शिवसेनेतून भाजपमध्ये आलेल्या जॅकी रावलानी यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे भंडाऱ्याच्या राजकीय वर्तुळात भूकंप आला आहे.
शिवसेनेमधून भारतीय जनता पार्टीमध्ये आलेल्या जॅकी रावलानी यांनी राजकीय भूकंप घडविणारा खुलासा केला आहे. पत्रकार परिषद घेत त्यांनी आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्यावर थेट आरोपाचे ‘बाण’ सोडले आहेत. निवडणुकीत भाजपचा पराभव झाला. त्यांच्या भाजपच्या पराभवासाठी भोंडेकर यांनी पाण्यासारखा पैसा ओतला. भाजपमधील अनेकांना यासाठी रक्कम मिळाली. कोणाला किती रक्कम मिळाली, याचा जाहीर खुलासा रावलानी यांनी केली. त्यामुळं आता नरेंद्र भोंडेकर सहभागी असलेल्या महायुतीत मोठी खळबळ उडाली.
नरेंद्र भोंडेकर यांनी भाजपच्या पराभवासाठी पैशांचे वाटप कसे केले हे रावलानी यांनी सांगितले. भाजपमधून 20 लोकांनी अलीकडेच राजीनामा दिली. त्यातील 18 लोकांनी भाजपशी गद्दारी केली, असं रावलानी यांनी सांगितलं. आपण 2009 पासून शिवसेनेत होतो. कोणाला किती पैसे वाटले, याचा पूर्ण हिशोब आपल्या डायरीत लिहून आहे. पक्षाच्या भंडारा जिल्ह्यातील ‘कोअर टीम’मध्ये आपण होतो. त्यामुळं हा सगळा व्यवहार आपल्या माध्यमातून झाल्याचंही रावलानी यांनी सांगितलं.
‘डबलगेमर’ घाबरले
आपण शिवसेनेतून भाजपमध्ये आलो आहोत. त्यामुळं भाजपच्या सगळ्या बातम्या शिवसेनेला देणारे घाबरले. हे सगळे पदाधिकारी नरेंद्र भोंडेकर यांचे मुखबीर आहेत असा, थेट हल्ला रावलानी यांनी केला. 2019 मध्ये नरेंद्र भोंडेकर यांनी अपक्ष निवडणूक लढवली. त्यावेळी आर्थिक नियोजन आपल्याकडे होते. मंजिरी पनवेलकर, जया हिंगणे, गोपाल धुर्वे आणि आणखी एक पदाधिकारी वगळता सर्वांना भाजपच्या विरोधात पैसे दिल्याचा खळबळजनक दावा रावलानी यांनी केला.
भाजपच्या एकूण 16 पदाधिकाऱ्यांनी अपक्ष उमेदवार नरेंद्र भोंडेकर यांच्यासाठी काम केलं. भाजपच्या सगळ्या कमकुवत बाजू ही मंडळी भोंडेकर यांना आतापर्यंत पुरवित होते. त्यामुळंच भाजपच्या सर्व बुथप्रमुख, शक्ती केंद्र प्रमुखांची यादी भोंडेकर यांना मिळाली. 2024 मध्येही निवडणुकीत या सर्वांनी भाजपच्या विरोधात काम केलं. गद्दारी करणाऱ्या अनेकांना नरेंद्र भोंडेकर यांनी वेगवेगळी कामं मिळवून दिल्याचंही रावलानी यांनी सांगितलं.
नावंच सांगितली
भाजपमधून राजीनामा देणाऱ्यांना मजकूर तयार करून दिला गेला. काही मजकूर दुसऱ्याचा आहे. भाजपमधून राजीनामा देणारे पक्षाच्या विरोधातच काम करत आहोत. सुनील मेंढे यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. त्यावेळी देखील हिच टीम काम करीत होती. आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या इशाऱ्यावरच भाजपच्या विरोधात काम झालं. भोंडेकर यांनी मोठा सुरूंग भाजपला भंडाऱ्यात लावला. त्यामुळंच मेंढे यांचा पराभव झाला, असं रावलानी यांनी सांगितलं.
भंडाऱ्यात शिवसेनेचं वेगळं अस्तित्व नाही. भाजपच्या वोटबँकेचा शिवसेनेला फायदा होतो. परंतु मैत्रीचा चेहरा दाखवत भाजपच्या पाठित खंजीर खुपसण्यात आल्याचा आरोप रावलानी यांनी केला. ज्यांनी भाजपच्या विरोधात पत्रकार परिषदेत गरळ ओकली त्यांना लाखोंचा लाभ मिळणार आहे. 20 ते 50 लाख रुपयांचा हा व्यवहार असल्याचा थेट आरोप रावलानी यांनी केला.
