महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana : देवाभाऊ बनणार महिलांचे बिझनेस कोच

Maharashtra : वादात सापडलेली लाडकी बहीण आता व्यवसायाच्या उंबरठ्यावर

Author

महायुती सरकारची लाडकी बहीण योजना निधी वाळवल्याच्या आरोपांनी संघर्ष केला असला तरी, आता ती हळूहळू विकासाच्या उंबरठ्यावर पाय ठेवत आहे. महिलांच्या सबलीकरणासाठी या योजनेत नवीन महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने जाहीर केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सत्तेच्या राजकारणात नेहमीच महत्त्वाचा मुद्दा ठरली आहे. थाटामाटात सुरू झालेली ही योजना सुरुवातीला स्त्रियांसाठी वरदान ठरली, पण त्याच वेगाने टीकेचे वादळही पेलावे लागले. महिला सबलीकरणाच्या नावाखाली सुरू झालेल्या या उपक्रमावर इतर योजनांचा निधी वळवण्यात आल्याचे आरोप वारंवार झाले. अनेकदा लाभाचा आकडा 1 हजार 500 की 2 हजार 100 रुपये या संभ्रमात सामान्य महिलांचं मन गोंधळून गेले.

पुढे जेव्हा तपासणीत सरकारी वेतनधारी महिलांचाही या योजनेत लाभार्थी म्हणून समावेश असल्याचं समोर आलं, तेव्हा खऱ्या गरजूंचा रोष अनावर झाला. गरीब महिलांसाठी राखीव असलेल्या या लाभावर अपात्र महिलांनी डल्ला मारल्याच्या बातम्यांनी जनतेच्या विश्वासाला धक्का पोहोचवला आहे.पण वादाच्या सावलीतून बाहेर येत लाडकी बहीण योजना आता एक नवे रूप घेतेय. सर्वांचे लाडके देवाभाऊ म्हणून ओळखले जाणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात, या योजनेतून महिलांना फक्त दरमहा काही रुपये नव्हे, तर त्यांचे उद्योजकीय स्वप्न साकार करण्यासाठी ९ टक्के अल्प व्याजदराने कर्ज मिळणार आहे.

Eknath Shinde : बाळासाहेबांचे वारसदार की कॉंग्रेसचे ‘प्रेमवीर’?

स्वप्न होणार साकार

कर्ज वैयक्तिक किंवा सामूहिक दोन्ही स्वरूपात दिले जाणार असून, यामागचा उद्देश आहे महिलांना आत्मनिर्भर बनवण्याचा. आता फक्त किचनपुरत्या मर्यादित न राहता, महिला स्वतःचा व्यवसाय उभारतील, पर्यटनात नवे प्रकल्प उभारतील, विक्री केंद्रे उभारतील अशा अनेक शक्यता यातून खुल्या होत आहेत.या उपक्रमात महत्त्वाची भूमिका बजावत आहे मुंबई बँक, जी या कर्ज प्रक्रियेची मुख्य भागीदार असणार आहे. मुंबई बँकेचे अध्यक्ष आणि आमदार प्रविण दरेकर यांचे योगदान सरकारने ठळकपणे अधोरेखित केले आहे. त्यांच्याच सहकार्यामुळे ही संकल्पना प्रत्यक्षात अधिक प्रभावीपणे राबवली जाणार आहे.

कर्ज वितरणासाठी पर्यटन संचालनालय, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, तसेच इतर मागासवर्गीय वित्त महामंडळ यांचा समावेश आहे.या निर्णयाबाबत भाजपा नेत्या चित्रा वाघ म्हणाल्या, हे फक्त आर्थिक साहाय्य नाही, तर महिलांना स्वप्नं पाहण्याची आणि ती प्रत्यक्षात उतरवण्याची संधी आहे.महिलांना उद्योग सुरू करण्यासाठी जेव्हा व्यवस्था पाठिशी उभी राहते, तेव्हा त्या केवळ लाभार्थी राहत नाहीत, तर निर्माती बनतात. लाडकी बहीण योजना आता केवळ राजकीय घोषणाबाजी न राहता, खऱ्या अर्थाने महिलांच्या हातात उद्योजकतेची किल्ली सोपवतेय. आता पाहावं लागेल की, टीकेच्या वावटळीतून मार्ग काढत, ही योजना प्रत्यक्षात किती महिलांना सशक्त बनवते.

Parinay Fuke : राजकारणातील किंगने दिली दिव्या देशमुखला बुद्धिबळाची चाल

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!