
होळीच्या सणानिमित्त महायुती सरकारकडून राज्यातील महिलांसाठी खास भेट. अंत्योदय शिधापत्रिकाधारक महिलांना मोफत साडी वाटपाचा मोठा निर्णय जाहीर.
यंदाची होळी राज्यातील महिलांसाठी खास ठरणार आहे. रंगांचा सण आनंदाने साजरा करण्यासाठी महायुती सरकारने महिलांना दुग्धशर्करा योग जुळवून दिला आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणाऱ्या दरमहा 1 हजार 500 रुपयांसोबत आता महिलांना होळीच्या निमित्ताने खास भेट मिळणार आहे. सरकारकडून यंदा अंत्योदय शिधापत्रिकाधारक महिलांना मोफत साडी देण्यात येणार आहे.
रंगांची उधळण, चंगभंगच्या जत्रा, गुळाच्या पुरणपोळ्या आणि आता सरकारकडून मिळणारी ही खास भेट यामुळे लाडक्या बहिणींचा आनंद चौपट होणार आहे. यंदा होळीला नवा रंग, सरकारकडून बहिणींसाठी खास दंग असा असणार आहे.

मोठा निर्णय
महायुती सरकारने महिलांसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. परिवहन महामंडळाच्या बसेसमध्ये महिलांसाठी अर्धे तिकीट, लाडकी बहीण योजना आणि आता होळीच्या निमित्ताने मोफत साडी वाटप.या साड्या अंत्योदय शिधापत्रिकाधारक महिलांना वाटण्यात येणार आहेत.
एकनाथ शिंदे यांनी महिलांसाठी अनेक लोककल्याणकारी योजना आणल्या. विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू झालेल्या लाडकी बहीण योजनेला मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर सरकारने महिलांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी हा निर्णय कायम ठेवला. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महिलांसाठी आणखी एक खास योजना जाहीर झाली आहे. होळीच्या निमित्ताने अंत्योदय शिधापत्रिकाधारक महिलांना मोफत साडी देण्यात येणार आहे.
Congress : धर्माच्या पुनरुज्जीवनासाठी भव्य ‘सद्भावना पदयात्रा’
दुकानात गठ्ठे
महिलांना ही भेट मिळण्यासाठी शासनाने योग्य नियोजन केले आहे. राज्य यंत्रमाग महामंडळाद्वारे विशेष साड्यांचे गठ्ठे तयार करण्यात आले आहे. त्या प्रत्येक तालुक्यातील रेशन दुकानांत पोहोचवल्या जात आहेत.
लाभार्थी महिलांनी केवळ आपल्या रेशन दुकानात जाऊन ई-पॉस मशीनवर अंगठा ठेवायचा आहे. एका कार्डवर एका महिलेला एक साडी दिली जाणार आहे. हा लाभ कोणत्याही प्रकारच्या अतिरिक्त शुल्काशिवाय मिळणार आहे. त्यामुळे महिलांनी लवकरात लवकर आपल्या जवळच्या रेशन दुकानात जाऊन ही संधी साधावी.
आनंदाची लहर
महिलांच्या जीवनात आनंदाचे रंग भरायचे असतील, तर आर्थिक पाठबळ तितकेच महत्त्वाचे असते. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या 1500 रुपयांनी महिलांना मोठा आधार मिळतो आहे. आता साडी भेट मिळाल्याने त्यांचा उत्सव आणखी रंगतदार होईल.
हजारो महिलांना या निर्णयामुळे आनंद मिळणार आहे. महिलांचे आर्थिक सक्षमीकरण आणि त्यांना समाजात अधिक स्वावलंबी बनवण्यासाठी अशा योजना महत्त्वाच्या ठरतात. होळी हा फक्त रंगांचा नाही, तर नव्या संधींचा, नव्या आनंदाचा आणि नव्या आशेचा सण आहे. आणि यंदा सरकारच्या या निर्णयामुळे तो आणखी खास ठरणार आहे.