चिचोली, भानेगाव आणि चनकापूर या गावांना लवकरच नगरपरिषदेचा दर्जा मिळणार आहे.
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले आणि देवभाऊ यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद स्वीकारले. मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर फडणवीसांनी महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले व ठोस पावले उचलली. त्यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या प्रगतीला नवी दिशा मिळाल्याचे दिसून येत आहे. नागपूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना प्रगतीच्या मार्गावर नेण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले जात आहे. सावनेर तालुक्यातील चिचोली, भानेगाव व चनकापूर या तीन ग्रामपंचायतींच्या एकत्रिकरणाने नव्या नगरपरिषदेचा दर्जा मिळणार असल्याची हालचाल सुरु झाली आहे. आमदार आशीष देशमुख यांनी या विषयावर प्रस्ताव सादर केल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी त्वरित हालचालींच्या सूचना दिल्या आहेत. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे स्थानिक विकासाला गती मिळणार आहे.
गेल्या तीन वर्षांत महायुती सरकारच्या कार्यकाळात नागपूर जिल्ह्यात अनेक ग्रामपंचायतींना नगरपरिषद किंवा नगरपंचायतीचा दर्जा देण्यात आला आहे. डिगडोह, निलडोह, गोधनी रेल्वे, बेसा-पिपळा-घोगली, कोंढाळी, तरोडी यांसारख्या ठिकाणी हे बदल पाहायला मिळाले. त्याच धर्तीवर सावनेर तालुक्यातील चिचोली, भानेगाव आणि चनकापूर या गावांवरही नगरपरिषद बनवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आशीष देशमुख यांनी या प्रस्तावावर भर देत 28 जानेवारी रोजी संबंधित पत्र दिले होते. त्यानुसार या तीन ग्रामपंचायतींना एकत्र करून नगरपरिषदेचा दर्जा देण्याचे प्रयत्न वेगाने सुरू आहेत. महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 च्या तरतुदीनुसार प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
धोरणाची अंमलबजावणी
चिचोली, भानेगाव आणि चनकापूरसाठी नवीन नगरपरिषदेचा प्रस्ताव सादर करताना विविध तपशीलांची पूर्तता करणे आवश्यक आहे. यामध्ये लोकसंख्या, अकृषक रोजगाराची टक्केवारी, एकूण क्षेत्रफळ, तसेच गावांचे नागरीकरणाचे आकडे यांचा समावेश आहे.
तिन्ही ग्रामपंचायतींच्या कार्यकाळाची माहिती, शेतीप्रधान आणि अकृषक जमिनींची यादी, तसेच नगरपरिषदेसाठी नकाशा तयार करणे यासंबंधी सूचना करण्यात आल्या आहेत. यामुळे स्थानिक प्रशासनाची जबाबदारी वाढेल आणि नागरी सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा होईल. शिवाय, या प्रस्तावामुळे येथील लोकांना शाश्वत विकासाच्या दिशेने एक मोठे पाऊल टाकण्याची संधी मिळणार आहे.
जनतेचा लाभ
चिचोली, भानेगाव आणि चनकापूर यांना नगरपरिषद घोषित केल्यास येथील रहिवाशांना रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण यांसारख्या मूलभूत सुविधा अधिक प्रमाणात उपलब्ध होऊ शकतात. नगरपरिषदेच्या स्थापनेमुळे येथील आर्थिक, सामाजिक आणि औद्योगिक विकासाला चालना मिळेल.
नागपूर जिल्ह्यातील इतर यशस्वी उदाहरणांप्रमाणे या नव्या नगरपरिषदेमुळे स्थानिक पातळीवर निर्णय घेणे सोपे होईल. तसेच, वाढती लोकसंख्या आणि नागरीकरणाच्या गरजा लक्षात घेऊन अधिक नियोजनबद्ध विकास घडवून आणता येईल.
मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या नेतृत्वात विदर्भ होणार का विकासाचे शिखर ?
प्रशासनाकडून ठोस पावले अपेक्षित
सदर प्रस्ताव सादर करण्यासाठी तिन्ही ग्रामपंचायतींचा ठराव, प्रस्तावित क्षेत्राचा नकाशा, तहसीलदारांकडून प्रमाणपत्र, तसेच 2011 च्या जनगणनेतील आकडेवारी यांचा आधार घेतला जाणार आहे. प्रस्ताव सादर करताना अधिनियमातील कलम 341 (अ) च्या तरतुदींचा आधार घेतल्याने ही प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि शिस्तबद्ध होईल.
येरखेडा ग्रामपंचायतीप्रमाणेच या प्रस्तावावरही सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा आहे. या बदलामुळे सावनेर तालुक्यातील तीन गावांचे भविष्य अधिक उज्ज्वल होणार आहे, हे निश्चित! नवीन नगरपरिषदेचा हा प्रवास स्थानिक विकासाचे नवे पर्व सुरू करेल. ग्रामपंचायतींपासून नगरपरिषदेपर्यंतच्या या बदलामुळे नागपूर जिल्हा अधिक प्रगत दिशेने वाटचाल करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.