
नागपूरमधील हजारो ग्राहकांना वीज बिलात अनपेक्षित सूट मिळू लागली आहे. ही सूट मिळण्यामागचं गुपित महावितरणच्या एका खास योजनेत लपलं आहे.
राज्यातील वाढत्या वीज दरांमुळे सर्वसामान्य ग्राहकांची कोंडी झालेली असताना, महावितरणच्या गो ग्रीन योजनेमुळे नागपूरकरांना थोडा दिलासा मिळू लागला आहे. दरमहा मिळणाऱ्या सवलतीच्या प्रतिक्षेपेक्षा, आता गो ग्रीन योजनेच्या माध्यमातून नागरिकांना पहिल्याच वीज बिलात एकरकमी 120 रुपयांची थेट सवलत मिळत आहे. यामुळे पर्यावरणाचे रक्षण करताना वीज बचतीचा दुहेरी लाभ नागपूरकरांना मिळू लागला आहे.
राज्यात महावितरणच्या सुमारे 3 कोटी लघुदाब वीज ग्राहकांपैकी 5 लाख 3 हजार 169 ग्राहकांनी गो ग्रीन या पर्यावरणपूरक योजनेत सक्रिय सहभाग घेतला आहे. यामध्ये नागपूर जिल्ह्यातील 19 हजार 370 ग्राहकांचा समावेश आहे. त्यांनी ईमेलद्वारे वीज बिल घेण्याचा पर्याय स्वीकारला आहे.

Congress : शेतकरी सापडले संकटात, सुलतानांचे सरकार झोपले महालात
महावितरणचा अभिनव निर्णय
कागद वाचवा, पर्यावरण वाचवा, या संदेशासह सुरू झालेल्या गो ग्रीन उपक्रमाला नागपूर जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. केवळ वीज बिल बचतीच्या दृष्टीने नव्हे, तर कागद बचत आणि पर्यावरण रक्षणाच्या हेतूने नागपूरच्या नागरिकांनी ही योजना मोठ्या प्रमाणावर स्वीकारली आहे. वर्धा जिल्ह्यातील 3 हजार 243 ग्राहकांनीही हा पर्याय निवडला आहे. एकरकमी सवलतीमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. योजनेनुसार महावितरणकडून आता छापील बिल पाठवण्याऐवजी ईमेलद्वारे वीज बिल उपलब्ध करून देण्यात येत आहे.
पूर्वी या योजनेत सहभागी झालेल्या ग्राहकांना दरमहा 10 रुपये सवलत मिळत होती. मात्र, आता महावितरणने या योजनेत सुधारणा करत एकाचवेळी 120 रुपयांची सवलत पहिल्याच वीज बिलात देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रत्येक महिन्याची वाट पाहण्याची गरज राहिलेली नाही. राज्यभरातून मिळत असलेल्या उत्तम प्रतिसादामुळे महावितरणने या सवलतीची रक्कम त्वरित देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे केवळ चार महिन्यांत गो ग्रीन योजनेत सहभागी होणाऱ्या ग्राहकांची संख्या तब्बल 41 हजारांनी वाढली आहे.
तंत्रज्ञानाचा वापर
महावितरणने आपल्या ग्राहकांपर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी एसएमएसचा वापर केला आहे. ग्राहकांनी महावितरणच्या www.mahadiscom.in या अधिकृत संकेतस्थळावर किंवा महावितरण मोबाईल अॅपवर जाऊन गो ग्रीन पर्याय निवडल्यास त्वरित सवलतीचा लाभ मिळतो. नोंदणीनंतर पुढील वर्षभर ग्राहकांना त्यांच्या ईमेलवर नियमितपणे वीज बिल प्राप्त होते. या योजनेत सहभागी राहिल्यास दरमहा 10 रुपयांची सवलतही पुढे कायम राहणार आहे.
राज्यस्तरावर गो ग्रीन योजनेला मिळणारा प्रतिसाद हा नागपूरच्या पुढाकारामुळे अधिक ठळकपणे समोर येत आहे. नागपूरकरांनी पर्यावरण जपण्याचा आणि डिजिटल सेवांचा स्वीकार करण्याचा आदर्श इतर जिल्ह्यांसमोर ठेवला आहे. महावितरणने सर्व नागरिकांना या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. नागपूर शहराचा हा सकारात्मक अनुभव पाहता, भविष्यातील पर्यावरणपूरक उपक्रमांमध्ये नागपूर हे नेतृत्व करणारे केंद्र ठरण्याची शक्यता अधिक आहे.