महाराष्ट्र

Swargate Rape Case : आरोपी आत्महत्या करण्याच्या परिस्थितीत 

Ajit Pawar : ड्रोनच्या मदतीनंं स्वारगेटातील आरोपी अटक

Author

पुण्यातील स्वारगेट बस स्थानक परिसरात एका तरुणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. 

पुणे जिल्ह्यातील स्वारगेट बस स्थानक परिसरात घडलेल्या बलात्कार प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवली आहे. या घटनेने पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पीडितेवर अमानुष अत्याचार करणाऱ्या आरोपीला अखेर पोलिसांनी ड्रोनच्या मदतीने पकडण्यात आले आहे. या प्रकरणावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कठोर भूमिका घेतली असून, दोषींवर कठोर कारवाईचे आश्वासन दिले आहे.

पुण्यातील स्वारगेट बस स्थानक परिसरात 26 फेब्रुवारी रोजी एका महिलेवर निर्दयीपणे बलात्कार करण्यात आला होता. ही घटना पहाटेच्या सुमारास घडली. आरोपीने महिलेवर निर्घृण अत्याचार केला आणि त्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पुणे पोलिसांनी तात्काळ तपासाला सुरुवात केली. आरोपीने स्वतःला लपवण्यासाठी भाताच्या शेतात आश्रय घेतल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी अत्याधुनिक ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर करून आरोपीचा शोध घेतला आणि त्याला अटक करण्यात यश मिळवले, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

Swargate Rape Case : मी पण एका मुलीचा बाप; कदम यांनी ठणकावले

कठोर भूमिका

या धक्कादायक घटनेवर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, परवापर्यंत लोक प्रश्न विचारत होते की आरोपीला अटक का झाली नाही? आरोपी भाताच्या शेतात लपून बसला होता. आम्ही ड्रोनचा वापर करून त्याला पकडलं. आरोपीची परिस्थिती अशी होती की, त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्याला पकडले. अजित पवार पुढे म्हणाले की, अशा घटना कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतल्या जाणार नाहीत. सरकार महिलांच्या सुरक्षिततेसाठी कटिबद्ध आहे आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.

पुण्याच्या पोलीस आयुक्तांशी चर्चा केल्याचेही अजित पवार म्हणाले. मी त्यांना म्हटलं की स्वारगेटला जे काही झालं ते अतीशय चुकीचंच आहे. या प्रकरणातील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. घटनास्थळाच्या आसपासचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी मिळवलं आहे. या सीसीटीव्ही फुटेजमधून बऱ्याच गोष्टी समोर आल्या आहेत. पोलीस चौकशीत आरोपीचा जबाब, इतर साक्षी-पुरावे पोलिसांकडे आहेत. आरोपीला कठोर शासन होईल. तसेच आपल्या राज्यातली प्रत्येक मुलीचं, बहिणीचं, महिलेचं संरक्षण व्हायला हवं. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला दाखवलेल्या वाटेवर आपण चालायचं आहे, असे एका कार्यक्रमादरम्यान अजित पवार म्हणाले.

‘शक्ती’ची मागणी

स्वारगेट बलात्कार प्रकरणावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले आहे. महिलांच्या सुरक्षेबाबत राज्य सरकार निष्क्रिय असल्याचा आरोप करत विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असताना सरकार मात्र डोळेझाक करत आहे, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारने त्वरित कडक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली जात आहे.

महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणलेला “शक्ती कायदा” अद्याप अमलात आलेला नाही. हा कायदा लवकरात लवकर लागू करण्यात यावा, अशी जोरदार मागणी आता राज्यभरातून केली जात आहे. या कायद्यानुसार महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये आरोपींना जलदगती न्यायप्रक्रियेद्वारे कठोर शिक्षा देण्याची तरतूद आहे. मात्र सरकारकडून हा कायदा अद्याप लागू न केल्यामुळे महिलांचे जीवन धोक्यात आहे, असा आरोप विरोधकांनी केला आहे.

स्वारगेट येथील घटनेनंतर सर्वसामान्य नागरिकांनी देखील महिलांच्या सुरक्षेबाबत सरकारला जाब विचारला आहे. महिला सुरक्षित असतील, तरच समाज सुरक्षित राहील, अशी भावना नागरिकांमध्ये आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी राज्य सरकारने तातडीने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी सर्वस्तरातून केली जात आहे. सरकारने केवळ घोषणा न करता प्रत्यक्षात उपाययोजना राबवाव्यात, अशी संतप्त प्रतिक्रिया जनतेकडून व्यक्त केली जात आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!