महाराष्ट्र

Nana Patole : भंडारा बँकेवर महायुतीचा फोकस

Bhandara : नाना पटोलेंच्या माघारीनंतर रंगला नवीन डाव

Author

महायुतीने आता भंडारा जिल्हा सहकारी बँक जिंकण्यासाठी तयारी सुरू केली आहे. नाना पटोले यांनी माघार घेतल्याने काँग्रेसची ताकद कमी झाली असली तरी खासदार प्रशांत पडोळे यांनी आपली दावेदारी कायम ठेवली आहे.

गोंदिया आणि चंद्रपूर जिल्हा सहकारी बँकांवर यशाची मोहर उमटवल्यानंतर महायुतीने आता भंडारा जिल्हा बँकेच्या ताब्यासाठी ताकदीनिशी मोर्चा वळवला आहे. यावेळी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भूमिका चर्चेचा विषय बनली आहे. त्यांनी आधी उमेदवारी अर्ज भरत आपण ही लढत लढणार असल्याचे सांगितले, मात्र अचानक माघार घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

नाना पटोले यांनी माघार घेतली असली, तरी त्यांचे निकटवर्ती व समर्थक खासदार प्रशांत पडोळे मात्र मैदानात ठामपणे उतरले आहेत. त्यांनी बँकेचे माजी अध्यक्ष सुनील फुंडे यांच्या विरोधात आपली दावेदारी जाहीर केली आहे. ही निवडणूक आता केवळ सहकार संस्था मर्यादित न राहता एक महत्त्वपूर्ण राजकीय शक्तीप्रदर्शन ठरणार आहे.

High Court : स्मार्ट मीटरविरोधात विदर्भाचा जनआक्रोश

वर्चस्वासाठी पुन्हा मैदानात

भंडारा जिल्हा बँकेच्या 21 संचालकांच्या जागांसाठी रविवार, 27 जुलै रोजी मतदान होत आहे. त्यानंतर सोमवारी, 28 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. ही निवडणूक केवळ बँकेपुरती मर्यादित नसून, नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्यासाठी वर्चस्व टिकवण्याची परीक्षा ठरणार आहे. महायुतीच्या सहकार पॅनेलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, भाजप आणि शिंदे गटाची शिवसेना हे तिन्ही घटक एकत्र आले आहेत. विशेष म्हणजे, भंडारा दूध संघाच्या निवडणुकीत नाना पटोले यांच्यासोबत गेलेले शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर आता पुन्हा महायुतीच्या बाजूने वळले आहेत. यामुळे पटोले यांच्यासाठी परिस्थिती आणखी आव्हानात्मक ठरत आहे.

भंडारा बँकेची निवडणूक लढण्याची घोषणा करून त्यासाठी थेट उमेदवारी अर्ज दाखल करणारे नाना पटोले यांनी माघार घेताना कोणतेही कारण न देता अघोषित पावले उचलली. ही माघार राजकीय दबावातून आली का, की अंतर्गत संघर्षाचा परिणाम आहे, हे स्पष्ट न झाल्यामुळे मतदार आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. पटोले यांच्या माघारीनंतर त्यांच्या समर्थक खासदार प्रशांत पडोळे यांनी मात्र आपली दावेदारी कायम ठेवत संघर्षाची भूमिका घेतली आहे. त्यांनी थेट महायुतीचे उमेदवार आणि बँकेचे माजी अध्यक्ष सुनील फुंडे यांच्या विरोधात उभे राहत ही निवडणूक अधिक रंगतदार बनवली आहे.

Akola BJP : नव्या शिलेदारांच्या कुबडीवर सत्तेचा किल्ला जिंकण्याची तयारी

उमेदवारांच्या यादीतून पक्षशक्ती

महायुतीच्या सहकार पॅनेलमध्ये कैलाश नशीने, धर्मराव भलावी, सुनील फुंडे, प्रकाश मालगावे, प्रशांत पवार, प्रदीप पडोले, संदीप फुंडे, चेतक डोंगरे, योगेश हेडाऊ, आशा गायधाने, टीरा तुमसरे, माजी आमदार नाना पंचबुधे, कवलजीतसिंह चड्ढा, विश्वनाथ कारेमोरे, होमराज कपगते, रामदयाल पारधी, अनिल सर्वे, सदानंद बर्डे, जितेश इखर, धर्मेंद्र बोरकर, श्रीकांत वैरागडे हे उमेदवार आहेत. त्याचवेळी महाविकास आघाडीच्या पॅनेलमध्ये खासदार प्रशांत पडोळे, चंद्रदीन अराम, अजय मोहनकर, अरविंद असाई, नरेंद्र वाघाये, बाळकृष्ण सर्वे, सतीश टिचकुले, शशिकिशोर बांडाबुचे, धनंजय तिरपुडे, सदाशिव वलथरे, संजय केवट, शीला अगासे, सविता ब्राह्मणकर, रसिका भुरे, चंद्रकांत निंबार्ते, विवेक पडोले, शशांत जोशी, किरण अतकरी, रेखाबाई समरित, चंपालाल कटरे, रामलाल चौधरी, प्रदीप बुराडे, मोहित मोहरकर, अशोक चोले यांचा समावेश आहे.

भंडारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून नाना पटोले माघारले असले, तरी त्यांच्या छायेत असलेल्या समर्थकांचा जोर कायम आहे. दुसरीकडे, महायुती संपूर्ण ताकदीनिशी ही निवडणूक जिंकण्याच्या तयारीत आहे. गोंदिया, चंद्रपूर आणि भंडारा दूध संघातील यशानंतर ही निवडणूक महायुतीसाठी प्रतिष्ठेची ठरू शकते. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मतदान आणि त्यानंतरची मतमोजणी विदर्भाच्या राजकारणात नवा ट्रेंड निश्चित करणार आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!