महाराष्ट्र

सरकार बदलले IAS नंतर आता IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या

राज्यभरात होणार प्रशासकीय फेररचना

Author

राज्यात नवीन सरकार आल्यानंतर प्रशासकीय फेरबदल सुरू झाली आहेत. अलीकडेच आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली. लवकरच आयपीएस अधिकारी देखील बदलले जाऊ शकतात.

महाराष्ट्रामध्ये महायुतीचे सरकार पुन्हा एकदा सत्तेवर आले आहे. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी सूत्र स्वीकारल्यानंतर सरकारमध्ये पूर्ण ताकदीने कामाला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री पदाची सूत्र स्वीकारल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासकीय फेरबदल सुरू केले आहेत. वरिष्ठ दर्जाच्या आयएएस अधिकाऱ्यांचे बदली आदेश अलीकडेच काढण्यात आलेत. यानंतर आता जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांच्या बदल्या होण्याची दाट शक्यता आहे.

नवीन सरकारमध्ये अद्यापही पालकमंत्री पदाची जबाबदारी मंत्र्यांना देण्यात आलेली नाही. प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्री ठरल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या बदलीची शक्यता व्यक्त केली जात आहे. या बदलीनंतर पोलीस अधीक्षक आणि उपायुक्त दर्जाचे अधिकारी बदलले जाणार आहेत. सर्वसाधारणपणे नवीन वर्षामध्ये बदल्यांचा हा पोळा फुटेल असे सांगण्यात येत आहे.

सोयीने Transfer Order

नव्याने स्थापन झालेल्या सरकारमध्ये अद्यापही 17 मंत्र्यांनी पदभार स्वीकारलेला नाही. त्यामुळे अनेक विभागातील अधिकारी अद्यापही संभ्रमात आहे. जोपर्यंत सरकारचे काम मंत्र्यांकडून पूर्णपणे सुरू होत नाही तोपर्यंत बदलीसाठी कसा प्रयत्न करायचा असा प्रश्न अधिकाऱ्यांना पडला आहे. मंत्री अद्याप स्थिरस्थावर झाले नसल्याने अधिकारी देखील काम आणण्यासाठी पुढे येत नसल्याचे दिसत आहे.

सध्या मुख्यमंत्र्यांकडे गृह आणि ऊर्जा विभाग आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे महसूल विभागाचा पदभार आहे. याशिवाय आकाश फुंडकर यांनी कामगार मंत्री म्हणून सूत्र स्वीकारली आहेत. राधाकृष्ण विखे पाटील आणि गिरीश महाजन हे देखील जलसंपदा मंत्री म्हणून रुजू झाले आहेत. मात्र अद्यापही काही मंत्री मंत्रालयामध्ये दाखल झालेले नाहीत. आयएएस आणि आयपीएस दर्जाच्या बदल्या अनुक्रमे चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयाअंतर्गत येतात. त्यामुळे या दोन विभागातील बदल्यांबाबत कोणतीही अडचण सध्या नाही.

अलीकडेच वरिष्ठ आयएएस अधिकारी बदलले गेले. त्यानंतर आता नवीन वर्षामध्ये आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया राबवली जाईल, असे संकेत आहेत. त्यानंतर कार्यरत होणारे मंत्री आपापल्या पद्धतीने सोयीचे अधिकारी नियुक्त करतील असे सांगितले जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रशासकीय यंत्रणेतील अधिकारी सध्या ‘वेट अँड वॉच’ करीत आहेत. मंत्री पूर्णवेळ कार्यरत झाल्यानंतर सर्वच विभागांमध्ये अधिकारी आपापली बदली करून घेण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.

राहणार CM ची नजर

महायुती सरकारमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या मंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नजर राहणार आहे. स्वीय सहाय्यक नेमताना देवेंद्र फडणवीस यांचे नियंत्रण राहणार आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत मंत्र्यांच्या कंपूतील लोकांना फारच सावधगिरी लागणार आहे. कोणत्याही कृतीमुळे महायुती सरकारवर डाग लागणार नाही याची काळजी मुख्यमंत्र्यांसह सर्वच मंत्र्यांना घ्यावी लागणार आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!