महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बनावट लेटरहेड आणि सहीचा वापर करून अज्ञात व्यक्तीने अमरावती जिल्हाधिकाऱ्यांना फसवे पत्र पाठवले.
अमरावतीमध्ये एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाने बनावट लेटरहेड आणि स्वाक्षरीचा वापर करून जिल्हाधिकाऱ्यांना दिशाभूल करणारे पत्र पाठविण्यात आले. या बनावट पत्रात मोर्शी येथील एका वरिष्ठ लिपिकावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. ही बाब लक्षात येताच, जिल्हाधिकाऱ्यांनी संशय व्यक्त केला आणि पत्राच्या सत्यतेची पडताळणी केली.
तपासानंतर हे पत्र पूर्णतः बनावट असल्याचे निष्पन्न झाले. जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने महसूल मंत्र्यांच्या कार्यालयाशी संपर्क साधला आणि हा बनावट प्रकार उघडकीस आणला. यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी योगेश कोठेकर यांनी पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांना माहिती दिली. त्वरित कारवाई करत गाडगेनगर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
संशयास्पद मजकूर
मंत्र्यांचे अधिकृत लेटरहेड त्यांच्या कार्यालयात ठेवले जातात, आणि अनेकदा अधिकृत कामांसाठी त्यांचा वापर केला जातो. मात्र, या घटनेत अज्ञात व्यक्तीने ही यंत्रणा चुकीच्या हेतूसाठी वापरली. विशेष म्हणजे, बनावट स्वाक्षरीसह तयार करण्यात आलेले हे पत्र पोस्टाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आले होते. मात्र, पत्रातील मजकूर संशयास्पद वाटल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली आणि हा फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला.
बनावट पत्रात मोर्शीतील एका वरिष्ठ लिपिकावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यात महामंडळातील निम्मे कर्मचारी बेपत्ता असल्याचा उल्लेख करून सरकारी कार्यालये बनावट कर्मचाऱ्यांचे अड्डे बनल्याचेही नमूद केले होते. पत्राच्या तपासणीदरम्यान, त्यावर असलेली स्वाक्षरीही बनावट असल्याचे स्पष्ट झाले. प्रकरण उघड झाल्यानंतर महसूल मंत्र्यांच्या कार्यालयाने त्वरित पोलीस आयुक्तांना माहिती दिली.
Nagpur Municipal Corporation : महानगरपालिकेच्या कारभाराला बळ
लिपिकावर कारवाई
आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्याचे आदेश दिले. या संदर्भात यवतमाळ नगरपरिषदेच्या एका लिपिकावर कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, हा लिपिक आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मदतीने जिल्हाधिकारी कार्यालयातील पालिका विभागात प्रतिनियुक्तीवर कार्यरत होता, मात्र तिथेही तो वेळोवेळी अनुपस्थित राहत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.
नागरिकांच्या तक्रारीनुसार हा लिपिक फोन कॉलला उत्तर देत नव्हता आणि धमकीमय वक्तव्य करीत होता. त्यामुळेच जिल्हाधिकाऱ्यांनी त्याची नियुक्ती रद्द करण्याचा निर्णय घेतला. या संपूर्ण घटनेमुळे जिल्हा प्रशासन आणि महसूल विभाग सतर्क झाले आहेत. अशा प्रकारच्या फसवणुकीच्या घटनांना आळा घालण्यासाठी अधिक कडक उपाययोजना राबविण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
अमरावतीत उघडकीस आलेला हा प्रकार प्रशासनाच्या विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. अशा बनावट प्रकारांना प्रतिबंध घालण्यासाठी कडक कायदेशीर कारवाईची मागणी आता जोर धरू लागली आहे. या घटनेत सामील असलेल्या व्यक्तीचा लवकरच शोध घेऊन त्याला कडक शिक्षा केली जाईल, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.