महाराष्ट्र

Nana Patole : आघाडीपेक्षा काँग्रेसचं स्वबळ महत्वाचं

Maharashtra : स्थानिक निवडणुकींपूर्वी राजकीय कुंडली बदलतेय

Author

राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. मात्र, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीने महाविकास आघाडीत फूट पडल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे.

राज्यातील राजकारणाचे वारे सध्या नेहमीच्या दिशेने वाहत नसून, वेगळ्याच प्रवाहात जाताना दिसत आहेत. महाराष्ट्राचे राजकारण हे कधीच शांत राहिलेले नाही. पण सध्या जे सुरू आहे ते नेहमीपेक्षा अधिक गोंधळाचे आहे. राजकीय पक्षांनी जणू स्पर्धाच लावली आहे. कोण किती नवा खेळ खेळतो याची.  राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींची रणधुमाळी जवळ येत चालली आहे. त्यामुळेच प्रत्येक पक्ष आता आपली व्यूहरचना ठरवण्यासाठी तयारीत लागला आहे. महापालिका आणि पंचायत निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर, पक्षांनी पुन्हा एकदा आपली ताकद दाखवण्याचे ठरवले आहे. मात्र यावेळी एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. महाविकास आघाडी पुन्हा एकत्र येईल का?

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अलीकडेच एक धक्कादायक विधान केले. महाविकास आघाडीची आता गरज नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार, लोकांचा दबाव आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र निवडणूक लढवावी. पण आघाडीचा मोह आता नकोच. त्यांच्या या वक्तव्यावर राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. या वक्तव्यावर काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही स्पष्ट भूमिका घेतली आहे. संजय राऊत काय बोलतात, यावर मला काही बोलण्याची गरज नाही, असं ठाम सांगत त्यांनी काँग्रेसची स्वबळाची तयारी असल्याचे घोषित केले. त्याआधी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही असेच संकेत दिले होते, की काँग्रेस स्थानिक निवडणुकींमध्ये स्वतंत्र लढण्यासाठी सज्ज आहे.

Nagpur : सत्ताधाऱ्यांच्या मतदारसंघातच विकासकामांची लाजिरवाणी स्थिती

मतपेढीचा कस लागणार

दुसऱ्या बाजूला, सत्ताधारी महायुती देखील गोंधळातच अडकलेली दिसते. एकीकडे महायुतीचे नेते एकत्र लढण्याच्या घोषणा देत आहेत. तर दुसरीकडे जिल्हा आणि शहर पातळीवर मात्र वेगवेगळ्या निर्णयांची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या निवडणुकींमध्ये ‘युती’ राहणार की ‘स्वबळ’ हे चित्रही अजून स्पष्ट झालेले नाही. सध्याची स्थिती पाहता, स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक म्हणजे केवळ मतांचाच नव्हे तर राजकीय नात्यांचा कस लागणारा क्षण आहे. एकीकडे संजय राऊत यांनी आघाडी संपुष्टात आल्याचा इशारा दिला आहे. तर दुसरीकडे नाना पटोले यांनी काँग्रेसची स्वतंत्र तयारी असल्याचे जाहीर केले आहे.

संपूर्ण राजकीय गोंधळात मनसेचाही उल्लेख होताना दिसतो. ज्याला महाविकास आघाडीत घेण्याबाबत हाय कमांड निर्णय घेणार असल्याचे पटोले यांनी सांगितले.हे सगळं पाहता, राजकीय पक्षांची ही स्वबळाची भाषा म्हणजे खरे आत्मविश्वासाचे संकेत आहेत का, की फक्त निवडणुकीपूर्वीचा दबाव? याचे उत्तर आगामी आठवड्यांत स्पष्ट होईल. पण एक गोष्ट नक्की या निवडणुकींचे समीकरणे आणि आघाड्यांचे प्रयोग महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात नव्या वळणावर नेत आहेत. सध्या तरी इतकं स्पष्ट आहे की, प्रत्येक पक्ष आपापली भूमिका ठाम करत आहे. या रणांगणात कोण किती वजनदार ठरेल, याची खरी परीक्षा येत्या निवडणुकींमध्ये होणार आहे.

Nana Patole : विदर्भाचे दुःख मुख्यमंत्र्यांनी दरबारात ऐकवलंच पाहिजे

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!