नुकत्याच नागपुरातून निघालेल्या शरद पवारांच्या मंडल यात्रेवरून राजकीय रंगमंचावर शब्दांचे वादळ उठले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सोंग, थोतांड आणि ‘कृती’चा मंत्र देत पवारांवर झणझणीत प्रहार केला.
नागपूरच्या राजकीय तापमानात एक नव्या नाट्याची एन्ट्री झाली आणि ती झाली मंडल यात्रेच्या निमित्ताने. नुकतीच शरद पवार यांनी नागपूरच्या रस्त्यांवरून मंडल यात्रा काढत ओबीसींच्या हक्कांचा बिगुल वाजवला. पण, या यात्रेमागचं राजकारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नजरेतून सुटलं नाही. त्यांनी सरळच इशारा दिला की, वर्षानुवर्षे ज्यांनी ओबीसी समाजाला पाण्यात पाहिलं. त्यांना आता अचानकच हा समाज आठवायला लागलाय. फक्त यात्रा काढून काही साध्य होणार नाही, ओबीसींच्या पाठीशी ठामपणे उभे राहिल्याचं कृतीतून दाखवा.
रविवारी 10 ऑगस्ट रोजी फडणवीस नागपूर पोलीस मुख्यालयात आले होते, तेथे ‘गरुड दृष्टी’ या अत्याधुनिक सोशल मीडिया मॉनिटरिंग साधनाचं सादरीकरण आणि सायबर फसवणूक पीडितांना तब्बल 10 कोटींच्या परताव्याचं वितरण करण्यात आलं. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी मंडल यात्रेच्या राजकारणावर तल्ख शब्दांत निशाणा साधला.
Devendra Fadnavis : गरुड दृष्टीची नजर, गुन्हेगारांचा चुरम्यासारखा चुरा
सणसणीत टोला
आजवर काही लोकांनी ओबीसी समाजाचा वापर केवळ भाषणं आणि मतांच्या राजकारणापुरता केला. पण जेव्हा हा समाज दुरावतोय हे लक्षात आलं, तेव्हा अचानक मंडल यात्रेची आठवण झाली. हे सगळं लोकांना दिसतंय. ओबीसींवर संकट आलं की यांची भूमिका ‘नरो वा कुंजरो वा’ सारखी असते. आता खरोखरच ओबीसींची आठवण असेल, तर ती केवळ रस्त्यावरच्या यात्रेत नाही तर ठोस कृतीत दिसली पाहिजे, असा सणसणीत टोला फडणवीसांनी लगावला.
यावेळी त्यांनी शरद पवार यांच्या अलीकडच्या विधानावरही जोरदार पलटवार केला. पवारांनी शनिवारी नागपुरात एका जुन्या घटनेचा उल्लेख करत सांगितलं होतं की, विधानसभा निवडणुकीआधी दोन जण त्यांना भेटले होते आणि 288 पैकी 160 जागा जिंकून आणण्याची गॅरंटी दिली होती. यावर फडणवीसांनी उपरोधिक बाण सोडत म्हटलं की, ही ‘सलीम-जावेद’ची कथा वाटते. तुम्ही जबाबदार नागरिक असताना कोणी अशा प्रकारे आलं, तर पोलीस किंवा निवडणूक आयोगाकडे तक्रार का केली नाही? तुम्ही त्यांचा वापर करून पाहिलात का? हे सगळं फक्त थोतांड आहे.
राजकारणातील या शब्दयुद्धात आता तापमान आणखी वाढणार, हे निश्चित आहे. मंडल यात्रेतून पवार ओबीसींच्या प्रश्नांवर राजकीय घणाघाती हल्ला करत असताना, फडणवीसांनी प्रत्युत्तरात ‘सोंग’, ‘थोतांड’ आणि ‘भूमिका बदलणारे चेहरे’ यांचा संदर्भ देत स्पष्ट संदेश दिला. राजकारणात केवळ आठवण पुरेशी नाही, कृतीच खरी ओळख असते.
