महाराष्ट्र

Maharashtra : महाज्योतीच्या उजळत्या ज्ञानदीपकांची यूपीएससीवर मोहोर 

UPSC : परिश्रमाच्या मशालीने उजळला यशाचा रस्ता 

Author

‘महाज्योती’च्या गुणवत्तापूर्ण प्रशिक्षणामुळे राज्यातील 16 जिल्ह्यांतील 28 ओबीसी विद्यार्थ्यांनी युपीएससी 2024 मध्ये घवघवीत यश संपादन केले. हे यश म्हणजे सामाजिक समतेच्या दिशेने उचललेले ठोस पाऊल आणि शिक्षणाच्या प्रकाशाने उजळलेली वाटचाल आहे.

गोरगरिबांच्या स्वप्नांना आकार देणाऱ्या ‘महाज्योती’च्या गुणवत्तापूर्ण प्रशिक्षणाचे एक भव्य उदाहरण नुकतेच संपूर्ण महाराष्ट्राने अनुभवले. इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या स्वायत्त संस्थेच्या रूपात कार्यरत असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) मार्फत प्रशिक्षण घेतलेल्या तब्बल 28 ओबीसी, व्हिजेएनटी व एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी 2024 मधील यूपीएससी परीक्षेत घवघवीत यश मिळवत, एक नवा इतिहास घडवला आहे. ही केवळ परीक्षा उत्तीर्ण करण्याची कहाणी नाही, तर ही आहे संघर्ष, जिद्द आणि मूल्याधिष्ठित शिक्षणाने घडवलेल्या उज्ज्वल भविष्याची. महाज्योतीच्या या प्रेरणादायी यशामागे उभे आहेत दर्जेदार मार्गदर्शन, आर्थिक पाठबळ आणि विद्यार्थ्यांचा अथक परिश्रम.

राज्याच्या 16 जिल्ह्यांतून महाज्योतीचे ‘ज्ञानदिपक’ उजळले आहे. संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक प्रशांत वावगे यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा युपीएससीच्या अंतिम यादीत महाराष्ट्रातील विविध भागांतील 16 जिल्ह्यांतील एकूण 28 विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये काहींनी विशेष उल्लेखनीय कामगिरी केली आहे. रजत श्रीराम पात्रे (रँक 305), पंकज मनोहर पटले (रँक 329), सुनिल रामलिंग स्वामी (रँक 336), अभिजीत रामदास चौधर (रँक 487) आणि आकाश पुंजाराम गोरे (रँक 500) हे नावं विशेष ठळकपणे समोर आली आहेत.

मार्गदर्शक शक्ती

विद्यार्थ्यांना ‘महाज्योती’मार्फत मुख्य परीक्षेसाठी 50 हजार रुपये आणि मुलाखतीसाठी 25 हजार रुपये इतके अर्थसहाय्य देण्यात आले. मात्र ही केवळ आर्थिक मदत नव्हे, तर या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या मानसिक तयारीपासून अभ्यासक्रमाच्या प्रभावी व्यवस्थापनापर्यंत देण्यात आलेले मार्गदर्शनही त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने मैलाचा दगड ठरले आहे. महाज्योतीच्या कार्याचा मूलभूत हेतू हा केवळ परीक्षा उत्तीर्ण करण्यापुरता मर्यादित नाही. समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत शिक्षणाच्या माध्यमातून न्याय पोहोचवण्याचा आहे. ‘शिक्षण हेच स्वप्नांची गुरुकिल्ली’ या विचाराने प्रेरित होऊन संस्थेने ओबीसी, व्हिजेएनटी व एसबीसी विद्यार्थ्यांना सामाजिक-शैक्षणिक प्रगतीच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य केले आहे.

Nagpur : पहलगामच्या थरारातून परतीचा प्रवास

यशाबद्दल इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री व महाज्योतीचे अध्यक्ष अतुल सावे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, महाज्योतीमार्फत मिळणारे उच्च दर्जाचे प्रशिक्षण हेच या यशामागील खरे रहस्य आहे. दिवसेंदिवस संस्थेच्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये आपली छाप पाडत समाजाला दिशा दाखवली आहे. यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे या विद्यार्थ्यांसमोर आता भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय पोलीस सेवा, परराष्ट्र सेवा अशा मान्यवर क्षेत्रांत कार्य करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. हे विद्यार्थी केवळ आपले आयुष्य घडवणार नाहीत, तर आपल्यासारख्यांच्याच हजारो लोकांचे आयुष्य उजळवतील.

या यशाचा प्रकाश केवळ आजच्या निकालापुरता मर्यादित नाही, तर तो त्या प्रत्येक विद्यार्थ्याला मार्गदर्शन करणारा दीपस्तंभ आहे जो आजही कोणत्याही कोपऱ्यात, संकटांशी झुंजत शिक्षणाची स्वप्ने बाळगतोय. महाज्योतीने दाखवलेला मार्ग हा यश, समता आणि आत्मभानाकडे नेणारा प्रकाशमार्ग आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!