
नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली भव्य जनता दरबार पार पडला. राज्यभरातून आलेल्या नागरिकांच्या समस्या ऐकून त्यावर त्वरित कार्यवाहीचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. नागपूरमध्ये पार पडलेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जनता दरबार केवळ औपचारिक बैठक न राहता, जनतेशी थेट संवाद आणि समस्यांवरील उपाययोजना यासाठी एक प्रभावी व्यासपीठ ठरले आहे. राजकारणाच्या केंद्रस्थानी जनता हे सूत्र ठेवत फडणवीस यांनी राज्यभरातून आलेल्या हजारो नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले आणि संबंधित विभागांना तत्काळ निर्देशही दिले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी शनिवारी नागपूरच्या सिव्हिल लाईन्समधील मुख्यमंत्री सचिवालय येथे हा जनता दरबार आयोजित केला होता. या दरबाराला विदर्भासह राज्याच्या विविध जिल्ह्यांतून तब्बल पाच हजारांहून अधिक नागरिक आपापल्या समस्या घेऊन उपस्थित होते. या गर्दीवरून जनतेतून या उपक्रमाला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद स्पष्ट झाला.

समस्यांचा आढावा
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, दर महिन्याला नागपूरमध्ये जनता दरबार घेतो आणि जनतेच्या समस्यांना प्राथमिकतेने सोडवण्याचा प्रयत्न करतो. याआधीच्या दरबारातही हजारोंच्या संख्येने नागरिक आले होते. आम्ही प्रत्येक तक्रार नोंदवून ती संबंधित विभागांकडे पाठवतो आणि त्यावर कार्यवाही झाली की नाही याचीही नंतर चौकशी करतो. हा उपक्रम केवळ ऐकून घेण्यापुरता नाही तर समस्येचे निराकरण होईपर्यंत पाठपुरावा करण्यासाठी आहे.
Mahayuti : शेतकऱ्यांच्या ताटात अडथळा टाकल्यास, बँकांवर गुन्हा ठोकणार
या दरबारात नागपूर, चंद्रपूर, अकोला, वर्धा, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अमरावती, यवतमाळ, तसेच पुणे, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद आदी जिल्ह्यांतून आलेल्या नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या. नोकरी, शिक्षण, आरोग्य, शासकीय योजनांची अंमलबजावणी, शेतकरी मदत, अपंग अनुदान, निवृत्तीवेतन, रस्ते आणि पाणीपुरवठा अशा विविध प्रश्नांवर चर्चा झाली. दरबारात आलेल्या अनेक नागरिकांनी समाधान व्यक्त करताना सांगितले की, मुख्यमंत्र्यांपर्यंत थेट पोहोचता येत आहे, हेच आमच्यासाठी मोठे आहे. आम्ही जेव्हा तहसील, जिल्हा कार्यालयात गेलेलो तेव्हा आमच्या तक्रारी कुणी ऐकल्या नाहीत. पण इथे आम्हाला संधी मिळाली.
जनसंपर्क मोहीम
हा दरबार केवळ समस्या ऐकण्यासाठी नाही तर त्यावर त्वरित कार्यवाहीसाठी असल्याचं स्पष्ट चित्र उपस्थितांमध्ये दिसून आलं. मुख्यमंत्र्यांच्या या लोकाभिमुख उपक्रमामुळे नागपूरसह संपूर्ण विदर्भात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आहे, आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे एक प्रभावी जनसंपर्क अभियान ठरू शकते, असा राजकीय वर्तुळात सूर आहे.
राज्याच्या प्रत्येक नागरिकाचा आवाज सरकारपर्यंत पोहोचावा आणि समस्यांचे निराकरण व्हावे, ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कळकळ आणि कटिबद्धता या दरबारातून पुन्हा सिद्ध झाली. आगामी काळात हा दरबार आणखी व्यापक आणि ठोस परिणाम देणारा ठरेल, अशी जनतेत अपेक्षा आहे.