नागपूरच्या वाहतूक गोंधळाला आता चपळ बुद्धी आणि मैदानात उतरलेल्या नेतृत्वाची साथ मिळाली आहे. विकासपुरुष नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नगरीत IPS लोहित मतानी रस्त्यांवर उतरले असून, ट्रॅफिक शिस्तीचा नवा अध्याय सुरू झाला आहे.
विदर्भाची राजधानी, शिक्षण आणि उद्योगांचे उगमस्थान, आणि आता झपाट्याने होत असलेलं ‘स्मार्ट सिटी’मध्ये रूपांतर. पण या प्रगतीच्या प्रवासात एक अडथळा सतत ठाण मांडून बसलेला आहे, तो म्हणजे वाहतूक व्यवस्था. नागपूरच्या रस्त्यांवर सिग्नल ब्रेक, हेल्मेटशिवाय धावणाऱ्या दुचाकी, चुकीचं पार्किंग, अपघातप्रवण ठिकाणं आणि लोकांच्या नाकी नऊ आणणारी ट्रॅफिक जॅम्स, या साऱ्याला शेवटी एक उपाय सापडला आहे. तो म्हणजे, IPS लोहित मतानी यांचा थेट मैदानात उतरण्याचा निर्णय.
केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नागपूरने विकासाची वाट धरली असली, तरी हा विकास पुरा होण्यासाठी रस्त्यांची आणि ट्रॅफिकची शिस्त ही अत्यावश्यक बाब आहे. त्यामुळेच मतानी यांची DCP ट्रॅफिक पदावर झालेली नियुक्ती ही केवळ एक प्रशासकीय बदल नसून, नागपूरच्या नागरी जीवनात मोठा टप्पा ठरतोय.
डिजिटल पुराव्यांची कारवाई
लोहित मतानी हे नाव सायबर गुन्हेगारीविरोधातील कारवायांमुळे आधीच ओळखले जाते. त्यांच्या नावाशी ‘स्मार्ट’, ‘टेक्नोसेवी’ आणि ‘मिशन मोड’ हे शब्द घट्ट जोडले गेले आहेत. पण आता त्याच मतानी यांनी AC केबिनमधून थेट रस्त्यावर उडी घेतली आहे. त्यांनी 3 जुलै रोजी पदभार स्वीकारताच, सायंकाळपर्यंत शहरातील प्रमुख सिग्नल, रस्त्यांची स्थिती, बेशिस्त पार्किंग झोन यांची स्वतः ड्रोन व लाईव्ह फीडच्या साह्याने पाहणी केली. ‘मी रस्त्यावर आहे, कारण इथूनच बदल सुरू होतो’, असं स्पष्ट विधान करत मतानी यांनी त्यांच्या कार्यशैलीचा स्पष्ट संदेश दिला आहे. वाहतूक व्यवस्था ही केवळ पोलिसांची जबाबदारी नसून, ती नागपूरकरांचीसुद्धा आहे, हे पटवून देण्यासाठी त्यांनी एक नवा प्रयोग सुरू केला आहे, ‘ट्रॅफिक मित्र’ उपक्रम.
‘ट्रॅफिक मित्र’ उपक्रम अंतर्गत प्रत्येक नागपूरकर आता ट्रॅफिक व्यवस्था सुधारण्यासाठी पोलिस यंत्रणेसोबत काम करू शकतो. विशेष व्हॉट्सअॅप नंबरवरून नागरिक रस्त्यांची दुर्दशा, चुकीचं पार्किंग, हेल्मेटविना प्रवास करणारे, दारू पिऊन वाहन चालवणारे, याबाबत फोटो किंवा व्हिडीओ पाठवू शकतात. हे संपूर्ण मॉड्यूल डिजिटल पुराव्यांवर आधारित कारवाई करत असून, फक्त तक्रार नाही तर समस्येच्या मूळापर्यंत जाऊन काम करण्यावर भर देण्यात येतो.
अपघात टाळण्यासाठी तंत्रज्ञान
सायबर क्राईममध्ये विशेष शिक्षण घेतलेल्या मतानी यांनी नागपूरच्या वाहतूक व्यवस्थेत डिजिटल तंत्रज्ञानाची जोड दिली आहे. ट्रॅफिक सिग्नल्सचे समायोजन, ‘ब्लॅक स्पॉट्स’ ओळखणे, अपघातांचे डेटा अॅनालिसिस, रस्त्यांची स्मार्ट डिझाईन, आणि पोलिसांच्या मोबाईल युनिट्सची पुनर्बांधणी, हे सगळं त्यांचं प्राथमिक टार्गेट आहे. सध्याच्या घडीला शहरातील 30 पेक्षा जास्त ठिकाणी रस्त्यांचे काम सुरू आहे. त्यामुळे निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीचा अभ्यास करून, मतानी यांनी टायमिंग-आधारित रूट प्लॅनिंग आणि डायनॅमिक ट्रॅफिक फ्लो अॅप विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच नागरिकांना ट्रॅफिक जाममधून वाचवण्यासाठी एक ‘नागपूर ट्रॅफिक अलर्ट’ अॅपही सादर केलं जाणार आहे.
केवळ दंडात्मक कारवाईवर भर न देता, मतानी यांच्या मॉडेलमध्ये समुपदेशन, सामाजिक संवादी मोहिमा आणि शाळांमध्ये ट्रॅफिक साक्षरता उपक्रम यांचा समावेश आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, “शिस्त ही कायद्याची भीती म्हणून नव्हे, तर सुरक्षिततेच्या जाणिवेने तयार व्हायला हवी. पूर्वी ट्रॅफिक DCP अर्चित चांडक यांनी नागपूरच्या रस्त्यांवर शिस्तीची पायाभरणी केली होती, आणि आता त्या पायाभरणीवर लोहित मतानी बदलाचा बुलडोझर घेऊन मैदानात उतरले आहेत. त्यांनी केवळ परिस्थितीवर भाष्य न करता, ती बदलायची जबाबदारी अंगावर घेतली आहे.
