विधानसभा निवडणुकीनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे वेध लागले आहेत. यासाठी राजकीय वातावरण तापलं आहे. भंडाऱ्यात महायुतीनं पंचायत समिती निवडणुकीत विजय मिळविला आहे.
राज्यातील महापालिकेत अद्यापही प्रशासन राज कायम आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचेही अनेकांना वेध लागले आहे. राजकीय वातावरण तापत असतानाच भंडाऱ्यातील पंचायत समिती उभापती, उपसभापती पदासाठी निवडणूक पार पडली. त्यातील पाच पंचायत समितींवर महायुतीनं विजय मिळाविला आहे. दोन समिती आपल्याकडं खेचण्यात महाविकास आघाडीला यश मिळालं आहे. पंचायत समितीमधील अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानं ही निवडणूक घेण्यात आली. सोमवारी, 20 जानेवारीला निवड झालेले सभापती, उपसभापती आता अडीच वर्ष काम करणार आहेत.
भंडारा जिल्ह्यातील तुमसर, मोहाडी, भंडारा, लाखांदूर येथे महायुतीनं विजय मिळविला आहे. लाखनी, पवनी येथे महाविकास आघाडी विजयी झाली आहे. त्यामुळं आघाडीला केवळ दोनच ठिकाणी विजय मिळवित समाधान मानावं लागलं आहे. निवडणुकीत भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचं वर्चस्व दिसून आलं. लाखांदूर पंचायत समितीचे सभापती म्हणून पुरुषोत्तम ठाकरे यांची निवड झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या संजना वरखडे उपसभापती झाल्या आहेत. लाखनीत अश्विनी कानेकर सभापती झाल्या आहेत. सुनील बांते हे उपसभापती झाले आहेत.
भंडाऱ्यात बिनविरोध निवड
मोहाडी पंचायत समितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जगदीश शेंडे हे सभापती झाले आहेत. भाजपच्या देवा चकोले यांची उपसभापती पदावर निवड झाली आहे. पवनी पंचायत समितीवर आघाडीचा झेंडा फडकला आहे. काँग्रेसचे नारनवरे येथे विजयी झालेत. उपसभापती पदावर भाजपच्या प्रमोद मेंढे यांची निवड झाली. भंडारा पंचायत समितीची निवडणूक बिनविरोध झाली. कल्पना कुर्जेकर या सभापती झाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे नागेश भगत हे उपसभापती झालेत. तुमसर पंचायत समितीत राष्ट्रवादीच्या दीपा गौपाले सभापती पदाच्या निवडणुकीत विजयी झाल्या आहेत.
भंडारा जिल्हा हा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांचा गृहजिल्हा आहे. तेथेही महाविकास आघाडीला केवळ दोनच पंचायत समितीवर विजय मिळविता आला. सध्या राज्यात काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागल्यानं पटोले यांच्या विरोधात वातावरण तापलं आहे. अशा परिस्थितीत पटोले यांच्या गृहजिल्ह्यातही काँग्रेसचा पराभव झाला आहे. काँग्रेसला निम्म्या पंचायत समिती देखील मिळालेल्या नाहीत. त्यामुळं प्रदेशाध्यक्षांच्या विरोधात या मुद्द्याचा वापर नक्कीच केला जाईल, असं सांगितलं जात आहे. पंचायत समितीच्या निवडणुकीनंतर आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीकडं राजकीय वर्तुहाचं लक्ष लागलं आहे. भंडाऱ्यात मिळालेल्या या यशामुळं महायुतीचं मनोबल आणखी वाढलं आहे. त्यामुळं आता महायुती पुढील निवडणुकीसाठी जय्यत तयारीला लागली आहे.
