अकोला जिल्ह्याचा इतिहास दंगल आणि हिंसाचाराने भरलेला असला तरी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या घटनांपासून बचाव करण्यासाठी अकोला पोलिसांनी कंबर कसली होती.
अकोला शहर नेहमीच आपल्या संवेदनशील इतिहासामुळे चर्चेत राहिलंय. 1992-93 वर्षाची दंगली असोत किंवा इतर 2003 वर्षाची हिंसक घटना. या शहराने अनेक आव्हाने पाहिली आहेत. अनेक अधिकारी पोस्टिंगला येत नव्हते. परंतु काही अधिकारी आणि कलेक्टर अकोल्याला असे मिळाले की त्यांनी आपला कार्यकाळ चांगलाच गाजवला. यामध्ये राज्यातील पोलीस दलामध्ये सर्वात प्रसिद्धी मिळवलेले पोलीस अधिकारी होते राकेश मारिया. ज्यांनी 1985-86 मध्ये अकोल्याचे पोलीस अधीक्षक म्हणून आपली छाप पाडली होती.
36 वर्षाच्या कार्यकाळानंतर त्यांनी होमगार्डचे महासंचालक पदावरून निवृत्त झाले होते. आता, तब्बल 40 वर्षांनंतर, अकोल्याच्या रस्त्यांवर पुन्हा एका नव्या नावाचा जयघोष घुमतोय. ते म्हणजे अकोल्याचे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांचे. नुकत्याच पार पडलेल्या गणेशोत्सवात अकोल्याच्या तरुणांनी ‘हमारा एसपी कैसा हो, अर्चित चांडक जैसा हो’ अशा घोषणांनी आकाश दणाणून सोडले. ही उत्स्फूर्तता फक्त एका मंडळापुरती मर्यादित नव्हती, तर अनेक गणेश मंडळांनी अर्चित यांच्या कार्याची प्रशंसा करत हा जयघोष केला.
Charan Waghmare : भंडाऱ्याच्या प्रशासक राजला घेरणार जनतेचा आवाज
पोलिसांचे कडेकोट नियोजन
अकोल्याचा इतिहास पाहता, गणेश विसर्जन मिरवणुकीत शांतता राखणे हे पोलिसांसाठी नेहमीच मोठे आव्हान राहिले आहे. पण यंदा अर्चित चांडक यांनी आपल्या चाणाक्ष नियोजनाने आणि कठोर मेहनतीने हे आव्हान यशस्वीपणे पार पाडले. 40 वर्षांपूर्वी राकेश मारिया यांनी अकोल्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत लोकांचा विश्वास जिंकला होता. ताजनापेठेत मिरवणुकीदरम्यान लोक त्यांना अक्षरशः डोक्यावर घेऊन नाचले होते. ‘मोरया मोरया, मारिया मारिया’ अशा घोषणा दिल्या होत्या. आता अर्चित चांडक यांच्याबाबतीतही असाच उत्साह दिसला.
फरक एवढाच की, यावेळी लोकांनी त्यांना डोक्यावर घेतलं नाही. पण त्यांच्या नावाच्या घोषणांनी अकोल्याचे आकाश गाजवले. अर्चित चांडक यांच्या खांद्यावर आता केवळ स्टार नव्हे, तर मोठी जबाबदारीही आहे. अकोल्याच्या जनतेला त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. अकोल्यात गणेशोत्सवाच्या काळात हिंसाचार किंवा गोंधळाची भीती नेहमीच असते. पण यंदा अर्चित चांडक यांनी आपल्या नेतृत्वाखाली पोलिसांना अक्षरशः रस्त्यावर उतरवले. प्रत्येक चौकात, प्रत्येक गल्लीत पोलिसांचा पहारा होता. ड्रोन कॅमेरे, सीसीटीव्ही यंत्रणा आणि सतर्क पोलीस दल यांच्या साहाय्याने त्यांनी संपूर्ण मिरवणुकीवर करडी नजर ठेवली. यामुळे अकोल्यात गणेश विसर्जन शांततेत पार पडले.
IPS Archit Chandak : ‘मोक्का’च्या जाळ्यात अडकला अकोल्याचा डॉन
नागरिकांनीही त्यांच्या या कामगिरीचे तोंडभरून कौतुक केले. एका लहान मुलीने तर मिरवणुकीत आपल्या आईला उत्साहाने सांगितले, ‘आई, बघ! एसपी अर्चित चांडक चाललेत. ही उत्स्फूर्तता दाखवते की, अर्चित यांनी केवळ तरुणांच्याच नव्हे, तर लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांच्या मनात स्थान मिळवले आहे.