महाराष्ट्र

Nagpur Police : सीएमच्या गावात वाहतुकीसाठी अर्चित चांडक उतरले मैदानात

IPS Archit Chandak : शहरातील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल

Author

नागपूरच्या रस्त्यांवर गोंधळाचे जाळे फाडत एक तरुण आयपीएस नव्या शिस्तीची मशाल घेऊन उतरले आहेत. अर्चित चांडक यांच्या धडाडीमुळे आता मुख्यमंत्र्यांच्या गावात वाहतूक नव्या वळणावर येण्याची चिन्हं स्पष्ट दिसू लागली आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून नागपूरमधील वाहतूक व्यवस्थेबाबत तिढा कायम होता. केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांचे हे गाव आहे. परंतु तरीही नागपूरमधील वाहतूक व्यवस्थेबाबत परिस्थिती इतकी बिकट झाली होती की, यावर कोणता तोडगा काढावा हे कोणालाही कळत नव्हतं. अमितेश कुमार यांच्यासारखे अधिकारी नागपूर शहरात पोलीस आयुक्त होऊन गेले. पण त्यावेळी शहराच्या वाहतूक विभागाची जबाबदारी सारंग आव्हाड यांच्यावर होती.

वाहतूक विभागाची जबाबदारी सारंग आवाड यांच्याकडे असतानाही त्यांनी वाहतुकीसाठी कोणतेही भरीव काम केले नाही. त्यामुळे चिन्मय पंडित यांच्यानंतर नागपूर शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी यासाठी कोणीही गंभीरतेने लक्ष दिले नाही. प्रचंड मोठ्या कालखंडानंतर आता नागपूर शहराच्या वाहतूक विभागाला तरुण आयपीएस अधिकारी लाभला आहे, त्यांचे नाव आहे अर्चित चांडक. आपल्याला काहीतरी वेगळं करून दाखवायचं आहे, या जोश आणि जिद्दीमधून अर्चित चांडक आता मैदानात उतरले आहेत.

समस्या लागतील मार्गी

वर्धा रोडवरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी अर्चित चांडक यांनी अनेक ठिकाणी उजवे वळण (Right Turn) बंद केले. असाच बदल त्यांनी अनेक भागांमध्ये केला आणि त्याचा परिणामही आता दिसत आहे. आता नागपूरच्या अनेक भागांमध्ये देखील असाच प्रयोग राबविण्यात येणार आहे. यासाठी अर्चित चांडक स्वतः प्रत्येक स्पॉटवर जाऊन सहकारी अधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार आहेत. इतकंच नाही तर परिसरातील नागरिकांची मते देखील चांडक जाणून घेत आहेत. शहरात अनेक सिग्नलवरील डावे वळण (Left Turn) वाहनांमुळे जाम असते. त्यामुळे पोलिसांची वाहने, ॲम्बुलन्स, फायर ब्रिगेड आणि इतर आपत्कालीन वाहनांसाठी, असे डावे वळण सतत सुरू असणे गरजेचे असते.

Shiv Sena : संजय गायकवाडांच्या बेताल बोलण्यावर सामंत यांचा संताप 

वाहतुकीला शिस्त लावताना आता नागपूर पोलिसांनाही आव्हान पेलावे लागणार आहे. याशिवाय शहरातील अनेक रस्त्यांवर आणि चौकांमध्ये ड्रेनेजसाठी खड्डे खोदले आहेत. यामुळे अपघाताचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे सीएमचे गाव ट्रॅफिक मुक्त राहावे यासाठी अर्चित चांडक यांचे प्रयत्न सुरू आहेत. याला महानगरपालिका आणि इतर विभागांची सकारात्मक जोड मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. एकटे अर्चित चांडक आणि नागपूर पोलीस यासाठी पुरेसे होऊ शकत नाहीत. महापालिका, महावितरण, महसूल विभाग अशा सर्व विभागांनी एकत्र येऊन पोलिसांना साथ दिली, तर गडकरी आणि फडणवीसांचे गाव ट्रॅफिक जाम फ्री सिटी नक्कीच होऊ शकते.

नव्या शिस्तीचा श्वास

नागपूर शहराच्या रस्त्यांवर नव्या शिस्तीचा श्वास आता जाणवू लागला आहे. अर्चित चांडक यांचा उत्साह आणि धडाडीने नागपूरकरांमध्येही नव्या आशेचा किरण जागवला आहे. वाहतूक सुधारण्याचा हा प्रवास एकट्याने शक्य नाही, पण जर प्रत्येक नागपूरकरने आपली जबाबदारी ओळखली, शिस्त पाळली, तर हे शहर केवळ वाहतूक व्यवस्थेतच नव्हे तर एक आदर्श ‘स्मार्ट सिटी’ म्हणूनही देशात नावाजले जाईल. आता वेळ आहे हातात हात घालून नागपूरच्या उज्ज्वल भविष्याला आकार देण्याची.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!