
30 जूनपासून महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. या अधिवेशनात शेतकरी कर्जमाफी, मराठी-हिंदी भाषेचा वाद आणि मंत्र्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांवर जोरदार घमासान होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा एकदा तापायला लागले आहे. अवघ्या काही वेळातच महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे 2025 वर्षाचे पावसाळी अधिवेशन 30 जूनपासून सुरू होत आहे. येत्या 18 जुलै पर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात राजकीय तापमान कमालीचं वाढणार, याची खात्री आहे. कारण मुद्देही तसेच. शेतकऱ्यांची कर्जमाफी, समृद्धी महामार्ग, शक्तीपीठ महामार्ग, मराठी-हिंदी भाषेचा अस्मितेचा लढा आणि पावसामुळे झालेलं प्रचंड नुकसान. पण यंदाचं अधिवेशन केवळ मुद्द्यांपुरतंच मर्यादित राहणार नाही. तर नेत्यांच्या तोंडातून पडणाऱ्या वादग्रस्त वक्तव्यांनीही विधिमंडळ हादरणार, असं चित्र आहे.
मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा इतिहास डोळ्यासमोर ठेवल्यास हे अधिवेशन काही नेत्यांच्या खुर्च्यांवर जड जाऊ शकतं. मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांना बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्या घटनेने महायुतीत प्रचंड खळबळ उडवली होती. पण आश्चर्य म्हणजे त्या धक्क्यानंतरही काही नेत्यांची जिभेवर अद्याप नियंत्रण नाही. विशेषतः कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची जीभ तर त्यांच्या राजकीय भवितव्यावरच घाला घालत आहे.

Monsoon Session : कर्जमाफी, लाडकी बहिण अन् हिंदी सक्तीचा ‘तीन तिघाडा’
शेतकरी स्वाभिमानावर घाव
विरोधक त्यांच्यावर नेहमीच टीका करत असून यंदाच्या अधिवेशनात त्यांच्यावर राजीनाम्याची मागणी अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.माणिकराव कोकाटे यांनी नुकतंच केलेलं विधान म्हणजे जणू बळीराजाच्या जखमेवर मीठ चोळणं. हार्वेस्टिंग झालेल्या पिकांचे पंचनामे करून काय होणार? ढेकळांचे पंचनामे करायचे का? असा सवाल कोकाटेंनी केला आणि एकच खळबळ उडाली. या विधानानंतर विरोधकांनी लगेचच कोकाटेंना घेरले होते. त्यांचं हे विधान केवळ असंवेदनशील नाही तर शेतकऱ्यांच्या जखमांवर उगाचच मीठ चोळणारं आहे, असा आरोप सुरू झाला होता. कोकाटेंच्या आगीसारखी वक्तव्यांची धग शमलेली नसतांना परत एकदा भाजप मंत्र्यांकडून शेतकऱ्यांवर वादग्रस्त वक्तव्याचे बाण सोडण्यात आले होते.
काही दिवसांपूर्वी भाजपचे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनीही शेतकऱ्यांवर एक ‘फुलटॉस’ फेकला होता. शेतकऱ्यांचे कपडे, चपला आणि मोबाईल आमच्या पैशातून चालतात, असं म्हणत त्यांनी केवळ शेतकऱ्यांच्या परिस्थितीवर नव्हे, तर त्यांच्या स्वाभिमानावर थेट घाव घातला होता.या विधानानंतर लोणीकरांना सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात जबरदस्त ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. विरोधकांनी तर थेट असा सवाल केला की, शेतकऱ्यांशिवाय तुम्ही पोट भरता का?या पावसाळी अधिवेशनात वादग्रस्त वक्तव्यांच्या ढगांनी पुन्हा एकदा गडगडाट करायला सुरुवात केली आहे.
Prakash Ambedkar : मुस्लिमांना ‘व्हिलन’ ठरवण्याचे राजकारण कधी संपणार?
शेतकरी, महामार्ग, भाषा, अपयशी धोरणं, मंत्र्यांचे अजब-गजब वाक्य आणि त्यातून उठणारी राजीनाम्याची मागणी हे अधिवेशन तापणार, हे आता नक्की. राजकारणात अनेकदा वक्तव्यांचं वजन खुर्चीच्या पायांवरही भारी ठरतं. या वेळेस काहींचे पाय नक्कीच डगमगणार, असं स्पष्ट दिसतंय.