्या नकाशावर एक नवा अध्याय ठरतो आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील सेलू-कळम येथे या तंत्रज्ञानाचा यशस्वी उपयोग करून रस्त्याचे बांधकाम करण्यात आले.
राज्य शासनाच्या 100 दिवसांच्या योजने अंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक दोनने या उपक्रमाची अंमलबजावणी करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करत महाराष्ट्राच्या रस्त्यांच्या गुणवत्तेत आमूलाग्र बदल घडविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
Banwarilal Purohit : माजी राज्यपाल मोदींबद्दल असे काही बोलले की…
सततची प्रयोगशीलता फळाला
नागपूर जिल्हा हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे कार्यक्षेत्र आहे. त्यांनी देशभर रस्त्यांच्या क्षेत्रात सुरू केलेले प्रयोग आता स्थानिक पातळीवरही प्रभाव टाकताना दिसत आहेत. त्यांच्या प्रेरणेने आणि मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात राज्य शासनाने प्लास्टिक कचऱ्याचा रस्ते निर्मितीसाठी वापर करत पर्यावरणपूरक आणि दीर्घकाल टिकणारे रस्ते तयार करण्याच्या दिशेने यशस्वी पावले उचलली आहेत.
सूरू झालेल्या अभिनव प्रकल्पात कचऱ्यातील प्लास्टिकचा बिटुमिन मॅकडम पद्धतीने रस्त्यात वापर करून पर्यावरणावरील दुष्परिणाम टाळण्याचे महत्त्वाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यामुळे प्लास्टिक कचऱ्याचा योग्य वापर होऊन प्रदूषणाचा धोका कमी होत असून पर्यावरणाची शाश्वतता जपली जात आहे.
प्रात्यक्षिक प्रशिक्षण
उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने कळमेश्वर तालुक्यातील अभियंते, हॉटमिक्स प्लँटचे मालक आणि कंत्राटदारांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यकारी अभियंता चंद्रशेखर गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष प्लँटवर तांत्रिक प्रात्यक्षिके घेण्यात आली. बिटुमिन रस्त्याच्या निर्मितीतील विविध टप्प्यांचे संपूर्ण प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यात आले.
हॉटमिक्स प्लँटवर विविध प्रकारच्या खडीचे अचूक प्रमाण, प्लास्टिक मिक्सिंग प्रक्रिया, मिश्रणाचे प्रत्यक्ष निरीक्षण आणि इलेक्ट्रॉनिक-संक्रमण पद्धती यांचा अभ्यास करून अभियंत्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची संपूर्ण माहिती मिळाली. या प्रशिक्षणात विभागाचे 38 अभियंते सहभागी झाले होते.
प्रगतीला नवे आयाम
प्रकल्पाची जबाबदारी उपविभागीय अभियंता रूपेश बोदडे यांच्याकडे सोपविण्यात आली होती. कंत्राटदार आनंद अशोक बुधराजा यांनी रस्ता बांधकामाच्या प्रत्यक्ष प्रक्रियेत पुढाकार घेतला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्गदर्शनाखाली सेलू-कळंब मार्गावर रस्ता बांधण्यात आला आहे. यामुळे ग्रामीण भागातील संपर्क सुविधा अधिक मजबूत झाली आहे.हा प्रयोग केवळ पर्यावरणपूरकतेचे उदाहरण नाही तर शासकीय यंत्रणा, अभियंते व तंत्रज्ञ यांच्यातील समन्वयातून उभा राहिलेला भविष्याच्या रचनेचा आदर्श आहे.
गडकरी आणि फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्य प्रशासनाने दाखवलेली ही दिशा आता महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यांसाठी प्रेरणादायी ठरते आहे.पर्यावरण संवर्धन, विज्ञानाधिष्ठित विकास आणि शाश्वत तंत्रज्ञानाच्या प्रभावी एकत्रिततेतून महाराष्ट्राला नवा आकार मिळत आहे. नागपूर जिल्हा हा त्या परिवर्तनाच्या केंद्रस्थानी ठळकपणे उभा आहे.