अकोल्यात शिंदे गटात वादळ आधीच आलंय, पण आता ते उघडपणे गरजायला लागलंय. गोपीकिशन बाजोरियांच्या खेळीवर कार्यकर्ते पेटलेत, आणि पक्षात नाराजी नाट्य सुरू झाले.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकोल्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. एकीकडे सर्व राजकीय पक्ष संघटन बांधणीला लागले आहेत. जिल्ह्यात भाजपातील अंतर्गत नाराजी उघडपणे दिसून आली आहे. त्यानंतर आता शिवसेना शिंदे गटात सुद्धा नाराजीचा शिधा उसळत आहे. पक्षात इन्कमिंग तुफान सुरू असताना, काही नेत्यांच्या स्वार्थराजकारणामुळे पक्षातले निष्ठावान कार्यकर्ते धुमसत आहेत, असे सांगण्यात येत आहे. या साऱ्या घडामोडींमध्ये एका नावावर पुन्हा एकदा चर्चेचा झोत पडला आहे, ते म्हणजे शिवसेना संपर्क प्रमुख गोपीकिशन बाजोरिया.
भाजपचे ज्येष्ठ नेते व बाळापूर मतदारसंघाचे माजी आमदार नारायण गव्हाणकर यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश करताच, अकोल्याच्या राजकीय समीकरणांमध्ये भूकंप झाला. हा प्रवेश ‘बाजोरिया ब्रँडेड’ असला तरी, त्यांच्या नेतृत्वावरच आता सवाल उपस्थित होत आहेत. गव्हाणकर यांच्या प्रवेशानंतरच जिल्ह्यात एकाचवेळी चार जिल्हा प्रमुखांची घोषणा करण्यात आली. काहीजणांचे अधिकार कमी झाले, तर काही नव्यांनी प्रवेश केला. मात्र या हालचालींमुळे कार्यकर्त्यांमध्ये असंतोषाचा ज्वालामुखी खदखदतो आहे.
कार्यकर्त्यांतून संताप
गोपीकिशन बाजोरिया यांच्यावर कार्यकर्त्यांच्या नाराजीचे शस्त्र रोखले गेले आहे. पक्षांतर्गत काहीजण सांगतात की, बाजोरिया हे वैयक्तिक फायद्यासाठी पक्षाचे नुकसान करत आहेत. त्यांनी काम करणाऱ्या निष्ठावान कार्यकर्त्यांचे पाय खेचण्याचे, त्यांना दुय्यम वागणूक देण्याचे राजकारण सुरू केले आहे. बाजोरिया यांचा स्वभाव कार्यकर्त्यांना गुलाम बनविण्याचा आहे. अनेक कार्यकर्ते सांगतात की, जो बाजोरियांच्या मताला पाठिंबा देत नाही, त्यांच्यावर पक्षश्रेष्ठींकडून दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्यांना कमजोर केले जाते, ही धोक्याची घंटा आहे.
बाजोरिया यांचा राजकीय झुकाव आता महाविकास आघाडीच्या दिशेने वळत असल्याचे शिंदे गटातूनच बोलले जात आहे. विधानसभेची उमेदवारी न मिळाल्याने अस्वस्थ झालेल्या बाजोरिया यांचा फोकस आता विधान परिषदेकडे वळला आहे. मात्र वसंत खंडेलवाल यांच्या विजयामुळे त्यांच्यासमोर अडथळ्यांची रांग उभी आहे. काहीजण तर म्हणतात की, प्रसंगी बाजोरिया महायुती सरकारशी नातं तोडून महाविकास आघाडीशी हातमिळवणी करण्याची तयारी करत आहेत.
खऱ्या कार्यकर्त्यांचं श्रेय हरण
अकोल्यातील शिंदे गटाची वाढ सामान्य कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस मेहनत करून घडवली. मात्र पक्षाच्या यशाचं श्रेय बाजोरिया यांच्यासारख्या नेत्यांकडे गेल्याने, कार्यकर्ते नाराज आहेत. ‘काहीजण खुर्चीसाठी धडपडतात, आम्ही मैदानात राबतो, पण आमची दखल कुणी घेत नाही, असा सूर कार्यकर्त्यांमध्ये उमटतो आहे.
महायुतीतच जर मतभेदांची साखळी सुरू राहिली, तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत याचा सरळ फायदा वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसला होईल, हे स्पष्ट आहे. ग्रामीण भागातून वंचितला बळ मिळेल, तर शहरी भागात काँग्रेसला संधी मिळेल. हीच बाब अकोल्यातील महायुतीतील काही वरिष्ठ नेत्यांना चिंतेत टाकणारी आहे.
यावर आणखी एक भर म्हणजे बाजोरिया आणि विद्यमान आमदार साजिद खान पठाण यांच्यातील ‘घनिष्ठ’ मैत्री. शिंदे गटातूनच बोलले जातं की, अकोल्यातील काही वरिष्ठ नेत्यांनीच पठाण यांच्या विधानसभेतील यशासाठी ‘गुप्त’ सहकार्य केलं. जर ही माहिती खरी असेल, तर बाजोरियांच्या डावपेचांमागे मोठं षड्यंत्र असण्याची शक्यता नाकारता येणार नाही.