मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शिवतीर्थ येथे जाऊन उदय सामंत यांची भेट घेतली, आणि त्यामागील राजकीय डावपेचांची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे सतत बदलणाऱ्या समीकरणांची अखंड शतरंज. इथे कुणीही कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो फक्त स्वार्थ महत्त्वाचा असतो. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना सत्तेतून खाली खेचल्यापासून राजकीय समीकरणं झपाट्यानं बदलत आहेत. भाजपच्या मदतीने सत्तेवर आलेल्या शिंदे गटाला आता स्वतःचा पक्ष मजबूत करायचा आहे. तर भाजपला महापालिकांमध्ये पूर्ण वर्चस्व हवं आहे. दुसरीकडे, ठाकरे गट स्वतःचं गड राखण्यासाठी झगडतोय, तर मनसेला या राजकीय रणधुमाळीत स्वतःचं अस्तित्व सिद्ध करायचं आहे. महापालिका निवडणुकीच्या आधी सत्तेच्या डावपेचांनी वेग घेतलाय मनसे भाजपसोबत जाणार का? की राज ठाकरे स्वतःचा स्वतंत्र खेळ खेळणार? एक मात्र नक्की, महाराष्ट्राच्या राजकारणात येणाऱ्या काही महिन्यांत धक्कादायक घडामोडी घडल्या नाहीत तर नवलच.
महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या घडामोडींचा वारा वाहू लागला आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सकाळीच मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीमागे काहीतरी मोठं राजकीय गणित असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. पुढील काही महिन्यांत महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकतात, त्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्त्व आहे.
सत्तासंघर्षाला वेग
सत्तेच्या वर्तुळात घडणाऱ्या हालचालींकडे लक्ष दिल्यास, शिंदे गटाने ठाकरे गटाला कमकुवत करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. राज्यभरातून अनेक ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिंदे गटात प्रवेश करत आहेत. शिवसेना-भाजपसाठी मुंबई महापालिका जिंकणे ही प्रतिष्ठेची बाब आहे. ठाकरे गटाला दिलेला धक्का अधिक तीव्र करण्यासाठी भाजप आणि शिंदे गट मनसेलाही सोबत घेण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे उदय सामंत आणि राज ठाकरे यांच्या भेटीला वेगवेगळे राजकीय रंग दिले जात आहेत.
विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपने मनसेसोबत युती करण्याची तयारी दाखवली होती, मात्र, एकनाथ शिंदे यांच्या आक्षेपामुळे हे शक्य झाले नाही. आता परिस्थिती बदलत असून, मनसे आणि शिंदे गटातील कटुता दूर करण्यासाठी हा प्रयत्न असल्याची चर्चा आहे. एका बाजूला मनसे आणि भाजप युतीसाठी इच्छुक दिसत आहेत. मात्र दुसऱ्या बाजूला शिंदे गटालाही मनसेला जवळ करण्याची गरज भासत आहे. याचा मुख्य उद्देश म्हणजे महापालिकेतील निवडणुकीत संभाव्य मनसेच्या उमेदवारांना भाजप-शिवसेनेच्या विरोधात न जाता सोबत आणणे. विधानसभा निवडणुकीत आठ ठिकाणी मनसेच्या उमेदवारांमुळे शिंदे गटाच्या उमेदवारांचा पराभव झाला होता, अशी पुनरावृत्ती टाळण्यासाठी हे डावपेच आखले जात आहेत.
Harshwardhan Sapkal: आरएसएसचे स्वयंसेवक महाराजांच्या नखा इतकेही नाही
राज ठाकरेंचा वापर
मनसेच्या भूमिकेकडे पाहता, राज ठाकरे कधीही कोणाच्या दडपणाखाली निर्णय घेत नाहीत. परंतु त्यांच्या पक्षाची सद्यस्थिती पाहता, त्यांना मोठ्या राजकीय पक्षांची साथ घ्यावी लागेल, हे स्पष्ट आहे. महापालिकेतील सत्ता संतुलन बिघडवण्यासाठी मनसेला जवळ घेण्याची ही खेळी आहे का? असा सवाल उपस्थित होतो.
झालेल्या भेटीनंतर उदय सामंत यांनी माध्यमांसमोर येऊन सांगितलं की, ही भेट केवळ मराठी भाषेसंदर्भात चर्चा करण्यासाठी होती, राजकीय हेतू नाही. पण राजकीय वर्तुळात हे पटण्यासारखं नाही. दिल्लीत मराठी साहित्य संमेलन सुरू आहे, पुण्यात विश्व मराठी संमेलन झालं होतं, त्यात राज ठाकरे उपस्थित होते, म्हणून आभार मानायला गेलो, हे कारण हास्यास्पद वाटतं. खऱ्या राजकीय चर्चेचं गुपित काय आहे, हे लवकरच उघड होईल.
शिंदे-भाजपचा डाव
झालेल्या या भेटीचा मोठा राजकीय प्रभाव असणार आहे. एकनाथ शिंदे यांच्यासाठी मुंबई महापालिकेचा गड जिंकणं हे अस्तित्वाचं युद्ध आहे. त्यासाठी त्यांनी भाजपसोबत हातमिळवणी केली असली, तरी मनसेलाही त्यांच्यासोबत आणण्याची खेळी सुरू आहे. भाजपला देखील याचा फायदा आहे, कारण मनसेसोबत आल्यास मराठी मतांचं विभाजन होईल आणि ठाकरे गट अधिक कमजोर होईल.
शिवसेना, भाजप, मनसे आणि ठाकरे गट हे चारही पक्ष महापालिकेच्या रणधुमाळीत उतरले आहेत. यातील प्रत्येक जण सत्तेसाठी नवे नवे डाव खेळत आहे. राजकारणात कोणी कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो, हे या घडामोडींनी पुन्हा सिद्ध केलं आहे. पुढच्या काळात मनसे आणि शिंदे गट युती करणार का, हा मोठा प्रश्न आहे.
Marathi Sahitya Sammelan : अभिजात मायेच्या व्यासपीठावर ‘मिल बैठे दो यार’
अमित शहांची भूमिका
नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाचा वाद थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कोर्टात गेल्याचं बोललं जातं. यावर विचारलं असता, उदय सामंत यांनी सांगितलं की, अमित शाह यांच्यासोबत शिंदे साहेबांची बैठक आहे, ही प्रशासकीय बैठक आहे. मात्र, ही बैठक केवळ विकासकामांसाठी आहे, हे खरोखर खरं आहे का? की यात आणखी काही राजकीय समीकरणं सेट केली जाणार आहेत
मनसेच्या या भेटीने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा तिढा निर्माण केला आहे. ठाकरे गटाला कमजोर करण्यासाठी भाजप आणि शिंदे गटाने मनसेला जवळ केल्याची चर्चा रंगली आहे. शिंदे गटाला मनसेच्या ताकदीची जाणीव झाल्याने, त्यांच्यासोबत सौहार्द वाढवण्याचा हा डाव आहे का, हा मोठा प्रश्न आहे. पुढील काही दिवसांतच या भेटीमागचं खऱ्या रणनीतीचं चित्र स्पष्ट होईल. पण एक गोष्ट मात्र नक्की राजकारणात शत्रूचंही राजकीय भलं केलं जातं, पण त्यामागे मोठा स्वार्थ लपलेला असतो.
