महाराष्ट्रातील ज्येष्ठ फार्मासिस्ट डॉ. प्रमोद येवले यांची राजस्थान आरोग्य आणि विज्ञान विद्यापीठ (RUHS) कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
राजस्थान आरोग्य आणि विज्ञान विद्यापीठ (RUHS) कुलगुरूपदी महाराष्ट्रातील ज्येष्ठ फार्मासिस्ट डॉ. प्रमोद येवले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी अधिकृत आदेश जारी करत ही मोठी घोषणा केली. महिनाभरापूर्वी पार पडलेल्या मुलाखतीनंतर या निर्णयाची प्रतीक्षा होती, अखेर त्याला मंजुरी मिळाली आहे.
निवड तब्बल महिनाभर रखडली होती. मुलाखती झाल्यानंतरही निर्णय प्रलंबित राहिल्याने विद्यापीठात अनिश्चिततेचे वातावरण होते. मात्र, आता डॉ. येवले यांना अधिकृतरित्या नियुक्त करण्यात आले आहे. ते या पदावर पुढील पाच वर्षे किंवा वयाच्या सत्तरव्या वर्षापर्यंत कार्यरत राहतील.
महाराष्ट्रातील कार्यकाळ
डॉ. प्रमोद येवले हे फार्मसी क्षेत्रातील नामांकित तज्ज्ञ आहेत. याआधी ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू राहिले आहेत. त्याशिवाय, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ येथे प्रभारी कुलगुरू म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. विदर्भातील प्रतिष्ठित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू म्हणूनही त्यांनी योगदान दिले आहे.
Maharashtra Budget Session : महायुतीचे ‘कुबेर’ करणार नवी जादू!!
दीर्घ प्रतीक्षा संपली
RUHS मध्ये कार्यवाहक कुलगुरूंच्या कारकीर्दीनंतर अखेर एका कायमस्वरूपी कुलगुरूची निवड झाली आहे. कार्यवाहक कुलगुरू डॉ. धनंजय अग्रवाल यांना मुलाखत समितीने अपात्र ठरवल्याने हा पदभार रिकामा होता. त्यानंतर या निवडीविरोधात विविध संघटनांनी आणि स्थानिक वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी आक्षेप घेतला होता.
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या राजस्थान शाखेनेही या विरोधात आवाज उठवला. त्यांनी राज्यपालांना पत्र लिहून कुलगुरूपदी राजस्थानमधीलच एखाद्या तज्ज्ञाची निवड व्हावी, अशी मागणी केली होती. स्थानिक आरोग्य व्यवस्थेचा अनुभव असलेल्या व्यक्तीने विद्यापीठाचे नेतृत्व करावे, असा त्यांचा युक्तिवाद होता. मात्र, राज्यपालांनी या सर्व चर्चांना विराम देत डॉ. प्रमोद येवले यांची निवड अधिकृत केली आहे.
कुलगुरूंची अपात्रता
याआधी RUHS च्या कार्यवाहक कुलगुरूपदाची जबाबदारी डॉ. धनंजय अग्रवाल यांच्याकडे होती. मात्र, मुलाखतीसाठी स्थापन केलेल्या समितीने त्यांना अपात्र घोषित केले. त्यानंतर त्यांचे समर्थक आणि काही संघटना या निर्णयाविरोधात सतत आंदोलन करत होत्या. आयएमएने या विरोधात थेट राज्यपालांना पत्र लिहून नवीन नियुक्ती रद्द करण्याची मागणी केली होती.
पत्रानंतर चर्चांना उधाण आले होते. काहींनी ही मुलाखत रद्द करण्यासाठी उच्च पातळीवर प्रयत्न केले. मात्र, सरकारने अंतिम निर्णय घेत डॉ. प्रमोद येवले यांची नियुक्ती अधिकृतपणे जाहीर केली. आता कार्यवाहक कुलगुरू डॉ. अग्रवाल पुन्हा एसएमएस मेडिकल कॉलेजमध्ये नेफ्रोलॉजी विभागात वरिष्ठ प्राध्यापक म्हणून काम करणार आहेत.
नव्या कुलगुरूंपुढील जबाबदारी
RUHS हे राजस्थानमधील वैद्यकीय शिक्षणाचे एक प्रमुख केंद्र आहे. विद्यापीठाच्या विकासासाठी नवे कुलगुरू म्हणून डॉ. प्रमोद येवले यांच्याकडून महत्त्वाच्या सुधारणा अपेक्षित आहेत. त्यांना आरोग्य शिक्षण क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान, संशोधन आणि अकादमिक गुणवत्ता वाढवण्यासाठी पावले उचलावी लागतील.
स्थानिक डॉक्टरांचा विरोध, विद्यापीठातील आधीच्या व्यवस्थापनातील समस्या आणि नवीन धोरणांची अंमलबजावणी यासारख्या मोठ्या जबाबदाऱ्या त्यांच्या खांद्यावर असतील. त्यांनी महाराष्ट्रात शैक्षणिक क्षेत्रात अनेक महत्त्वाची कामे केली आहेत, आता राजस्थानच्या आरोग्य शिक्षण व्यवस्थेतील त्यांच्या योगदानाची परीक्षा लागणार आहे.