महाराष्ट्र

Mahayuti : विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात गदारोळ

Mumbai : विधानसभेत औरंगजेब समर्थनावर संताप 

Author

महाराष्ट्राच्या अस्मितेला आव्हान देणाऱ्या समाजवादी पक्षाचे आमदार अबू आजमी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. औरंगजेबच्या समर्थनार्थ दिलेल्या त्यांच्या विधानामुळे विधानसभेत गदारोळ उडाला असून, शिवसेना-भाजपने त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

महाराष्ट्र विधानसभेत मंगळवारी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आजमी यांच्या वादग्रस्त विधानावरून प्रचंड गदारोळ झाला. मुगल बादशाह औरंगजेब याच्या समर्थनार्थ दिलेल्या विधानामुळे भाजप आणि शिवसेनेच्या आमदारांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. “जय भवानी-जय शिवाजी” च्या घोषणा देत, आजमींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. या गदारोळामुळे अखेर विधानसभा आणि विधान परिषदेचे कामकाज तहकूब करावे लागले.

आजमींनी आपल्या वक्तव्यात औरंगजेबला “सर्वसमावेशक” शासक असल्याचा दावा करत, तो क्रूर नव्हता आणि त्याचा हिंदूंविरोधी अजेंडा नव्हता, असे म्हटले होते. मात्र, त्यांच्या या वक्तव्यावरून संपूर्ण महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान झाल्याचा आरोप शिवसेना आणि भाजपने केला आहे.

Maharashtra Budget : शिंदेसह आमदारांनी आजमींना झापले, तहकूब होईस्तोवर सभागृह तापले

आजमींच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया

अबू आजमी यांनी आणि त्यांच्या वक्तव्याने पुन्हा एकदा महाराष्ट्रात नव्या वादाला तोंड फोडले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार औरंगजेब क्रूर शासक नव्हता, त्याने फक्त सत्ता आणि संपत्तीच्या लढाया केल्या. जर तो हिंदूंविरोधी असता, तर 34% हिंदू त्याच्या सैन्यात नसते. जर त्याने मंदिरे पाडली, तर मस्जिदीदेखील उद्ध्वस्त केल्या. संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यातील युद्ध हे धार्मिक नव्हते, तर सत्तेसाठीचे होते. या वक्तव्यावरून भाजप आणि शिवसेनेने संतप्त प्रतिक्रिया देत आजमींना “देशद्रोही” ठरवले आहे. शिवसेना नेते गुलाब रघुनाथ पाटील यांनी विधानसभेत स्पष्ट शब्दांत सांगितले की, छत्रपती संभाजी महाराजांना अमानुष अत्याचार करून ठार मारणाऱ्या औरंगजेबला ‘चांगला शासक’ म्हणणे म्हणजे महाराष्ट्राच्या अस्मितेचा घोर अपमान आहे. याचा जाब अबू आजमींना द्यावाच लागेल.

एकनाथ शिंदे संतापले 

महाराष्ट्रात शिवसेना, भाजप आणि त्यांच्या सहयोगी पक्षांनी आजमींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अबू आजमी यांनी महाराष्ट्रातील महान पुरुषांचा अपमान केला आहे. त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी तीव्र प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत भाषण करताना दिली. शिवसेना प्रवक्त्या शायना एन.सी. यांनीदेखील आजमींना इतिहास नीट वाचण्याचा सल्ला दिला. औरंगजेबने मंदिरे उध्वस्त केली, पण कोणते मंदिरे बांधली याचा उल्लेख कोणत्याही इतिहासात नाही. असा चुकीचा इतिहास पसरवणाऱ्यांना कायद्याच्या चौकटीत आणले पाहिजे, असे त्या म्हणाल्या.

ठिकठिकाणी आंदोलन

अबू आजमी यांच्या वक्तव्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटत असताना, राज्यभरात अनेक ठिकाणी आंदोलनं सुरू झाली आहेत. मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर येथे शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून “अबू आजमी हाय हाय” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. औरंगजेब महान होता म्हणणाऱ्या लोकांनी ‘छावा’ चित्रपट पाहावा. त्याने संभाजी महाराजांना कोणत्या क्रूर पद्धतीने मारले, हे समजेल. अबू आजमींनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी भाजप आमदार राम कदम यांनीदेखील संतप्त होऊन केली.

देशद्रोहाचा गुन्हा

शिवसेना प्रवक्ते किरण पावसकर यांनी मुंबई पोलिसांकडे अबू आजमी यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार आजमींचे वक्तव्य समाजात तेढ निर्माण करणारे आहे. त्यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे.पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणी तपास सुरू करण्यात आला असून लवकरच पुढील कारवाई केली जाईल. शिवसेना आणि भाजपच्या दबावामुळे आजमींवर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

फक्त इतिहास सांगितला

मी फक्त इतिहास सांगितला. कोणत्याही धर्माच्या विरोधात बोलण्याचा माझा हेतू नव्हता. देश संविधानाने चालतो, आणि आपण राजकारणाच्या आधारे इतिहासाचे विकृतीकरण करू नये, असे वाद वाढल्यानंतर अबू आजमी यांनी आपल्या विधानावर स्पष्टीकरण देत म्हटले. मात्र, आजमींची ही सफाई महाराष्ट्राच्या जनतेला आणि हिंदू संघटनांना मान्य नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. अनेकांनी सोशल मीडियावर त्यांना जोरदार ट्रोल करत “महाराष्ट्राच्या अस्मितेशी खेळणाऱ्या कोणालाही माफ केले जाणार नाही” असे ठणकावले आहे.

महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान 

वाद आता केवळ विधानसभेत नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या अस्मितेशी जोडला गेला आहे. आणि यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. भाजप आणि शिवसेना आक्रमक पवित्र्यात असून, येत्या काळात आजमींवर कायदेशीर कारवाई होईल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.तर दुसरीकडे, महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावणाऱ्या कोणालाही जनता कधीही माफ करणार नाही, हे मात्र नक्की.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!