अकोला भारतीय जनता पार्टीमध्ये सध्या अंतर्गत गृहयुद्ध सुरू आहे. महापालिका निवडणूक जवळ येत असताना हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये अकोला जिल्ह्यामध्ये भाजपला यश मिळालं. परंतु विधानसभा निवडणुकीमध्ये विशेषतः अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये भाजप मट्टीपलित झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची प्रचंड शक्तिशाली सभा अकोला शहरांमध्ये झाली. यानंतरही भाजपच्या पारंपारिक मतदारांनी पक्षाकडे पाठ फिरवली. त्यामुळे अकोला शहरामध्ये भाजपचे पाणीपत झाले आहे. विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपमधील अनेक पदाधिकाऱ्यांनी विरोध व्यक्त केला आणि पक्षाचे काम केले नाही. अशा सर्व पदाधिकाऱ्यांची उमेदवारी महापालिका निवडणुकीमध्ये नाकारण्याची तयारी स्थानिक पातळीवर झाली आहे.
संदर्भात कुणाकुणाची नावे कापली जाणार याची यादी ‘द लोकहित लाइव्ह’ने अत्यंत जबाबदारीने आधीच प्रकाशित केली आहे. कोणाचीही उमेदवारी कापली जाणार नाही, असा बचाव आता काही जण करीत आहेत. असे असेल तर भाजपने एकही नाव कापले जाणार नाही. सर्वांना उमेदवारी मिळेल असे अधिकृतपणे लेखी जाहीर करावे, अशी मागणी देखील होत आहे.
नाव कापण्याच्या यादीमध्ये दोन जणांचे पंख पूर्णपणे छाटण्यासाठी भाजपचे स्थानिक काही नेते खूप मोठ्या प्रमाणावर ताकदीचा वापर करीत आहेत. हे दोन जण म्हणजे अजय शर्मा आणि माजी नगरसेवक गिरीश गोखले हे आहेत. अजय शर्मा यांच्याकडून काही स्थानिक नेत्यांना उघडपणे विरोध केला जात आहे. त्यांचा विरोध अत्यंत टोकाचा आहे. त्यामुळे अजय शर्मा हे पक्षाच्या विरोधात कसं काम करीत आहेत, हे भाजपच्या प्रदेश कार्यकारणीला पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये अकोला महापालिका निवडणुकीत अजय शर्मा आणि त्यांच्याशी संबंधित लोकांना प्रतिनिधित्व मिळू नये, यासाठी फि ल्डिंग लावण्यात आली आहे.
गडकरींचा ठाम पाठिंबा
राजकारणातून पूर्णपणे गेम करण्यासाठी यादीत असलेले दुसरे नाव म्हणजे माजी नगरसेवक गिरीश गोखले. गिरीश गोखले हे केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांचे कट्टर समर्थक आहेत. नितीन गडकरी यांचा पूर्ण आशीर्वाद गिरीश गोखले यांच्यावर आहे. त्यामुळे गिरीश गोखले यांचे नाव अकोल्याच्या राजकीय वर्तुळामध्ये सन्मानाने घेतले जाते. परंतु आपल्याला विरोध करीत असल्यामुळे गिरीश गोखले यांचा पत्ता देखील कट करण्याचा प्रयत्न स्थानिक पातळीवरून प्रचंड शक्तीने केला जात आहे.
अशात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी गिरीश गोखले यांचे ढाल बनले, तर गोखले यांचा पत्ता कापणे स्थानिक काही नेत्यांना प्रचंड अवघड होणार आहे. त्यामुळे आधी नागपुरातील रेडिसन ब्ल्यू येथे वातावरण निर्मिती केली जात आहे. याच ठिकाणी गडकरी यांचे निवास आहे. गडकरी यांनी अकोल्याच्या बाबतीत हस्तक्षेप करू नये अशी आग्रही विनंती त्यांना केली जाणार आहे. अर्थात गडकरी त्याला कसा प्रतिसाद देतात यावर अनेकांचे भवितव्य अवलंबून आहे.
अजय शर्मा आणि गिरीश गोखले यांच्याशी कसे निपटायचे यासाठी सध्या काही ठिकाणी बैठक घेतल्या जात आहे. अनेक उमेदवारांची नावं यंदाच्या महापालिका निवडणुकीच्या यादीमध्ये दिसणार नाहीत. त्यामुळे ऐन महापालिका निवडणुकीमध्ये भाजपला मोठ्या संघर्षाचा सामना करावा लागू शकतो. महापालिका निवडणुकीमध्ये भाजपचा पराभव झाला तर जे पाप ‘टिपू सुलतान’ नावाने झालेले आहे, त्याचे प्रायश्चित्त कसं करणार? असा प्रश्न आता काहींना पडला आहे.
हिंदुत्वाच्या विरोधात झालेल्या या पापाच्या प्रायश्चितापेक्षा काहींना सूड उगवणे महत्त्वाचं असल्याने पक्षापेक्षा व्यक्तिगत स्वार्थाला जास्त महत्त्व दिले जात असल्याचं टीका आता अकोला भाजपच्या सर्व स्तरातून होऊ लागली आहे. ज्या पद्धतीने मूर्तिजापूरचे आमदार हरिश पिंपळे आणि आणि आमदार प्रकाश भारसाखळे यांचा गेम करण्याचा प्रयत्न झाला. त्याच पद्धतीने अकोल्यात महापालिका निवडणुकीपूर्वी काहींचा गेम होणार आहे.
बंडखोरीची शक्यता
महापालिका निवडणूक नव्हे अकोला भाजपमधून अजय शर्मा आणि गिरीश गोखले यांना ‘बोल्ड’ करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. विशेष म्हणजे अकोल्यामध्ये दुसरे नेतृत्व तयार होऊ नये, ही काही भाजपच्या नेत्यांची इच्छा आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीमध्ये भाजपला अनेक अडथळ्यांची शर्यत पार करावी लागू शकते.
पक्षाच्या पातळीवर शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अशी महायुती झाली तर भारतीय जनता पार्टीला महापालिकेतील अनेक प्रभागांमधील जागा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी सोडाव्या लागणार आहेत. ज्या प्रभागांमध्ये जागा महायुती मधील मित्रपक्षांना सोडावे लागतील, त्याची तयारी आतापासूनच केली जात आहे. मात्र जागा वाटपानंतर भाजपमध्ये यंदा मोठ्या प्रमाणावर बंडखोरी बघायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
भाजपमधील ज्या पदाधिकाऱ्यांना नगरसेवक पदाची निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारी मिळाली नाही. त्यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून घेण्यासाठी तारेवरची कसरतही भाजपला करावी लागणार आहे. महापालिकेमध्ये महापौर आणि स्थायी समिती सभापती ही दोन पदं प्रचंड प्रतिष्ठेची आणि महत्त्वाची असतात. भाजपकडून महापौर पदाचा चेहरा कोण असेल आणि स्थायी समिती कोणाला मिळेल? याची देखील उत्सुकता आहे. महापालिका निवडणुकीला अद्याप काही महिने अवकाश असला, तरी आतापासूनच राजकीय डावपेच सुरू झाले आहेत.