
महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांनी त्रिवेणी संगमात स्नान करून आध्यात्मिक शक्तीची अनुभूती घेतली. त्यानंतर त्यांनी बाबा बागेश्वर यांचे दर्शन घेत, नव्या वाटचालीसाठी आशीर्वाद मागितला.
‘जिथे प्रयत्न संपतात, तिथून परमेश्वराची कृपा सुरू होते.’ जीवनाच्या प्रवासात अनेकदा माणूस संकटात सापडतो, हरवतो, कधी चुकतो, तर कधी स्वतःला शोधत असतो. पण जेव्हा मनोमन पश्चात्ताप होतो आणि नव्या सुरुवातीसाठी तो पूर्ण मनाने तयार होतो, तेव्हा देवाची कृपा त्याच्यावर नक्कीच होते. संकटांनंतर मिळालेली दुसरी संधी ही केवळ नशिबाची नाही, तर त्यामागे धैर्य, प्रयत्न आणि परमेश्वराची असीम कृपा असते. ‘देवावरचा विश्वास आणि कष्टावरची श्रद्धा माणसाला पुन्हा उभं करू शकते,’ हेच दाखवणारा एक प्रवास संजय राठोड यांचा आहे. राजकारण म्हणजे फक्त सत्तेचा खेळ नसतो, तो विश्वास, परीक्षा आणि पुनरागमनाचा प्रवास असतो.

महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री संजय राठोड हे अशाच प्रवासातून जात आहेत. एकेकाळी महाविकास आघाडी सरकारमध्ये प्रभावी मंत्री म्हणून कार्यरत असलेले राठोड पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे राजकीय वादळात सापडले. मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागल्याने त्यांचं राजकीय अस्तित्व धोक्यात आलं होतं. पण राजकारणात कायम काहीच नसतं, ‘ना संधी, ना संकटं.’ पुन्हा उभं राहण्यासाठी त्यांनी मार्ग शोधला आणि आता नव्या जोमाने लोकांसमोर आले आहेत. मात्र, पुनरागमनाच्या या प्रवासात त्यांनी केवळ राजकीय डावपेच नाही, तर आध्यात्मिक आधारही घेतला आहे. ‘परमेश्वराकडं नक्कीच कळत-नकळत झालेल्या चुकांची क्षमा मागितली असावी’, ही भावना त्यांच्यात ठामपणे दिसून येते.
Uddhav Thackeray: पन्नास खोके आणि वॉशिंग मशीनमधून बाहेर पडलेले शिंदे
आध्यात्मिक डुबकी
संजय राठोड यांचा राजकीय प्रवास अडचणींनी भरलेला राहिला असला, तरी त्यांनी त्यातून बोध घेत आत्मविश्वासाने नव्या वाटचालीस सुरुवात केली आहे. नुकतेच ते एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या मंत्र्यांसोबत महाकुंभात सहभागी झाले. त्रिवेणी संगमाच्या पवित्र जलात त्यांनी स्नान केले. मनोमन नव्या प्रवासाची सुरूवात केली असावी. गंगा, यमुना आणि सरस्वती यांच्या संगमस्थळी आंघोळ करताना त्यांनी अंतःकरणातील भार हलका करण्याचा प्रयत्न केला.
स्नान संपताच, थेट बागेश्वर धामच्या दिशेने त्यांची पावले वळली. हे केवळ धार्मिक विधी नव्हते, तर नव्या राजकीय अध्यायाच्या स्वागताची तयारी होती. देवाच्या दरबारी मागितलेली माफी आणि यशाची प्रार्थना यात राजकारण आणि श्रद्धा दोन्ही मिसळले होते. संकटांचा भार उतरवण्यासाठी देवाच्या शरणागत जाण्याची परंपरा नवीन नाही, पण ती प्रत्येक वेळी एक नवीन कथा सांगते.
नव्या प्रवासाची सुरुवात
संजय राठोड यांचे राजकीय पुनरागमन आता वेगळ्या मार्गाने घडताना दिसत आहे. त्यांनी टीका आणि आरोपांकडे दुर्लक्ष करत लोकसेवेला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. बागेश्वर धामला भेट देणे हे केवळ एक धार्मिक दर्शन नव्हते, तर त्यांच्या नव्या राजकीय प्रवासाचा एक भाग होता.
राजकारण हे केवळ सत्ता मिळवण्यासाठी नसते, तर ते जनतेच्या विश्वासाची परीक्षा असते. असा संदेश राठोड आता आपल्या कार्यशैलीतून देत आहेत. आगामी काळात त्यांच्या नव्या दृष्टिकोनाचा प्रभाव लोकांवर आणि पक्षावर किती होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.