
लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना 2 हजार 100 रुपये मिळण्याची प्रतीक्षा सुरू आहे. सरकारकडून हा वाढीव हप्ता कधी मिळणार, याकडे सर्व महिलांचे लक्ष लागले आहे.
महायुती सरकारनं विधानसभा निवडणुकीत मोठ्या ढोलताशांसह मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना 2 हजार 100 रुपये देण्याचे गोडगोड आश्वासन दिलं होतं. पण सरकार सत्तेत येऊन चार महिने उलटले तरी हे 2 हजार 100 रुपये अजूनही हवेतील गुलालासारखे गायबच. त्यामुळे लाडक्या बहिणींची नजर मोबाईलवर आणि खात्यात जमा होणाऱ्या संदेशाकडे लागलेली आहे.
फेब्रुवारी महिन्याचे 1 हजार 500 रुपये लाभार्थी महिलांना मिळायला सुरुवात झाली, अशी मोठी बातमी मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. सात मार्चपासून हे पैसे खात्यात जमा होत आहे. 12 मार्चपर्यंत हा ‘होळी स्पेशल हप्ता’ मिळणार आहे. मार्च महिन्यासाठीही 1 हजार 500 रुपये मिळणार, म्हणजे 2 हजार 100 चा रंग तरी येईल का. मात्र, सरकार म्हणतंय, थांबा! जाहीरनामा पाच वर्षांसाठी असतो, हळूहळू देऊ, म्हणजे आता अनुदानाचंही होळी अबी बाकी हैं असंच काहीसं चाललंय.

खर्चाचं ओझं
महायुती सत्तेत येण्यापूर्वी 2 हजार 100 रुपये देण्याचं ठरवलं, पण आता खर्चाचा बोजा वाढल्यामुळे अनुदानात वाढ होणार नाही, अशी रंग बदलणारी घोषणा समोर आली आहे. ‘सरकार म्हणतं, पैसा आहे, पण सध्यातरी तुम्हाला 1 हजार 500 रुपयांतच समाधान मानावं लागेल.’ म्हणजे होळीच्या दिवशी एखादा मित्र भांग प्यायल्यावर सांगतो ना, ‘भाऊ, मोठा गिफ्ट आहे, पण पुढच्या वर्षी’ तसंच काहीसं झालंय.
यंदाच्या अर्थसंकल्पात वाढीत हप्ता मिळेल अशी अपेक्षा होती, पण होळीच्या रंगात सरकारनं पाणी ओतलं. सध्या महिलांना 1 हजार 500 रुपयेच मिळणार, आणि योजनेसाठी आधीच 46 हजार कोटी रुपयांची तरतूद झाली आहे, असं सरकार सांगतंय. पाच लाख महिलांना लाडकी बहीण योजनेतून अपात्र ठरवण्यात आलंय. वेगवेगळे निकष लावून अर्ज रद्द करण्यात आले आहेत.
Raj Thackeray : महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी नव्या लढाईची हाक
आतुरता अजूनही
काही दिवसांपूर्वी योजना बंद होणार की नाही, अशी चर्चा रंगातहोती. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिलंय की योजना बंद होणार नाही. पैसे देतोय, पण योग्य लोकांनाच. म्हणजे आता सरकारची भूमिका अशी झालीय की रंग खेळूया, पण जरा नियम पाळूनचं.
लाडकी बहीण योजनेचा वाढीत हप्ता मिळणार का नाही, हे अजूनही गुलालाच्या धुरासारखं अधांतरी आहे. काहींना 1 हजार 500 रुपयांत समाधान मानावं लागणार. काहींना योजना मिळेल की नाही याची चिंता, आणि काहींना तुम्ही पात्र नाही असा धक्का बसलेला आहे. यंदाच्या होळीत सगळे रंग असतील नव्या अपेक्षांचा, सरकारी घोषणांचा, आणि नाराजगिरीचा अपेक्षा पूर्ण न झाल्याचा. मात्र प्रश्न एकच महिलांना ‘होळीचा गुलाबी’ हप्ता मिळेल की योजनेचं रूप काळवंडेल.