
महाज्योती संस्थेचा क्यूआर कोड विद्यार्थ्यांसाठी यशाचा नवा दरवाजा ठरला आहे. या डिजिटल उपक्रमाने विद्यार्थ्यांच्या जीवनात बदल घडवले आहे.
शैक्षणिक क्षेत्रात डिजिटल साधनांचा प्रभावी वापर करत, राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात महाज्योतीने विद्यार्थ्यांच्या यशाचा आणखी एक नवा अध्याय लिहिला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत तयार करण्यात आलेल्या क्यूआर (QR) कोडच्या माध्यमातून गेल्या 11 महिन्यांत 60 लाखांहून अधिक विद्यार्थी महाज्योतीच्या संकेतस्थळावर भेट देऊन विविध योजनांची माहिती मिळवण्यास यशस्वी ठरले आहेत.
महाज्योती ही संस्था राज्यातील ओबीसी (अन्य मागासवर्गीय), व्हीजेएनटी (विमुक्त जाती व भटक्या जमाती), तसेच एसबीसी (विशेष मागासवर्गीय) प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, मार्गदर्शन व कौशल्य विकासाचे प्रशिक्षण मोफत देते. या संस्थेमार्फत एमएचटी-सीईटी, जेईई, नीट, युपीएससी, एमपीएससी, पायलट ट्रेनिंग, पीएचडी, तसेच विविध स्कील डेव्हलपमेंट कोर्सेससाठी मोफत प्रशिक्षण पुरवले जाते. 24 जुलै 2024 रोजी महाज्योतीने विद्यार्थ्यांना अधिक सहजतेने माहिती मिळावी यासाठी विशेष क्यूआर कोड विकसित केला होता.

संधींचं सक्षमीकरण
मोबाईलने स्कॅन करता येणाऱ्या या कोडमुळे थेट संकेतस्थळावर प्रवेश करता येतो. क्यूआर कोड स्कॅन करून विद्यार्थ्यांना आपल्या पात्रतेनुसार शिष्यवृत्ती, प्रशिक्षण, मार्गदर्शन योजना यांची माहिती एका क्लिकवर मिळवता येते. या उपक्रमाला मिळालेला प्रतिसाद आश्चर्यकारक आहे. आजवर 60 लाख 24 हजार 471 विद्यार्थ्यांनी संकेतस्थळाला भेट दिली आहे. ही संख्या दररोज वाढत आहे. यामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थी देखील मोठ्या प्रमाणावर सहभागी होत आहेत, जे डिजिटल साक्षरतेचा एक सकारात्मक संकेत मानला जातो.
महाज्योतीचे प्रभारी व्यवस्थापकीय संचालक प्रशांत वावगे यांनी सांगितले की, संस्था केवळ शैक्षणिक प्रशिक्षण देत नाही. तर गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक पाठबळही देते. ही आर्थिक मदत म्हणजे फक्त रक्कम नव्हे, तर त्यांच्या स्वप्नांना बळ देणारी ताकद आहे. गेल्या चार वर्षांमध्ये महाज्योतीमुळे हजारो विद्यार्थ्यांचे जीवन बदलले आहे. अनेकांनी युपीएससी, एमपीएससी परीक्षांमध्ये घवघवीत यश मिळवले, तर काही विद्यार्थ्यांनी पायलट ट्रेनिंग, आयआयटी, मेडिकलसारख्या क्षेत्रात प्रवेश मिळवला आहे.
मोबाईल अॅपची तयारी
महाज्योतीचे अध्यक्ष आणि राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी या डिजिटल यशाबद्दल विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. त्यांनी सांगितले की, ही केवळ संकेतस्थळावरची भेट नव्हे, तर ही एक सकारात्मक दिशा आहे जी विद्यार्थ्यांना स्वप्नांची वाट दाखवत आहे. महाज्योती आता पुढील टप्प्यात मोबाईल अॅप विकसित करण्याच्या तयारीत आहे. जे क्यूआर कोडपेक्षा अधिक सुलभ आणि संवादक्षम असेल. या अॅपमध्ये वैयक्तिक योजनांची सूचना, अर्ज प्रक्रिया, मार्गदर्शन व्हिडिओ, तसेच यशोगाथा हे सगळं एकत्रित असणार आहे.