
शिवरायांचा अपमान करणाऱ्या फरार प्रशांत कोरटकरला अखेर कोल्हापूर पोलिसांनी तेलंगणातून अटक केली आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात मोठी चर्चा रंगली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अपमानास्पद विधान करणारा फरार आरोपी प्रशांत कोरटकर अखेर पोलिसांच्या ताब्यात आला आहे. कोल्हापूर पोलिसांनी कोरटकरला तेलंगणातून अटक केले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कोरटकर फरार झालेला होता. त्याला अटक करण्याची मागणी महाराष्ट्रात जोर धरत होती. मात्र आता याला यश आले आहे.
प्रशांत कोरटकरवर इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पोलिस मागील 25 फेब्रुवारीपासून त्याचा शोध घेत होते, मात्र तो वारंवार पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर, 24 फेब्रुवालीरोजी पोलिसांनी त्याला तेलंगणातून अटक केली. गृह विभागातील सूत्रांच्या माहितीनुसार, अटकेनंतर आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून त्याला लवकरच कोल्हापुरात आणले जाणार आहे.

शरणागतीचा डाव
प्रशांत कोरटकर स्वतःहून पोलिसांसमोर शरण आला की त्याला पोलिसांनी अटक केली? यावर विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत. विशेष म्हणजे, कोरटकरने याआधी कोल्हापूर न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळल्यानंतर त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली. पण येथेही त्याला अपेक्षित यश मिळाले नाही.
कोल्हापूर कोर्टाने अंतरिम जामिन फेटाळल्यानंतर, त्याने त्याच चुका उच्च न्यायालयात केल्या. परिणामी, जामिन नाकारला गेला. कोणताही पर्याय शिल्लक नसल्याने कोरटकरला अखेर पोलिसांसमोर शरण येणे भाग पडले, असे विरोधकांचे म्हणणे आहे.
Nana Patole : आणखी किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या पाहायच्या सरकारला
न्यायालयाने अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकर परदेशात पळून जाण्याच्या शक्यतेमुळे इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांच्या वकिलांनी पोलिसांकडे त्याचा पासपोर्ट जप्त करण्याची मागणी केली होती. यानंतर कोल्हापूर पोलिसांनी त्याचा पासपोर्ट ताब्यात घेतला होता. विशेष म्हणजे, त्याची पत्नीने स्वतः हा पासपोर्ट पोलिसांकडे जमा केला होता. त्यामुळे कोरटकर भारताबाहेर गेला नसल्याचे स्पष्ट झाले होते.
कोल्हापूर सत्र न्यायालयाने याप्रकरणी प्रशांत कोरटकरचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्याने उच्च न्यायालयात पुन्हा अर्ज केला, पण शुक्रवारी सुनावणीदरम्यान याचिकेची प्रत उपलब्ध नसल्याने कोर्टाने सोमवारी पुढील सुनावणी निश्चित केली होती. मात्र, या सुनावणीच्या आधीच त्याचा खेळ संपला आणि तो पोलिसांच्या ताब्यात आला.
चौकशी सुरू
प्रशांत कोरटकरच्या अटकेनंतर पुढील कायदेशीर प्रक्रिया वेगाने पार पडणार आहेत. कोल्हापूर पोलिसांनी कोरटकरला अटक केली आहे. याचवेळी, त्याला न्यायालयात हजर करून पुढील कारवाईसाठी अधिकृत चौकशी सुरू होईल. या घटनेमुळे छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अनादर करणाऱ्या कोणाच्याही विरोधात कडक कारवाई होणार, हे स्पष्ट झाले आहे. आता सर्वांचे लक्ष या प्रकरणाच्या पुढील न्यायालयीन घडामोडींवर आहे.