महाराष्ट्र

Maharashtra : नागपुरातील दंगलीत पोलीस उपायुक्तांवर कुऱ्हाडीने हल्ला

Nagpur : औरंगजेबाच्या वादाने उपराजधानी पेटली

Author

नागपूरमध्ये औरंगजेबाच्या कबरीवरून उसळलेल्या आंदोलनाने हिंसक वळण घेतले आहे. पोलिसांवर थेट हल्ले झाले आहेत. पोलिस उपायुक्त निकेतन कदम यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला झाल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत.  

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या औरंगजेबाचा मुद्दा केंद्रस्थानी  आला आहे.  याच पार्श्वभूमीवर नागपुरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यातील राजकीय वातावरण तापलेले दिसत आहे. सायंकाळी साधारणपणे साडेसातच्या सुमारास दोन गट आमनेसामने आले आणि काही वेळातच संघर्ष उफाळून निघाला. अचानक परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आणि आंदोलनाने हिंसक वळण घेतले. जमावाने पोलिसांवर हल्ला करत दगडफेक केली. यात पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला, तसेच जवळपास 25 पोलीस अधिकारी आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी जखमी झाले. काहींवर गंभीर जखमा झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आल्याची बातमी द लोकहित लाइव्ह तुमच्या समोर आणत आहे.

गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीवरून राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या मुद्द्यावर आज नागपुरात आंदोलन करण्यात आले होते. मात्र, हे आंदोलन चिघळल्याने संपूर्ण शहरात तणाव वाढला आहे. विश्व हिंदू परिषदेनं दुपारी एक आंदोलन केले होते, त्याच दरम्यान काही स्थानिकांमध्ये तणाव निर्माण झाला. संध्याकाळी त्याच वादाला वेगळे वळण लागले आणि दोन्ही गट एकमेकांसमोर आले. काही वेळातच परिस्थिती हाताबाहेर गेली.

Nagpur : मुख्यमंत्र्यांच्या गावात थेट दंगल

पोलिसांवर थेट हल्ला

राज्यातील कायदा व सुव्यवस्था हाताळण्याच्या क्षमतेवर आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागपुरात पोलिसांवरच हल्ला होतोय, याचा अर्थ काय? आंदोलक एवढे आक्रमक का झाले? या सर्व परिस्थितीवर प्रशासन काय भूमिका घेणार? हे महत्त्वाचे मुद्दे आहेत. नागपूर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे गृहनगर आहे. मात्र याच गावात अशा प्रकारच्या हिंसक घटना घडत असतील, तर संपूर्ण राज्यातील परिस्थिती किती नाजूक असेल, असा प्रश्न निर्माण होत आहे.

नागपुरातील परिस्थिती लक्षात घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही नागपूरकरांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. खोट्या अफवा पसरवू नका, संयम ठेवा असे गडकरी यांनी स्पष्ट केले. मात्र, या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

नागपूरकर चिंतेत

राज्यातील राजकीय वातावरण आधीच तापलेले असताना, औरंगजेबाच्या मुद्द्यावरून पुढील दिवसांत आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनात मोठा गदारोळ होण्याची शक्यता आहे. विरोधी पक्ष या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरणार हे निश्चित आहे. काही नेत्यांनी तर औरंगजेबाची कबर महाराष्ट्राबाहेर काढण्याची मागणी केली आहे. त्यामुळे, येत्या काळात हा वाद अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

संपूर्ण प्रकरणामुळे नागपूर शहरातील नागरिक मोठ्या चिंतेत आहेत. पोलिसांवर हल्ले होणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होणे आणि तणाव वाढणे ही बाब नागपूरकरांसाठी धक्कादायक आहे. प्रशासनाने तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणावी आणि अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कठोर उपाययोजना करावी, अशी नागरिकांची मागणी आहे. सध्याच्या घडीला महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेला हा मुद्दा राज्याच्या भविष्यासाठी काय परिणाम घडवतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!