राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची आज सांगता झाली असून, पुढील हिवाळी अधिवेशन डिसेंबरपासून नागपुरात होणार आहे. दरम्यान, हनीट्रॅपच्या आरोपांवर मुख्यमंत्री फडणवीसांनी ना हनी आहे, ना ट्रॅप म्हणत विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिलं.
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा 18 जुलै 2025 रोजी समारोप झाला. मागील काही दिवसांपासून राजकीय तापमान प्रचंड वाढलेलं असताना, अखेर सभागृहात अध्यक्षांच्या ‘सूप वाजलं’ या घोषणेमुळे अधिवेशनाची सांगता झाली. आता या पुढचं रण, थेट नागपूरच्या थंडीमध्ये रंगणार आहे. राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन येत्या 8 डिसेंबर 2025 पासून नागपूर येथे पार पडणार आहे, अशी घोषणा विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी केली.
पावसाळी अधिवेशन दरम्यान अनेक मुद्द्यांवर जोरदार चर्चा झाली, आरोप-प्रत्यारोप झाले. 17 जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांमध्ये विधानभवनाच्या लॉबीत झालेल्या हाणामारीने वातावरण आणखी तापले. या घटनेचे तीव्र पडसाद सभागृहात चांगलेच उमटले. विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवत सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. मात्र सरकारनेही सुसंगत प्रतिसाद देत विरोधकांचा हा डाव चपखलपणे उधळून लावला.
पुराव्यांसह बोला
या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंतिम आठवड्याच्या चर्चेला उत्तर देताना काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी केलेल्या हनीट्रॅप संदर्भातील आरोपांवर परखडपणे उत्तर दिलं. त्यांनी अत्यंत रोखठोक शब्दांत विरोधकांची खिल्ली उडवली. नानाभाऊ म्हणाले बॉम्ब आहे, पण आमच्यापर्यंत काहीच पोहोचले नाही. ना हनी आहे, ना ट्रॅप आहे. जर काही घडलं असेल, तर पुराव्यांसह बोला. उगाच वातावरण तापवण्यात अर्थ नाही, असं म्हणत फडणवीसांनी मुद्देसूदपणे आरोप खोडून काढले.
फडणवीस म्हणाले की, सभागृहाचा वेळ वाया घालवणं, सभात्याग करणं, बाहेर जाणं, हे योग्य नाही. नीट पुरावे आणा, मुद्दा ठणकावून मांडा आणि सत्ताधाऱ्यांची बोलती बंद करा. पण उगाच ‘साप-साप’ म्हणून भुई थोपटण्यात काही अर्थ नाही. यावेळी त्यांनी नाशिकमधील एका जुन्या तक्रारीचा उल्लेख करत सांगितलं की, ती तक्रार देखील संबंधित महिलेनं मागे घेतली आहे. एका उपजिल्हाधिकाऱ्याच्या संदर्भातली ती बाब होती आणि तिचं कोणतंही सत्ताधाऱ्यांशी किंवा मंत्र्यांशी थेट संबंध नव्हता.
Chandrashekhar Bawankule : जुन्या करारांना नवीन श्वास, नझूल भूखंडांना अभयाचा हात
कामकाज समाधानकारक
मुख्यमंत्र्यांनी सभागृहात एक पोस्टर दाखवत काँग्रेसवर आणखी एक हल्ला चढवला. ती व्यक्ती काँग्रेसचा अध्यक्ष आहे, त्याने निवडणूक लढवली आहे, हा पाहा पंजा, असं म्हणत त्यांनी सत्ताधारी पक्षाचा या मुद्यावरून काहीही संबंध नसल्याचं पुन्हा अधोरेखित केलं. दरम्यान, अधिवेशनात एकूण कायदेमंडळीन कामकाज समाधानकारक झाल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं. विरोधकांकडून अनेकदा सभात्याग व आंदोलनाच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न झाला, पण सरकारने त्या प्रत्येक मुद्द्याला मुद्द्यानं उत्तर देत अधिवेशनाचं नियंत्रण राखलं.
आता पुढील अधिवेशन नागपूरमध्ये पार पडणार असून, तेव्हा थंडीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक प्रश्नांवर पुन्हा एकदा राजकीय रणसंग्राम रंगेल. कोणता मुद्दा तापेल, कोण गारठेल आणि कोणता ‘बॉम्ब’ पुन्हा फुसका ठरेल, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.