अकोला शहरात जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याने मोठा भूचाल निर्माण केला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी चार हजारांहून अधिक बनावट प्रमाणपत्रांचा पर्दाफाश करून प्रशासनाच्या निष्क्रियतेवर जोरदार प्रहार केला आहे.
अकोला शहरात जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याच्या काळ्या कारनाम्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे. माजी खासदार आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी या प्रकरणात गंभीर आरोप करत प्रशासनाच्या निष्क्रियतेवर बोट ठेवले आहे. त्यांनी चार हजारांहून अधिक बनावट जन्म प्रमाणपत्रांच्या तपासात ‘बनवाबनवी’ झाल्याचा दावा केला आहे. आधार कार्ड आणि शपथपत्रांमधील जन्मतारखांमधील विसंगती दर्शवणारी शंभर जणांची यादी त्यांनी प्रशासनाला सादर केली. या घोटाळ्याच्या पडद्याआड लपलेल्या सत्याचा शोध घेण्यासाठी सोमय्या सातत्याने पाठपुरावा करत आहेत.
घोटाळ्याने अकोला शहरातील प्रशासकीय यंत्रणेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. गुरुवारी सोमय्या यांनी रामदास पेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच, जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना भेटून घोटाळ्याच्या गंभीर स्वरूपाची माहिती दिली. यावेळी त्यांच्यासोबत आमदार रणधीर सावरकर, खासदार अनुप धोत्रे, महानगराध्यक्ष जयंत मसने आणि माजी महापौर विजय अग्रवाल उपस्थित होते. सोमय्या यांनी या प्रकरणाला महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या घोटाळ्यांपैकी एक संबोधले आहे.
तपासातील ढिसाळपणा
अकोला तहसील कार्यालयात 4 हजार 849 जन्म प्रमाणपत्रांचे अर्ज दाखल झाले होते. यापैकी केवळ 24 अर्ज फेटाळण्यात आले, तर 3 हजार 953 अर्जांना मंजुरी देण्यात आली. मात्र, उर्वरित अर्जांमधील बनावट कागदपत्रांचा तपास न झाल्याचा गंभीर आरोप सोमय्या यांनी केला. त्यांनी पुराव्यासह सादर केलेल्या यादीत आधार कार्ड आणि शपथपत्रांमधील जन्मतारखांमधील तफावत स्पष्ट दिसून येते. तरीही, पोलिसांनी केवळ 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास मर्यादित ठेवल्याने संशयाची सुई अधिक गडद होत आहे.
सोमय्या यांनी या घोटाळ्याला राष्ट्रीय सुरक्षेशी जोडले आहे. बनावट जन्म प्रमाणपत्रांचा वापर हा गंभीर गुन्हा आहे. यामुळे देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांनी प्रशासनाला अपात्र अर्जदार आणि त्यांना पाठबळ देणाऱ्या दलाल व अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. विशेष तपास पथक स्थापन करण्याची मागणी करत त्यांनी राज्याच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांना पत्र लिहिले आहे. हा घोटाळा उघडकीस आणण्यासाठी सोमय्या यांचा अथक प्रयत्न आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेवर टिका यामुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.
